फडणवीस सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम, एकदा निघालो तर थांबणार नाही
मनोज जरांगेंची डरकाळी, प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार
बीड (कटूसत्य वृत्त):- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक झाले आहेत. आरक्षणासाठी चलो मुंबई या त्यांच्या मोर्चाला सुरुवात केली आहे.
या मोर्चासाठीची, आंदोलनाची तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने मोर्चा रवाना होणार आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाड मैदानावर मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांसह आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वी आज (२५ ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोर्चाचा आराखडा सांगितला. आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मराठा आरक्षणाचा गुल्ला उधळूनच परतणार
आम्हाला वाहतूक कोंडी करायला जायचे नाही. मुंबईमधील कोणताही एक रस्ता आम्हाला द्या. आम्हाला न्यायासाठी द्यायला जायचेय. कुणाला त्रास व्हायचा म्हणून आम्ही जात नाही. आम्ही चाकण मार्गे जात आहोत. कल्याण मार्गे जात नाही. आताच काही लोकं आझाद मैदानावर गेल्याचे समजलेय, असे मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेमध्ये म्हटले.
जरांगे पाटील म्हणाले, 'आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत, हा जीआर आम्हाला मंजुरीसह हवाय. त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हैदराबादचे गॅझेट आम्हाला लागू केलेले हवं आहे. त्यावर अभ्यास सुरू आहे, खोटी माहिती आम्ही ऐकूण घेणार नाही. १३ महिन्यापासून गॅझेटिवर अभ्यास सुरू आहे. आता आम्ही ऐकू शकत नाही. जर आमच्या नोंदी सापडल्या आहेत, तर ते आम्हाला हवंय.'
'तिन्ही गॅझेटियर लागू केले म्हणून कुणी आडवे येणार नाही. आम्ही त्याशिवाय हटणार नाही. ओबीसीचा विरोध करायचा कारण नाही. आमचा जमिनीचा सातबारा सापडला आहे, त्यामुळे आम्हाला देणं भाग आहे. फडणवीस यांनी मराठ्याचे विषय समजून घ्यावे. १० टक्के आऱक्षण नकोय, आम्हाला हक्काचे घर हवे आहे. आम्हाला हक्काचे आरक्षण हवे आहे', असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे.
चौकट
जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा मार्ग
२७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुंबईसाठी निघणार. जुन्नरमध्ये मुक्काम असेल.
२८ ऑगस्ट रोजी शिवनेरी गडाचे दर्शन घेऊन, राजगुरू खेड मार्गे चाकणला. चाकणहून तळेगाव लोणावळा, पनवेल, वाशी
२८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आझाद मैदान
२९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू
पहिला मुक्काम शिवनेरीवर
मनोज जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याचा मार्ग सांगितला आहे. 27 तारखेला आंतरवाली सराटी मधून आम्ही बाहेर पडणार आहोत पैठण, शेवगाव, पांढरीपुल, अहिल्यानगर, आळेफाटा आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम शिवनेरी किल्ल्यावर राहील. 26 तारखेच्या आत अंमलबजावणी केली तर ठीक आहे, अन्यथा एकदा अंतरवाली सराटी सोडली तर नंतर चर्चा करणार नाही. थेट मुंबईमध्ये गेल्यावर चर्चा करू असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, फक्त त्यांना काहीतरी कुरापती उकरून काढायच्या आहेत. आरक्षण द्यायची वेळ आली तर आता फडणवीस आईला पुढे करत आहे. त्यांच्या आईला काही शब्द बोललो असेल तर ते मी ते विधान मागे घेतलेले आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मुंबईत येऊ द्यायचं नाही.’
0 Comments