रोहित पवारांचा आरक्षणासंदर्भात फडणवीसांना टोला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येत्या चार महिन्यांमध्ये महापालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार दिवाळी हंगामात महापालिका निवडणुका होतील. आगामी महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर व तसेच राज्य पातळीवर महाविकास आघाडी करून लढायचे की स्वबळावर लढायचे याबाबत स्पष्ट भूमिका करताना महाविकास आघाडीत काँग्रेस हा मोठा भाऊ आहे. मोठया भावाने लहान भावाला जर सन्मानाने वागणूक दिली.तर महाविकास आघाडी होऊ शकते. मात्र मोठया भावाने मानसन्मान न देता, कुरघोडी केली तर आम्ही देखील कुरघोडी करण्यास सज्ज असल्याची स्पष्ट भूमिका आ. रोहित पवार यांनी आज सोलापुरात स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले, छगन भुजबळ यांना यापूर्वीच मंत्रिमंडळात घेणे अपेक्षित होते. मात्र भाजपातील नेत्यांनी केलेल्या विरोधामुळे त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली. परंतु आता अनायसे वेळ जुळून आल्याने त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता आली. मात्र विरोधी पक्षात असताना भाजपने छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र महायुती सरकारमध्ये आल्यानंतर भुजबळ यांच्यावर भाजपने चकार शब्द काढलेला नाही. तसेच भुजबळ यांनीही ओबीसी आरक्षणावर भाजप विरोधी वातावरण निर्माण केले होते. परंतु तेही ओबीसी आरक्षणावर कोणतेही वक्तव्य करत नाहीत.छगन भुजबळ हे ओबीसीचे मोठे नेते आहेत. आगामी निवडणुकीमुळे भुजबळांना मंत्री पद मिळाले. जे भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करायचे आता त्यांच्याजवळ जाऊन भुजबळ बसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. खासदार संजय राऊत हे बोलत असतात, मात्र शरद पवारांचे स्टेटमेंट अनुभवातून आहे.संजय राऊत यांचे स्टेटमें वातावरण बघून किंवा लोकांमध्ये काय चर्चा आहे ते बघून असते. असे सांगून जूनच्या पहिल्या आठवडयात राष्ट्रवादी शरद पवार पक्षात मोठे बदल होण्याचे संकेत त्यांनी दिले. धनगर आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, बारामतीत धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासंदर्भात आंदोलन झाले. त्यावेळेस फडणवीस हे मुख्यमंत्री नव्हते. तेंव्हा पहिल्याच कॅबिनेटमध्ये आपण आरक्षणाचा विषय मार्गी लावू असे म्हटले होते. मात्र कदाचित अद्यापही त्यांची पहिली कॅबिनेट झाली नसावी असा मार्मिक टोला त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, कार्याध्यक्ष सरफराज शेख, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण,लता ढेरे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments