तुम्ही माणसं असून रुग्णांना जनावरासारखी वागणूक का देताय ?
मोहोळ ग्रामीण रुग्णालयातील अस्वच्छता आणि उदासीन कारभार पाहून खासदार संतापल्या
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- तुम्ही अधिकारी आणि कर्मचारी माणसंच आहात मग रुग्णालयातील गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना जनावरांसारखी वागणूक का देताय ? इथे स्वच्छता आणि पाण्याची सोय नसेल तर तुम्ही उपचार तर नक्की काय करताय? इमारतीमधील ठीकठाकांची अस्वच्छता आणि जाळी तुमच्या अकार्यक्षम कारभाराची साक्ष देत आहे तर तुम्ही रुग्णांवर चांगले उपचार करून त्यांच्या जीविताचे रक्षण कसे करणार ? असा संतप्त सवाल सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी शनिवारी दुपारी एक वाजता मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिल्यानंतर व्यक्त केला.सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आणि तब्बल सहा राष्ट्रीय महामार्ग गेलेल्या मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची विविध सोयी सुविधांच्या अभावामुळे होत असलेली हेळसांड होत होती. ही अतिशय गंभीर आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली बाब कानावर गेल्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी आज अचानक मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन स्थानिक नागरिक आणि रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधला.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील विविध विभागातील अस्वच्छता,अस्ताव्यस्तता, पिण्याच्या पाण्याची नसलेली सोय रुग्णांना त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका होऊ शकणारे उघड्या वायरिंगबाबत नाराजी व्यक्त केली. रुग्णालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटरचा बंद असलेला कुलूपबंद दरवाजा उघडायला लावला. तेथील घाणीचे साम्राज्य पाहून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे याबाबत नाराजी व्यक्त करत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्य बेजाबाबदारपणाचा जाब विचारला.
अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची त्वरित हकालपट्टी करून दक्ष कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या सूचना यांनी त्यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून बोलताना दिल्या. त्याचबरोबर पुढील आठवड्यात आवर्जून पुन्हा एकदा या रुग्णालयाला भेट देऊन स्वच्छता आणि अन्य बाबीं बाबत उपायोजना झाल्या की नाही हे तपासून पाहणार असल्याचे त्यांनी सांगीतले.या ठिकाणी स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल त्वरित वरिष्ठांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी बाबर यांना दिल्या. त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची लेखी माहिती उपलब्ध नसल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने यांच्याशी संपर्क साधत मोहोळ ग्रामीण रुग्णालयाबाबतच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. येथील रुग्णालयातील अंतर्गत वायरिंग उघड्यावर असलेले पाहून त्याचबरोबर फिटिंगची अवस्था पाहून मोहोळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी भ्रमणध्वनीवरून फैलावर घेतले. याबाबत त्यांनी त्वरित मोहोळ महावितरण मधील प्रभारी अधिकारी देवकर आणि शहर अभियंता झळकी या अधिकाऱ्यांना ग्रामीण रुग्णालयात बोलावून घेतले आणि आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी नवजात बालकांना देण्यात येणाऱ्या लसीकरण कक्षाची पाहणी केली असता त्यांना धक्काच बसला. त्या ठिकाणी ठीकठिकाणी भिंतीला लागलेली जाळी आणि अस्वच्छता पाहून त्यांचा काहीसा पारा चढला. तुम्ही रुग्णांना अक्षरशा जनावरांसारखी वागणूक देताय असे म्हणत त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.यावेळी खासदार शिंदे यांनी रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशीही संवेदनशीलतेने संवाद साधत तुमच्या देखील अडचणी मांडा, आपण त्या शासन दरबारी मांडून येथील आवश्यक त्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करून आणू असे म्हणत त्यांच्याही अडचणी जाणून घेतल्या. उपजिल्हा रुग्णालय मंजूर असून यासाठीच्या जागा उपलब्धतेच्या शासकीय नियमाची अडचण अधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्रात काही ठिकाणी दीड एकरात शंभर बेडचे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय होत असेल तर मोहोळ मध्ये पन्नास बेडचे दीड एकर जागेत का होत नाही ? याबाबत प्रशासकीय स्तरावरून त्वरित निर्णय होऊन नव्या इमारतीचे काम सुरू व्हावे अशी अपेक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विदुला बाबर,काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शाहीन शेख, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, खासदारांचे स्वीय सहाय्यक हाके, शिवसेना नगरसेवक सत्यवान देशमुख, कृष्णदेव वाघमोडे,नागेश खिलारे,सुरेश शिंदे, कदीर शेख,राजाभाऊ आष्टूळ,बागवान यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
यावेळी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्णभगिनींशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला. यावेळी महिला रुग्णांनी रुग्णालयात पाण्याची सोय नसल्याचे सांगितले. रात्री हॉटेल आणि दुकाने बंद झाल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी सकाळपर्यंत तिष्ठत बसावे लागत असल्याची बाब हतबल होऊन सांगितली.हे ऐकून खासदार प्रणितीताई शिंदे भावुक झाल्या. त्यांनी याबाबत तात्काळ उपायोजना करण्याच्या सूचना स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच खासदार फंडातून त्वरित वॉटर प्युरिफायर बसवून देण्याबाबत संबंधितांना सुचित केले.
चौकट
यावेळी स्थानिक शिवसेना नगरसेवक सत्यवान देशमुख, नागेश खिलारे आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी पोस्टमार्टम रूम पाहण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी जिवंत माणसांना या ठिकाणी सोयी सुविधा मिळत नसतील तर मृत्यू पावलेल्यांना कशा मिळणार ? असा सूचक सवाल त्यांनी उपस्थित केला.या रुग्णालयातील सोयी सुविधांबाबत वरिष्ठ प्रशासन उदासीन असून जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय रुग्णालयांची हीच सुविधा असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. येत्या काही दिवसात होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वांसमोर मांडणार असल्याचे आवर्जून नमूद केले.
0 Comments