नमामि चंद्रभागा योजना कृती आराखड्यास मान्यता
पंढरपूर, (कटुसत्य वृत्त):- नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूर- मंगळ मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रशावेळी नमामि चंद्रभागा योजनेवर आवाज उठवला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून 'नमामि चंद्रभागा' योजनेच्या कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली असून २०२८ पर्यंत कामे पूर्ण करण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली आहे.
आवताडे यांनी विधानसभेत था योजनेची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे निदर्शनास आणून देत याबाबत शासनाने एक कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी केली होती. श्री विठ्ठल दर्शनासाठी येणारे लाखो भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून तेथील तीर्थ प्राशन करतात व नंतरच विठुरायाच्या दर्शनाला जात असतात. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून चंद्रभागेच्या पात्रात असलेली प्रचंड घाण, दुर्गंधी तसेच शेवाळे आणि कचऱ्याचे ढीग यामुळे येथे आलेले भाविक नाराजी करत असल्याचे आमदार आवताडे यांनी निदर्शनास आणून दिले होते.
चंद्रभागा नदी प्रदूषणाची वारंवार निर्माण होणारी गंभीर परिस्थिती लक्षात घेत 'नमामि चंद्रभागा' योजनेच्या कार्यवाहीस गती देण्याची मागणी त्यांनी केली होती. आता शासनाने ३० एप्रिल २०२५ रोजी 'नमामि चंद्रभागा' योजनेच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याचा आदेश काढला आहे. 'नमामि चंद्रभागा' कृती आराखड्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरील कार्यकारी समितीने कृती आराखड्याच्या प्रभावी अंलबजावणीची कार्यवाही करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत. यातील कामे २०२८ पर्यंत : पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
चौकट १
प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई
या आराखड्यानुसार जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९७४ व त्यामध्ये वेळोवळी केलेल्या सुधारणांनुसार तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील तरतुदींनुसार प्रदूषण नियमांचे पालन न करणाऱ्या तसेच प्रदूषणास कारणीभूत ठरणारे उद्योग/ स्थानिक स्वराज्य संस्था / व्यक्ती यांच्यावर कायद्यातील विहीत तरतुदींनुसार आवश्यक कारवाई संबंधित यंत्रणेला करावी लागणार आहे. चंद्रभागा प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करण्याचीही तरतूद यात आहे.
चौकट २
नागरिक व संस्थांचा सहभाग वाढवा
नगरविकास विभागाने नमामि चंद्रभागा प्राधिकरण व नमामि चंद्रभागा अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी घेतलेल्या निर्णयानुसार करावयाच्या उपाययोजना याबाबत संबंधित विभागांनी आवश्यक दक्षता घ्यावी. संबंधित शासकीय कार्यालये/ मंडळे / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी स्थानिक नागरिक, पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, स्थानिक मंडळे, शाळा व महाविद्यालये यांना सदर आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, अशा मार्गदर्शक सूचना शासनाने ३० एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात करण्यात आल्या आहेत.
0 Comments