जिवंत देखावे ठरले लक्ष्यवेधी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त नॉर्थकोट मैदान ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढली. ढोल- ताशांच्या गजरात आणि पिवळ्या फेट्यांच्या साक्षीने शोभायात्रेत अहिल्यादेवी होळकर, मल्हारी मार्तंड, म्हाळसा आणि बानू यांच्या रूपातील जिवंत देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ही शोभायात्रा अहिल्यादेवींच्या कार्याला आणि विचारांना केलेला मानाचा मुजराच ठरली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त यात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. उमेश काकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, अध्यासन केंद्राचे संचालक प्रभाकर कोळेकर, वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक श्रीकांत अंधारे सहभागी झाले.
चौकट १
राजमाता अहिल्यादेवींचा सजीव देखावा
सोलापूर विद्यापीठाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवींच्या रूपातील कलाकाराने साधी पण तेजस्वी वेशभूषा, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात शिवपिंड धारण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव, करारी नजर आणि आत्मविश्वासपूर्ण देहबोलीतून प्रत्यक्ष अहिल्यादेवीच साकार झाल्याचे या शोभायात्रेतून दिसत होते.
चौकट २
खंडोबा आणि त्यांच्या पत्नींचे प्रभावी देखावे
खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड आणि त्यांच्या पत्नी म्हाळसा व बानू यांचे देखावेही प्रभावी होते. मल्हारी मार्तंडांच्या रूपातील कलाकाराने हातात खड्ग, भंडारा आणि घोड्यावर स्वार होऊन पराक्रमाचे दर्शन घडवले. म्हाळसा आणि बानू यांच्या रूपातील कलाकारांनी पारंपरिक वेशभूषा आणि अलंकारांनी सर्वांना मोहित केले.
0 Comments