सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदाच्या वर्षी मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यांत दमदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्ट महिना संपत आला तरी अजूनही पाऊस थांबलेला नाही. नदी, नाले, ओढे भरून वाहत असतानाच उजनी, हिप्परगा तलाव शंभर टक्के भरल्याने पुढच्या उन्हाळ्याच्या सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
ऑगस्ट महिन्यात उत्तर तालुक्यात सर्वाधिक सरासरीच्या २१० टक्क्यांपेक्षा अधिकपाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस करमाळ्यात ९१ टक्के इतका पडला आहे. सोलापूर जिल्ह्याचा ऑगस्ट महिन्याचा सरासरी पाऊस १०७.५ मि.मी. इतका आहे. महिन्याची सरासरी पावसाने ऑगस्ट पहिल्या पंधरवड्यातच ओलांडले असून, खरीप पिके मात्र संकटात सापडली आहेत.
आता परतीच्या पावसाची भीती
खरीप हंगामातील पावसाचे नक्षत्र संपले असून, आता परतीच्या म्हणजे रब्बी हंगामातील पिकांसाठीच्या नक्षत्रातील पावसाला सुरुवात झाली आहे. मघा नक्षत्रातील पावसानंतर हरभरा, ज्वारी, करडई पिकांच्या पेरणीची तयारी केली जाते. परतीचा पाऊसही जोरदार झाल्यास रब्बी हंगामाच्या पेरणीवर परिणाम होण्याबरोबरच खरिपातील सोयाबीन, तूर, कांदा, सूर्यफूल या पिकांची अतोनात नुकसानीची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
जिल्ह्यात सरासरी १७१ मि.मी. पाऊस
उत्तर सोलापूर तालुक्यात २८१ मि.मी. (२१० टक्के) दक्षिण सोलापूर २६७ मि.मी. (१८१ टक्के), बार्शीत २१० मि.मी. (१६८ टक्के), अक्कलकोट २३५ मि.मी. (१७२ टक्के), मोहोळ १७७ मि.मी. (१६४ टक्के), माढा १५५ मि.मी. (१३७ टक्के), करमाळ्यात ८८ मि.मी. (२१ टक्के), पंढरपूर २६ मि.मी. (११३ टक्के), सांगोल्यात १४४ मि.मी. (१५१ टक्के), माळशिरस १२०मि.मी. (१५४ टक्के) तर मंगळवेढा १२९ मि.मी. (१४३) टक्के) असा एकूण १७१ मि.मी. (१५९ टक्के) पाऊस.
0 Comments