'उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची चाचणी येत्या बुधवारी होणार
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम केवळ ७५ मीटर राहिले असून ते दोन दिवसात पूर्ण होईल. त्यानंतर येत्या बुधवारी या जलवाहिनी कामाची चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, शहरात हॉकर्स झोन निश्चित करून पथविक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे एकूण ११० किलोमीटरपैकी शेवटचे केवळ ७५ मीटरचे काम शिल्लक आहे, तेही येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. तशा स्पष्ट सूचना संबंधितांना दिल्या आहेत. त्यानंतर येत्या बुधवारी जलवाहिनी चाचणीचे काम करण्यात येणार आहे. मोडनिंब येथील हे काम संपले आहे. शेतकऱ्यांच्या अडथळ्यामुळे अडचण आली होती. आता काम सुरू आहे, असे आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील पाणीपुरवठा संदर्भातील ८८२ कोटींच्या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील ३०० कोटींच्या कामांचा नवा आराखडा तयार करण्यात येत आहे. ती प्रक्रिया सुरू केली आहे. महिनाभरात हा आराखडा तयार होईल. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. कोणत्या तारखेला किती पाणी येईल. कुठून येईल याचा आढावा यामध्ये घेतला जात आहे. एका विभागात पाणी सोडले तर दुसऱ्या टप्प्यातील पाणी इतर विभागात जाऊ नये. वॉल्व्ह बंद केला की पाणी पुढे जाऊ नये यासंदर्भातही नियोजन करण्यात येत आहे. सर्व कनिष्ठ अभियंता यासंदर्भात नियोजन करत आहेत. टेंडर झाले आहे. आराखड्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही डॉ. ओम्बासे यांनी सांगितले.
महापालिकेतील बोगस बांधकाम परवाना प्रकरणातील २७ जणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. या सर्व बांधकाम धारकांना महापालिकेकडे बांधकाम परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते. त्यापैकी केवळ सहा जणांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. या ऑनलाइन अर्जांवर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता पुढील कार्यवाही करणार आहेत. संबंधित जागेवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी आणि मोजणी करण्यात येणार आहे. नियमानुसार बांधकाम केले आहे की नाही याची तपासणी करून फोटोही घेण्यात येतील. नियमानुसार कार्यवाही केली जाईल.
नियमानुसार बांधकाम नसल्यास आवश्यकतेनुसार पाडकाम करण्यात येईल. दरम्यान, या प्रकरणातील ज्यांनी ऑनलाइन अर्ज भरले नाहीत त्यांना येत्या आठ दिवसात ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करावी, अन्यथा पाडकाम करण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे संबंधितांना संधी दिली जात आहे. संधी देऊनही प्रतिसाद दिला नाही तर पाडकाम करावेच लागणार आहे. ते पाडावे लागणारच आहे, असेही यावेळी आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी स्पष्ट केले.
चौकट १
रस्त्यावरील वाढते अतिक्रमण; लवकरच हॉकर्स झोन निश्चित
सोलापूर शहरात रस्त्याच्या कडेला फूटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणा-यांची संख्या वाढली आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. या सदर्भात विचारले असता रस्त्यावरील वाढते अतिक्रमण पाहता लवकरच हॉकर्स झोन जाहीर करण्यात येणार आहेत. सोलापूर शहरात सुमारे ६ हजार पथविक्रेते आहेत. या संदर्भात मागील आठवड्यात बैठक झाली. पथविक्रेता समिती गठीत करण्यात आली आहे. राहिलेले प्रतिनिधीही नेमले आहेत. रस्त्यावर अतिक्रमण वाढू नये यासाठी हॉकर्स झोन करण्यात येणार आहेत. प्रत्येक पथविक्रेत्यांना ओळखपत्र दिले जाईल. पाच बाय चार फूट इतकी जागा निश्चित केली जाईल. जागा मार्किंग करून जिओ टॅग करण्यात येणार आहे. दोन महिन्यानंतरही प्रक्रिया पार पाडली जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले.
चौकट २
पनाश टॉवरप्रकरणी चौकशी अहवाल लवकरच
विजापूर रोडवरील बहुचर्चित पनाश टॉवर बांधकामप्रकरणी चौकशी पूर्ण झाली आहे. महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी ही चौकशी केली आहे. दरम्यान, या समितीमध्ये नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याकडून अहवाल तयार करण्यात येत आहे. लवकरच तो सादर होईल, असे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यानी सांगितले.
शासन अनुदान खर्चाचे ऑडिट करण्याच्या सूचना
सोलापूर महापालिकेला केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान मिळते. सोलापूर महापालिकेत त्याचे प्री ऑडिट होते. मात्र, पोस्ट ऑडिट होत नाही. किती अनुदान आले ? किती खर्च झाला? शिल्लक किती? या संदर्भात ऑडिट होणे आवश्यक आहे. या संदर्भात विचारले असता अनुदान जमासाठी फार्म १३ तर खर्चासाठी फार्म १४ भरण्यात येतो. त्यानुसार मागील वर्षाचे ऑडिट करून घ्यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या आहेत.
0 Comments