Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवजयंती मधील नवीन धोका (शिवप्रेमींनो सावधान)

                  शिवजयंती मधील नवीन धोका
                       (शिवप्रेमींनो सावधान)

पाश्चिमात्य प्राचीन तत्ववेत्ता झरतुष्ट्र यांच्या मते आपल्या कार्य कर्तृत्वाचा इतिहास आपण स्वतः लिहिला पाहिजे. अन्यथा विरोधक आपल्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपला प्रेरणादायी जाज्वल्य इतिहास झाकोळला जातो परिणामी विरोधकांच्या विचारांचे व इतिहासाचे आपण वाहक व प्रचारक होतो. एकदा वैचारिक गुलाम झालो की आपलाच इतिहास आपल्या विरोधात सहजपणे वापरला जातो आपला भारतीय इतिहास हजारो वर्षांपासून एका ब्राह्मणी वाळवीने पोखरलेला आहे. भारतीय वेद पुराणे, महाकाव्य, सांस्कृतिक धार्मिक राजकीय इतिहासाचे ठरवून ब्राह्मणीकरण करणारा वर्ग अविरत कार्यरत आहे. बहुजन महामानवांच्या जीवन कार्याचे महत्त्व कमी करणे किंवा त्याचे ब्राह्मणीकरण करणे हाच एकमेव अजेंडा चालू असतो. त्याचवेळी शंभर टक्के ब्राह्मणवादी, वर्णवर्चस्ववादी, विषमतावादी, शोषण वादी, अमानवी कार्य करणाऱ्या ब्राह्मणांना बहुजन समाजासमोर आदर्श महामानव म्हणून उभे करण्यात येते. कोणत्याही ब्राह्मणी दगडाला शेंदूर फासून बहुजन समाजाला त्यासमोर नियमितपणे व जन्मभर नतमस्तक व्हायला लावतात. असे करताना अत्यंत चलाखीने आपले ब्राह्मणीकरण करण्यासाठी आपलेच रक्ताचे नातेवाईक किंवा सहकारी वापरले जातात सध्याच्या काळात ही जबाबदारी आर. एस. एस. च्या माध्यमातून बेमालूमपणे पार पाडण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हाच एकमेव धोका निर्माण झाला आहे. तरी शिवप्रेमी जनतेने सावध राहण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कदाचित आर. एस. एस. वादी भेसळ केली जाऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात घुसडण्यात आलेले बरेचसे ब्राह्मणीकरण खरडून टाकण्यात आपल्याला यश आले आहे. आता शिवजयंतीच्या सार्वत्रिकीकरणाचा गैरवापर करून आर. एस. एस. दुसरे सरसंघचालक डॉ. माधव गोळवलकर यांच्या जयंतीचे व्यापक आयोजन करण्यासाठी लागणारी पूर्वतयारी करत आहे. माधव गोळवलकर यांचा जन्मदिवस १९ फेब्रुवारी १९०६ आहे. एरवी शंभर टक्के सनातनी वेदिक कालगणना वापरणारे आर. एस. एस. शिवप्रेमी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी माधव गोळवलकर गुरुजी यांची जयंती इंग्रजी तारखेनुसार भव्य प्रमाणात साजरी करण्याचा घाट घालत आहे. तेंव्हा सावधान सावधान...

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सत्य चरित्र व त्यांनी केलेले लोककल्याणकारी कार्य सर्वच शिवप्रेमी जनतेला समजावे यासाठी अनेकांनी हातभार लावला आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराज, महात्मा जोतिबा फुले, सयाजी महाराज गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ पंजाबराव देशमुख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख, शाहीर साबळे, मा. म. देशमुख यांनी खूप प्रयत्न केले होते. तर ब्राह्मणवादी इतिहासकारांनी व साहित्यिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कामाचे ब्राह्मणीकरण करण्याचे काम समांतर चालू ठेवले होते. हे अखंड काम आजही चालूच आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी किल्ले रायगड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली १८६९-७० साली हिरा बाग पुणे येथे जगातील पहिली शिवजयंती साजरी केली होती. परंतू ही पहिलीच शिवजयंती निश्चित कोणत्या तारखेला वा तिथीला साजरी करण्यात आली होती?? याबाबत अधिकृत पुरावे उपलब्ध नाहीत. परंतू त्यांनी सुरू केलेल्या शिवजयंती उत्सवाचे स्वरूप पुढील काळात महोत्सवात रुपांतरीत झाले होते. जनतेच्या मनात उत्साह व अभिमान संचारला होता. हळूहळू त्याचा विस्तार झाला. राजर्षी शाहू महाराज यांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा केली. १९२१ मध्ये जागा निवडून भूमीपूजनाचा मोठा कार्यक्रम झाला नंतर देशभरातील विविध राज्यात मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होऊ लागली यातूनच जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील बारकावे समजू लागले. परिणामी महात्मा जोतिबा फुले यांची लोकप्रियता वाढू लागली होती.
त्याचवेळी सत्यशोधक समाजाचे कामही समांतरपणे वाढत होते. बहुजन समाजातील मुले-मुली व विचारवंत समाज सुधारक, सामान्य जनता यांच्या जीवनातील सत्यशोधक समाजाचा प्रभाव वाढत गेला. बहुजन विरुद्ध ब्राह्मण वादाने वेगळेच रूप धारण केले होते. यामुळे बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती उत्सव हायजॅक करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठी प्रथम १८९३ मध्ये गणेशोत्सव तर १८९५ दरम्यान पुणे शहरात शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. महात्मा जोतिबा फुले यांचे निधन झाले होते. त्यामुळे बहुजन नेते केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर यांनी आपल्या परीने शिवजयंती महोत्सव चालू ठेवला होता तर एकीकडे टिळकांनी बहुजन विरुद्ध ब्राह्मण वाद पेटवण्याचे कारस्थान रचले व भारतातील पहिली धार्मिक दंगल घडवून अंमलात आणले होते. एवढेच नाही तर टिळकांनी पुढील काळात शिवजयंती बाबतीत खरी खोटी तिथी व तारीख वाद निर्माण केला होता. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे अस्सल चित्र उपलब्ध नव्हते तरीसुद्धा टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मुस्लिम सहकाऱ्याचे चित्र महाराजांचे म्हणून वापरले. त्याबाबत वाद झाल्यानंतर ते चित्र वापरणे बंद केले छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जन्मतारीख वैशाख शुद्ध तृतीया शके १५४९ ( दिनांक ७ एप्रिल १६२७) की फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (दिनांक १९ फेब्रुवारी १६३०) हा वाद वाढवला स्वतः वैशाख शुद्ध तृतीया ह्या तिथीला शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रम टिळकांनी सुरू ठेवला होता. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रा ऐवजी परशुराम व पेशव्याचे चित्र ठेवून टिळक पूजन करत होते. शेवटी टिळकांच्या ह्या विकृत कृतीमुळे शिवजयंतीच्या वादाने वेगळेच रूप धारण केले. आणि अशा प्रकारे महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केलेला शिवजयंती महोत्सव सन १९०० पासून बंद पाडण्याचे टिळकांचे कारस्थान यशस्वी झाले होते तर एकीकडे टिळकांनी परशुराम व पेशवे जयंती उत्सव चालू ठेवले होते.
इंग्रजांच्या काळात बंगाल मध्ये रविंद्रनाथ टागोर, पंजाब मध्ये लाला लजपतराय, गुजरात मध्ये सयाजीराव महाराज गायकवाड, तसेच झारखंड बिहार ओडिशा आंध्र प्रदेशातील आदिवासी शेतकरी कुर्मी समाजात शिवरायांच्या जीवनावर आधारित काही कार्यक्रम सुरू होते. दरम्यान शिव इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी सन १९३३ मध्ये युरोप मधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अस्सल चित्र आणले आणि रयतेने मोठ्या आनंदाने पुन्हा एकदा सोयीनुसार शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली होती..
परंतू दुर्दैवाने निश्चित खरी जन्मतारीख व तिथी हा वाद मिटलेला नव्हता. टिळक व आर. एस. एस. वादी मोठा ब्राह्मण वर्ग वैशाख शुद्ध तृतीया ह्या तिथीचा आग्रह धरत होते. कारण त्या निमित्ताने परशुराम जयंती व पूजन करता येत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या सरकारने शिवजयंती वाद मिटविण्यासाठी ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब पवार कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली होती. १९६७ दरम्यान ह्या तज्ज्ञ समितीने छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जन्मतारीख उपलब्ध अस्सल पुराव्यानिशी दिनांक १९ फेब्रुवारी १६३० असल्याचे मान्य केले होते. तर अहवाल सादर करताना जन भावनांचा आदर की ब्राह्मण भावनांचा आदर करण्यासाठी रूढ असलेल्या वैशाख शुद्ध तृतीया ह्या तिथीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जावी असा महत्वपूर्ण शेरा दिला होता आणि अशा प्रकारे स्वतंत्र भारतातील संयुक्त महाराष्ट्राच्या सरकारने अप्रत्यक्षपणे शिवजयंती वाद ज्वलंत ठेवला होता. यामध्ये निश्चितच ब्राह्मणी षडयंत्र होते. एवढेच नाही तर दरवर्षी शिवजयंतीच्या उत्सवात धार्मिक वा जातीय दंगल घडवून आणायची जबाबदारी संपूर्णपणे पार पाडण्यात आली होती. यातूनच प्रामाणिक व अती उत्साही शिवप्रेमी युवकांनी आपापल्या सोयीनुसार शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली व चालू ठेवली. चार चार वेळा शिवजयंती साजरी केली जाऊ लागली महाराष्ट्र राज्यात तर महाराष्ट्र राज्याबाहेर शिवजयंती साजरी करणे जवळजवळ बंद झाले होते. शालेय ते महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी युवक यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जन्मतारीख शिकविली जात नव्हती. आर. एस. एस. ला पाहिजे असलेला गोंधळ शिवजयंतीच्या वादाने दंगलीत रुपांतरीत झाला होता.
मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सन १९९४ पासून जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेड राजा व शिवजयंती महोत्सव किल्ले शिवनेरी येथे साजरा करण्यास सुरुवात केली होती. ह्या वेळेपर्यंत शिवजयंती किल्ले शिवनेरीवर साजरी केली जात नव्हती. शासनाच्या वतीने शिवरायांना अभिवादन करून जून्नर शहरी राजकीय सभा घेतली जात असे. तेंव्हा असे लक्षात आले की जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा हिंदू तिथी व इंग्रजी तारीख असा घोळ निर्माण करुन ठेवला आहे. दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव तिथीनुसार साजरे केले जातात. आणि दरवर्षी तिथी इंग्रजी महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना येते. त्यामुळे जगभरातील शिवप्रेमी जनतेला सामुदायिक पद्धतीने एकाच वेळी हे जन्मोत्सव साजरे करता येत नाहीत. दुसरे असे की भारतीय पंचांग व तिथी प्रामुख्याने पौराणिक हिंदू धर्म धार्मिक विधी व सण यासाठी वापरले जातात. तर जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज हे मध्ययुगीन काळात होऊन गेलेल्या जागतिक इतिहासातील जगन्मान्य महामानव होते. हिंदू तिथीनुसार जन्मोत्सव साजरे करण्याने फक्त मर्यादित हिंदू शिवप्रेमी सहभागी होत होते. जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव जगभरातील शिवप्रेमी जनतेला सामुदायिक पद्धतीने एकाच दिवशी साजरा करण्यासाठी हे दोन्ही दिवस आंतरराष्ट्रीय कालगणना नुसार निश्चित होणे अत्यावश्यक होते. जिजाऊ जन्म तारीख पौष पौर्णिमा शके १५२० दिनांक १२ जानेवारी १५९८) बाबतीत दुमत नव्हते. त्यामुळे जिजाऊ जन्मोत्सव जिजाऊ प्रेमी जनता ह्या तिथीला साजरा करत असे. मराठा सेवा संघाने तिथी ऐवजी तारीख स्विकारून १९९६ पासून १२ जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. आज ही बारा जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव तारीख जगन्मान्य झाली आहे सर्वांचेच अभिनंदन व शुभेच्छा ..
