जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
अक्कलकोट, (कटुसत्य वृत्त):- आपण मतदानरुपी मला जे दान दिले. ते कधीही आयुष्यात विसरू शकणार नाही. त्याची परतफेड ही कामाच्या माध्यमातून मी निश्चित करीन. जनतेच्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी हिळ्ळी बंधाऱ्यात पोहोचले असून या पाण्याचे पूजन आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
आपण केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. ही बाब स्थानिक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंददायी आणि दिलासा देणारी आहे. या आवर्तनामुळे परिसरातील शेतीला मोठा हातभार लागणार असून पाणीटंचाईवर मात करण्यास नक्कीच मदत होणार आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी जलपूजनानंतर उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी भाजप नेते परमेश्वर यादवाड, रामचंद्र अरवत, अण्णाराव यावाजी, सुरेश झळकी, प्रकाश हिप्परगी, सुरेश गड्डी, बाबूराव करपे, सुनील खेड, प्रदीप पाटील, महादेव मुडवे, महादेव दोडयाळे, विवेकानंद उंबरजे, मल्लिकार्जुन हिप्परगी, सागर हिप्परगी, विक्की ईश्वरकट्टी, विठ्ठल विजापुरे, नागू पाटील, गौडमा बिराजदार, बाबूराव कोडते, राजशेखर यादवाड, रायू याबाजी, मल्लिकार्जुन आळगी, नितीन मोरे, नागराज कुंभार, कांतू धनशेट्टी यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments