Hot Posts

6/recent/ticker-posts

‘जनहित’चे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

 ‘जनहित’चे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन




मोहोळ (कटूसत्य वृत्त) : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामातील उसाचा दर ४,००० रुपये प्रतिटन तात्काळ जाहीर करावा, तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने आर.आर.सी. कारवाई सुरू असतानाही गाळप कसे सुरू केले, याची चौकशी करावी, या मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने ८ डिसेंबरपासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू होऊन सव्वा महिना उलटला असून, काही अपवाद वगळता कोणत्याही कारखान्याने अद्याप नियमाप्रमाणे उसाचा दर जाहीर केलेला नाही. कर्नाटक, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखानदारांचा आदर्श घेऊन सोलापूरातील कारखान्यांनी त्वरित उसाचा दर जाहीर करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने मागील वर्षीची थकित बिले न दिल्याने तहसीलदारांनी आर.आर.सी. कारवाई केली आहे. तरीसुद्धा या कारखान्याने गाळप हंगामाचा शुभारंभ बेकायदेशीररीत्या कसा काय केला, याबाबत तपास व्हावा, अशी मागणीही करण्यात आली.
तसेच कारखान्याची चौकशी करण्याची जबाबदारी असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार व साखर सहसंचालक गप्प का आहेत, याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.कोल्हापूर जिल्ह्यात ३२०० ते ३४०० रुपये प्रतिटन उसाचा दर दिला जात असताना, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना तो का परवडत नाही, असा प्रश्नही प्रभाकर देशमुख यांनी उपस्थित केला.

या आंदोलनात रामभाऊ पाटील, नाना मोरे, नाना रणदिवे, बजरंग शेंडेकर, गणेश चवरे, मानाजी चवरे, समाधान रणदिवे, राजाभाऊ पवार, विजय तळेकर, उमेश माने, पिंटू पवार, बंडू बाबर, मुकुंद काळे, सचिन कांबळे, आप्पा भुई आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.




Reactions

Post a Comment

0 Comments