त्याचवेळी आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या जन्मतारखेचा शोध घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी किल्ले शिवनेरी वर झाला होता. हे ऐतिहासिक सत्य समोर आले आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून प्रथमच सन १९९७ मध्ये किल्ले शिवनेरी वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात येऊन प्रत्यक्षात आणला. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव किल्ले शिवनेरी वर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून भव्य मंडप उभारून व शाहिरांच्या पोवाड्यांनी सर्वप्रथम साजरा करण्यात आला होता. जनसामान्य शिवप्रेमी जनतेला आनंद झाला होता तर काही उच्च पदस्थांनी नाके मुरडत आक्षेप घेतले होते. ह्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघ पदाधिकारी मधुकरराव कोकाटे व निर्मल कुमार देशमुख यांनी १९९८ शिवजयंती शिवाजी पार्क दादर मुंबई येथे साजरी करण्यात येईल असा प्रस्ताव दिला. परंतू दुर्दैवाने ते जमले नाही आम्ही १९ फेब्रुवारी १९९८ रोजी किल्ले शिवनेरी वरील नगारखाना मधील देवळीत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ठेवली. शिवजयंती साजरी केली. आमच्यावर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आणि शिवरायांची मूर्ती जप्त केली हाच प्रकार १९९९ मध्ये घडला तिन्ही वेळा एसपी व पीआय मराठाच होते. हे विशेष ह्या तिथीला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून वैशाख शुद्ध तृतीया तर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून १९ फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरी वर शिवजयंती साजरी केली जात असे हा प्रकार सुरुच होता.

दरम्यान सन १९९५ विधानसभा निवडणुकीत मराठा सेवा संघाच्या संस्थापक कार्यकर्ता रेखाताई खेडेकर चिखली विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या त्यांना शिवजयंती वाद माहीत होता. १९९९ मध्ये रेखाताईंनी शिवजयंतीच्या तिथी व तारखेचा वाद तसेच त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची होत असणारी अप्रत्यक्ष बदनामी याबाबत विशेष ठराव विधानसभेत दाखल केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतारीख संबंधित अनेक अस्सल पुरावे सादर केले होते. महत्वाचे म्हणजे या ठरावाला सर्वच पक्षांच्या आमदारांनी एकमुखी पाठींबा दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रेखाताई खेडेकर यांनी मांडलेला छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिवस फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० असल्याचे मान्य करून शासन निर्णय काढला जाईल असे जाहीर केले होते अशा प्रकारे मराठा सेवा संघ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारीख नक्की करण्याचा प्रमुख लढा पहिल्या टप्प्यात जिंकला होता. आता महाराष्ट्र शासनाच्या पाठीमागे लागून शिवजयंतीच्या तारखेचा शासकीय आदेश काढून घेणे आवश्यक होते. परंतू शिवसेनेचे मुख्यमंत्री आर. एस. एस. च्या आग्रहाखातर हिंदू तिथी टाळून इंग्रजी तारीख जाहीर करण्यात टाळाटाळ करत होते. यातच मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिला. मध्यावधी निवडणुका होऊन स्मृती शेष विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तर स्मृती शेष प्रा. रामकृष्ण मोरे सर सांस्कृतिक कार्य मंत्री झाले. रेखाताई खेडेकर पुन्हा चिखली विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या त्यांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला होता. डिसेंबर १९९९ मधील हिवाळी अधिवेशन नागपुरात असताना आम्ही दोघे नवरा-बायको मुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री यांना भेटलो. परंतु दुर्दैवाने विलासराव व मोरे सर आर. एस. एस. चे लोक दंगली घडवून आणतील ह्या भीतीपोटी आदेश काढण्यास तयार नव्हते. एके दिवशी अचानक आमची व मंत्री मा रोहिदास पाटील यांची भेट झाली शिवजयंती विषयावर चर्चा झाली त्यांना माहिती दिली. आम्ही तिघे तसेच थेट मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कडे गेलो. योगायोगाने रामकृष्ण मोरे सर तेथेच भेटले रोहिदास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून सर्व लोकांना बाहेर जाण्यास सांगितले आणि आम्ही पाच जण आत थांबलो काही सोपस्कार न करता रोहिदास पाटील सरळ विलासराव व मोरे सर वर भडकले हा आदेश काढल्याने तुम्ही एका इतिहासाचे निमति होणार आहात घर बसल्या तुम्हाला ही संधी उपलब्ध झाली आहे. रेखाताईंनी विधीमंडळात ठराव मंजूर करून घेतला आहे. त्या आर. एस. एस. ला घाबरत नाहीत. तुमच्या वर फक्त आदेश काढण्याची जबाबदारी आहे. ती पूर्ण करावी अन्यथा आम्हाला त्या खूर्चीवर बसवा अशी वादावादी झाली होती. आणि नंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हसत हसत शिवजयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात यावी असे आदेश दिले व मी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवनेरी गडावर येतो असे सांगितले.
