Hot Posts

6/recent/ticker-posts

दिलीप माने की सुरेश हसापुरे ?

 दिलीप माने की सुरेश हसापुरे ?



सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी रविवार, ११ मे रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या लोकनेते बाबूराव चाकोते प्रशासकीय इमारतीत जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. सभेची ही अधिसूचना बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी काढली आहे.

दरम्यान, सभापतिपदी माजी आमदार दिलीप माने की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे या दोघांपैकी कोणाची वर्णी लागणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. सभापतिपदाचा फैसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार असल्याचे यापूर्वीच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवार, २७ एप्रिल रोजी मतदान झाले होते. याचा निकाल सोमवारी दुसऱ्या दिवशी जाहीर झाला. यात अक्कलकोटचे आमदार कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वातील दिलीप माने, राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे यांच्या गटाला बहुमत मिळाले आहे. विरोधी आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.

आता बाजार समितीचे सभापती व उपसभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार कल्याणशेट्टी यांच्याप्रमाणेच संचालक मंडळाच्या निवडीनंतर जल्लोष करताना माजी आमदार माने यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. त्यामुळे सभापती कोण होणार हे मुख्यमंत्री फडणवीसच ठरवणार असल्याचे जाहीर केले होते. सभापतींचे नाव निश्चित करण्यासाठी अद्याप मुख्यमंत्र्यांची भेट झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सभापती व उपसभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

चौकट १
निवडीचा मिनीट टू मिनीट कार्यक्रम
रविवार, ११ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा होईल. यात सकाळी ११.१० ते ११.२५ या वेळेत उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृती, सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्जाची छाननी, ११.३५ वाजता वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिध्द करणे, ११.४५ वाजता उमेदवारी अर्जाची माघार, आवश्यकता असल्यास दुपारी १२ वाजता मतदान व त्यानंतर लगेच निकाल घोषित केला जाणार आहे, असे सोलापूर बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी काढलेल्या सभेच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments