शहरात महापालिकेच्या जागांवर होणार सफाई कामगारांची घरे
सोलापूर / (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेतील सफाई कामगारांना घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी होत असताना महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) घरे बांधण्याचा प्रस्ताव यापूर्वी तयार करण्यात आला होता. त्याच्यावर कार्यवाही देखील सुरु होती. मात्र आता सफाई कामगारांसाठी बीओटी प्रणाली अंतर्गत ही घरे उभारण्या संदर्भातील प्रक्रिया महापालिकेच्या प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे.
शहरात सध्या विविध ठिकाणी एजन्सीमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वसाहती उभारण्यात येत आहेत. सुमारे ३० हजार घरांचा प्रकल्प सुरु आहे. यामधूनच महापालिकेच्या सफाई कामगारांना घरांचे प्रकल्प उभारण्यात येणार होते. मात्र प्रशासनाने आपला निर्णय बदलला आहे. सोलापूर शहरात विविध ठिकाणी बीओटी प्रणाली अंतर्गत व्यापारी संकुल आणि परवडणारी घरे उभारण्याबाबत विकासक, नागरिकांची मते जाणून घेण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर प्रसिध्दीकरण करण्यात आले आहे.
शहरातील सात रस्ता येथील शासकीय मालकीच्या असलेल्या २ एकर १४ गुंठे इतक्या भूखंडावर महापालिकेच्या सफाई कामगारांसाठी बीओटी अंतर्गत २५३ सदनिका बांधण्याचा प्रस्ताव आहे. बुधवार पेठ येथील महापालिका मालकीच्या भूखंडावर सफाई कामगारांसाठी बीओटी अंतर्गत सदनिका बांधणे आणि रविवार पेठ परिसरातील २५६ गाळा येथे महापालिकेच्या जागेवर महापालिकेच्या कामगारांसाठीच सदनिका बांधण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला.
पुढील प्रक्रिया राबविण्यापूर्वी यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेणे महत्त्वाचे असल्याने यासाठी जाहीर प्रसिध्दीकरण करण्यात आले. याच अनुषंगाने ११ मे रोजी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृह येथे संबंधित योजनांचे सल्लागार, आर्किटेक्ट, एजन्सी, कन्सल्टंट यांच्यामार्फत सादरीकरण करण्यात आले. व्यावसायिक विकास तसेच शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून प्रस्तुत योजनांबाबत अभिप्राय सुधारणा व मते या बैठकीत जाणून घेण्यात आली.
गुरुवार, १४ मे रोजी पर्यंत महापालिकेच्या ३८ीलॅ. २०' से ईमेल आयडीवर अथवा नगर अभियंता कार्यालयकडे नागरिकांनी आपले अभिप्राय, सुधारणा व मते सादर करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे. यानंतर मात्र महापालिका प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया करण्यात येऊन लवकरात लवकर महापालिकेच्या सफाई कामगारांना बीओटी अंतर्गत घरे बांधण्याची कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले.
0 Comments