१७ व १८ फेब्रुवारी २००० रोजी रात्री उशिरापर्यंत आम्ही ठाणे येथून शिवनेरी गडावर शिवरायांची नवीन मूर्ती, लोखंडी गेट, शोभेचे सामान अन्य साहित्य व मिस्त्री घेऊन आलो होतो आम्ही तेथे लोखंडी गेट बसवून मूर्ती स्थापित केली. उत्तम रंगरंगोटी केली नगारखाना इमारतीवर स्टेनलेस स्टीलचे शिवदीप नाव लावले आमच्या सोबत माझे पोलीस अधिकारी मित्र मा टि एस भाल होते. जुन्नर येथे मुस्लिम समाजातील शेख पीआय होते. पुरातत्व विभागाने तक्रार दाखल केली होती. त्यामुळे ते गडावर आले होते परंतू भाल साहेबांना पाहून त्यांनी सॅल्यूट मारला आम्ही त्यांना उद्या शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवरायांची मूर्ती स्थापित केली आहे असे सांगितले. यापूर्वीही अनेक वेळा आम्ही मूर्ती बसवली होती पण पोलिसांनी जप्त केली होती ही कहाणी पीआय शेख यांना माहीत होती तर मूर्त्या पोलीस स्टेशनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले आणि आता असे होणार नाही याची खात्री देत शेख यांनी रक्षणाची जबाबदारी घेतली. १९ फेब्रुवारी २००० रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान मुख्यमंत्री विलासराव देशमुख शिवनेरी गडावर आले. आम्ही सर्व पुढे जाऊन त्यांच स्वागत केले. आणि त्यांना आमच्या सोबत घेऊन सरळ आम्ही स्थापित केलेल्या नगारखाना येथील शिवरायांच्या मूर्ती कडे आलो. तेथे पाळण्यात बाल शिवबा मूर्ती व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी होत्या, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पूजन करून दर्शन घेतले. अतिशय सुंदर व शांततेत मनासारखा कार्यक्रम संपन्न झाला मुख्यमंत्री निवांत होते. आता पुढे काय?? असे विचारत आम्हाला घाई नसल्याचे विलासराव म्हणाले. थोड्या वेळाने मराठा सेवा संघाच्या मंचावर आले. पोवाडे ऐकले. शाहिरांना शाबासकी दिली. प्रोत्साहन दिले. मराठा सेवा संघ व आमदार रेखाताई खेडेकर यांच्या कामाचे मनापासून कौतुक केले होते. रेखाताई खेडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद मिटविण्यासाठी खूप धडपड केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी देखील एका इतिहासाच निर्माण केला आहे. माझ्या हस्ते १९ फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरी गडावर शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी केली जात आहे. हा एक इतिहास आहे. हे सर्व खरे असले तरी यांचे सारे श्रेय रेखाताई खेडेकर यांचेच आहे. असे मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणाले होते. अशा प्रकारे शिवनेरी गडावर शिवरायांची जयंती मराठा सेवा संघाच्या माध्यमातून साजरी करण्याची सुरुवात झाली आहे. माझी विनंती आहे की, एड राजेंद्र बुट्टे पाटील, इंजि राजेंद्र कुंजीर, एड सुनिल बांगर, इंजि दिपक पाटील, इंजि विजय पाटील व अन्य सहकारी मित्रांनी हा सविस्तर इतिहास लिहून प्रकाशित करावा. भांडारकर प्रकरणाचा इतिहास लिहिला नाही. दादू कोंडदेव हटाव मोहिम यशस्वी झाली पण इतिहास नाही गडकरी पुतळा हटवला पण इतिहास नाही. वाघ्या कुत्रा व सत्य हा इतिहास नाही. आम्ही इतिहास निर्माण करतो, पण लिहित नाही. आमच्या शाहिरांनी संशोधकांनी, ललित साहित्यिकांनी कलाकारांनी, नाटककारांनी चित्रपट निर्मात्यांनी व चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी व नेते यांनी आपापल्या परीने हा वर्तमानातील सत्य इतिहास जगासमोर मांडला पाहिजे अशी अपेक्षा आहे. ह्या इतिहासाचे साक्षीदार व निर्माते आज जिवंत आहेत. तोपर्यंत सत्य लिहिले पाहिजे. चित्रपटांचे विषय आहेत कोणी ते केले पाहिजे. अन्यथा आपल्या नव्या पिढीला आपला इतिहास माहीत असणार नाही असे मला वाटते. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या सत्य इतिहासातील जास्तीत जास्त सत्य जगासमोर आणण्यासाठी जीवाचे रान केले आहे. आम्ही डॉ. अमोल कोल्हे प्रती अखंडपणे कृतज्ञ राहिले पाहिजे अशी अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अनेक व्यावसायिक व औद्योगिक व्यावहारिक संस्था कार्यरत आहेत. अशा संस्थांनी पुढाकार घेऊन मराठा इतिहास संशोधक व कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे अशी विनंती आहे. वाचकांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या माध्यमातून या विषयावर सकारात्मक विचार अशा अधिकारी समुहाकडे मांडावा जगभरातील सर्वच शिवप्रेमी जनहो आज २०२३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारी रोजी सर्व दूरपर्यंत वाडी, वस्ती, गाव, पाडा, तांडा वस्तीवर, नगर, शहर, महानगर, देश, परदेशात, लाखो संस्था मोठ्या प्रमाणात साजरा करत आहेत. ही अभिमानास्पद व गौरवशाली बाब आहे. आर. एस. एस. देखील शिवजन्मोत्सव सर्वच ठिकाणी व ताकदीनीशी साजरा करत असल्याचा आभास निर्माण करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठा धोका समजून घेणे आर. एस. एस. चे दुसरे सरसंघचालक डॉ. माधव गोळवलकर गुरुजी यांचा जन्मदिवस १९ फेब्रुवारी १९०६ आहे. थोडक्यात शिवजयंती तसेच गोळवलकर गुरुजी जयंती तारीख १९ फेब्रुवारी ही एकच आहे. आर. एस. एस. सनातनी हिंदू कालगणना मानतात. परंतू छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव भ्रष्ट करण्यासाठी आर. एस. एस. संयुक्त जयंती साजरी करण्याच्या नावाखाली शिवजन्मोत्सवात गोळवलकर जयंती घुसविण्याचे कारस्थान पार पाडू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी माधव गोळवलकर गुरुजी यांनी जन्म घेतला होता. अशी मखलाशी आर. एस. एस. चे भाट करु शकतात. शिवप्रेमी जनहो. हा एक महत्त्वाचा इशारा आहे. सावध रहावे हीच नम्र विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्ताने खूप खूप अभिनंदन व पुढील काळात सदिच्छा.
अॅड. इंजि. पुरुषोत्तम खेडेकर, संस्थापक अध्यक्ष
मराठा सेवा संघ, चिखली, जि.बुलडाणा.
Reactions

Post a Comment

0 Comments