बिल काढण्यासाठी लाचेची मागणाऱ्या बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकावर गुन्हा
| सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कामाचे बिल काढण्यासाठी ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सोलापूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. शंकर काशीनाथ कवठे (रा.सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या त्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार हा पीडब्ल्यूडी येथील मक्तेदार आहे. त्यांनी दक्षिण सोलापूरतालुक्यातील मौजे हत्तुर येथील चर्मकार वस्ती येथे भूमिगत गटार व सिमेंट रस्ता करणे असे काम केले होते. या कामाचे एकूण बिल हे ४ लाख २४ हजार ७५९ रुपये इतके आहे.
त्या बिलापैकी २ लाख ५० हजार रुपयांचे बिल काढून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक शंकर कवठे याने तक्रारदार यांच्याकडे साहेबांच्या नावाने ५ हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. याबाबत सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे येथील पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, खराडे, यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी चौकशी व तपास केला असता आरोपीने लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे दिसून आले.
आरोपी विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ आणि ७ अ प्रमाने गुन्हा दाखल केला याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीस ताब्यात घेतले आहे.
0 Comments