पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असणार 'फूट मसाजर' - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 30, 2025

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असणार 'फूट मसाजर'

 पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असणार 'फूट मसाजर'



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पालखी सोहळ्या बरोबर पायी चालून दमलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. वारकऱ्यांचा चालण्याचा क्षीण (थकवा) घालवण्यासाठी फूट मसाजरद्वारे थकलेल्या पायाला आराम देण्यासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी काम करणार आहेत.हा उपक्रम प्राधान्याने राबविण्यासाठी सीईओ जंगम यांनी दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

आषाढी वारीचा सोहळा समीप येत चालला आहे. संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत येत आहेत. देहू व आळंदीहून निघालेले पालखी सोहळे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आले आहेत. या पालखी सोहळ्या बरोबर पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. पालखी सोहळे मुक्कामी आल्यानंतर वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची टीम कामाला लागली आहे. वारकऱ्यांना पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधांबरोबरच इतर बाबींकडेही पूर्ण लक्ष देण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभागातर्फे महिला वारकऱ्यांसाठी सुविधा केंद्र, हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या टीमने फूट मसाजरची सुविधा यावेळेस पहिल्यांदाच पालखी मार्गावर उपलब्ध करून दिली आहे.
संतांचे पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर 30 जून रोजी पहिल्यांदा कारंडे, शिंगणापूर फाटा व नातेपुतेच्या दरम्यान वारकऱ्यांचा मुक्काम राहणार आहे. या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या सोयीसाठी जर्मन हँगर व सुविधा केंद्राची सोय करण्यात आली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी सायंकाळी सहा ते रात्री 11 या दरम्यान चालून दमलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यात येणार आहे. बराच काळ चालत राहिल्याने वारकऱ्यांचे पाय दुखतात. अशा वारकऱ्यांचे पाय दाबण्यासाठी फूट मसाजर या यंत्राची सोय करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याचा मुक्काम पुढे जाईल तशी ही टीम पुढे सरकणार आहे. सहा जुलै रोजी पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम गुरसाळे व वाखरी येथे राहणार आहे. या मुक्कामांपर्यंत या टीमची ही सेवा राहणार आहे. 

दीडशे कर्मचाऱ्यांची टीम

फूट मसाजरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वतः नियोजन केले आहे. प्रशासन व ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मदतीने पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी फूट मसाजर यंत्रासह टीम तैनात केले आहेत. या टीमचा स्वतः कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी शनिवारी भेटी देऊन आढावा घेतला. टीमच्या ठिकाणी रजिस्टरमध्ये नोंदी व वारकऱ्यांची सेवा सुरू असताना ऑनलाइन फोटो ग्रुपवर अपलोड करण्याच्या सूचनाही सीईओ जंगम यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages