Hot Posts

6/recent/ticker-posts

रेल्वे स्थानकावर वाढवली सुरक्षा यंत्रणा

 रेल्वे स्थानकावर वाढवली सुरक्षा यंत्रणा

सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर स्थानकावर सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली असून संशयित वस्तू आणि प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिसांची करडी नजर असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांनी सांगितले.

देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या सोलापूर रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. दक्षिणेला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या सोलापूर रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानकडून गुरुवारी ड्रोनद्वारे भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. परंतु भारतीय वायुदलाने हवेतच त्यांचे ड्रोन नष्ट करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सीमेपलीकडून भारतात अतिरेकी घुसविण्याचा नापाक प्रयत्नही पाकिस्तानाकडून होत आहे. त्यामुळे देशभरातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक, विमानतळ, प्रमुख शैक्षणिक संस्था आणि सैन्य दलाचे केंद्र आदी परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे.

तीन दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुंबईतील प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक व्यापक मॉक ड्रिलचे यशस्वीरीत्या आयोजित केले होते. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे हवाई हल्ल्याचा सायरन सक्रिय करणे, त्यानंतर प्रवासी व नागरिक खबरदारीचे उपाय करून त्यांची सुरक्षितता कशी करू शकतात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, ज्यामध्ये अशा सूचनांदरम्यान धोका कमी करण्यासाठी जमिनीवर झोपण्याची स्थिती घेण्याची योग्य पध्दत समाविष्ट होती. शिवाय, मॉक ड्रिलमध्ये जखमी व्यक्तीला स्ट्रेचरशिवाय सुरक्षितपणे उचलून नेण्याचे आणि काळजीपूर्वक नेण्याचे व्यावहारिक प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, जेणेकरून पीडितांना जलद आणि सुरक्षितपणे जवळच्या रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधेत पोहोचवता येईल. आणखी एक महत्त्वाची परिस्थिती ज्यावर लक्ष केंद्रित केले गेले ते म्हणजे गंभीर रक्तस्राव व्यवस्थापन. गंभीर दुखापतींमध्ये रक्तस्राव कमी करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी जीवनरक्षक तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविले.

या सरावात अग्निसुरक्षा प्रोटोकॉल देखील समाविष्ट करण्यात आले. अग्निशामक यंत्र नसताना आगीच्या आपत्कालीन परिस्थिती कशा हाताळायच्या, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पर्यायी पध्दती कशा वापरायच्या याचे प्रात्यक्षिक सहभागींनी दाखविले. याव्यतिरिक्त, विविध प्रकारच्या आगींना सामोरे जाण्यासाठी अग्निशामक यंत्रांचे योग्य ऑपरेशन दाखवण्यात आले, ज्यामुळे रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी दोघेही प्रभावीपणे प्रतिसाद देण्याकरिता सुसज्ज आहेत याची खात्री झाली.

Reactions

Post a Comment

0 Comments