Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा जोडो अभियानाने बहुजन समाज पुन्हा एकत्र

 मराठा जोडो अभियानाने बहुजन समाज पुन्हा एकत्र 



जिजाऊ वंदना

जिजा माउली गे, तुला वंदना ही ।
तुझ्या प्रेरणेने, दिशा मुक्त दाही ||धृ||

भयातून मुक्ती मिळाली जनांना ।
गुलामी कुणाला, कुणाचीच नाही ॥
नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा ।
फुलांना मुलांना, नसे दैन्य काही ॥१॥
जिजा माउली गे...

जशी पार्वती ती, प्रिया शंकरास
तशी प्रेरिका गे, शहाजींस तूही ॥
जसा संविभागी, बळी पूर्वकाळीं ।
शिवाजी जनांच्या, तसे चित्तदेही ॥२॥
जिजा माउली गे...

तुझ्या संस्कृतीने, तुझ्या जागृतीने ।
प्रकाशात न्हाती, मने ही प्रवाही ॥
तुला वंदिताना, सुखी अंग अंग ।
खरा धर्म आता, शिवाचाच पाही ॥
खरा धर्म आता, शिवाचाच पाही ||३||
जिजा माउली गे....

॥ जय जिजाऊ जय जिजाऊ ॥

मराठा सेवा संघ संचलित.

जिजाऊ रथ यात्रा

जय जिजाऊ भगिनींनो, बांधवांनो, युवती युवकांनो, मैत्रिणी-मित्रांनो, सहकाऱ्यांनो, भारतीय नागरिकांनो. १ सप्टेंबर १९९० रोजी मराठा सेवा संघाची स्थापना झाली. मराठा या शब्दाची व्यापकता जवळपास सर्वजण किंवा सर्व मानव एवढी गृहित धरण्यात आली. तसेच ही व्यापकता सांभाळत व्यावहारिकताही जपावी लागली. त्या काळात जगभरात जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांचे वारे वाहत होते. भारतही त्यास अपवाद नव्हता. स्वतंत्र भारतातील शिक्षित, जागृत सुधारक नेते, जनता व संस्था भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून आपापल्या हक्क व अधिकारांसाठी लढत होते. जनजागृतीसह विविध प्रबोधनाच्या माध्यमातून वैयक्तिक, कौटुंबिक वा सामाजिक अस्मितांचे जतन करण्यासाठी काम सुरू होते. शिक्षणाचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे रोजगाराची मागणी सतत पुढे येत होती. यातून सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकिय, ऐतिहासिक क्षेत्रातील स्थानिक, राष्ट्रीय ते जागतिक प्रश्नांवर मंथन सुरू झाले. भारतातील चातुर्वर्ण्य व्यवस्था हळूहळू धुसर होत चातुर्वर्गात - एससी, एसटी, ओबीसी व ओपन अशा चार वर्गात परावर्तीत होत होती. असे असले तरीही समाजातील विषमता, शोषण, अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार कमी न होता वाढताना जाणवत होते. मूळच्या प्राचीन वेदपूर्व भारतातील मानवतावादी, पोषणवादी, परस्परावलंबी, समतावादी परंपरा अडचणीत सापडलेल्या होत्या. आनंददायी, सुखदायी, लाभदायी, समृद्ध जीवनाची अपेक्षा असताना जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत बहुसंख्य बहुजन समाज ओढला गेला. परंपरागत शिक्षणाच्या व कौशल्याच्या वाटा बंद पडून त्या कल्पनेपलीकडे रुंदावल्या. कशासाठी- पोटासाठी !! हेच शिक्षणाचे सूत्र झाले. स्पर्धा आली व वाढली.
सन १७८१ मध्ये जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यापासून बदलत गेलेल्या विविध ज्ञान, तंत्रज्ञान, मानव्य इत्यादी शाखांनी मानवाच्या जीवनाला गतिमान केले. औद्योगिकरण, यांत्रिकीकरण, विद्युतीकरण, संगणक प्रणाली, डिजिटल इरा, स्पेस इरा, आर्टिफिशयल इंटेलिजन्स अशी नवनवीन क्षेत्रे विकसित होत आहेत. या महाजालात स्पर्धक होऊन टिकणे व जगणे सोपे नाही. परिणामी जगण्याचीही जीवघेणी स्पर्धा आली. जग सर्वांसाठी खुले झाले. परंतु सर्वांनाच स्पर्धा जिंकणे शक्य नसते. या व अन्य कारणांमुळे सर्वक्षेत्रीय विषमता वाढताना दिसते. आर्थिक क्षेत्रात गरीब जास्त गरीब होत आहेत, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. भांडवलशाही व शासकीय-प्रशासकीय यंत्रणांच्या अभद्र युतीसमोर जनसामान्य कष्टाळू, मेहनती, बुद्धिमान, कुशल रयत भरडली जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी व खऱ्या अर्थाने सर्वजन सुखाय अस्तित्वात आणण्यासाठी ही जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली आहे. आजच्या वर्तमानातील व भविष्यातील समस्या कायमस्वरूपी संपविण्यासाठी जिजाऊ रथयात्रा उपयोगी ठरेल अशी अपेक्षा आहे.
मराठा सेवा संघाच्या व्यापक भूमिकेमुळे किमान महाराष्ट्रात तरी शेकडो परिवर्तनवादी सामाजिक चळवळी एकत्रित आल्या. प्रबोधन व अभ्यासातून अनेक विषयांवर सखोल चर्चा होऊन सार्वजनिक एकात्मतेचे, शांततेचे, अस्मितेचे, एकमेकांच्या सन्मानाचे व सहकार्याचे वातावरण निर्माण होऊ शकले ही अभिमानाची बाब आहे. नवीन पिढीच्या पंखात बळ भरले गेले. त्यातील अनेकांनी दाही दिशा व्यापल्या. ही बाब अभिमानास्पद व समाधानकारक असूनही पुरेशी नाही. दरम्यान एकीचे बळही हळूहळू कळत नकळत बेकीत रूपांतरीत होत गेले. अंतर्गत वा बहिर्गत वादविवादात नेते, पदाधिकारी, चळवळी या टप्प्याटप्प्यात विखुरल्या आणि थंडावल्या. जवळपास बंद पडल्या. तर दुसरीकडे विरोधी विखुरलेल्या प्रतिगामी, ब्राह्मणवादी, अविवेकी, विषमतावादी प्रतीचळवळी एकत्रित होत मजबूत झालेल्या दिसतात. त्यांनी भारतीय सीमा ओलांडून जागतिक ख्याती प्राप्त केली आहे. नवीन पिढीतील युवावर्गाला याची फारशी जाण नाही. तो अस्वस्थ झाला आहे. उच्च शिक्षित होऊनही बेरोजगारीने ग्रासलेला आहे. संविधान सोयीनुसार वापरले जात आहे. विधिमंडळ, न्यायमंडळ व कार्यकारी मंडळ भांडवलदारांच्या वा अधिकारशाहीच्या सेवेत गुंतलेले आहे. जगभर शांतता धोक्यात आली आहे. भारतातही संविधानाने हमी दिलेली समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता विरुद्ध दिशेला वाटचाल करताना जाणवतात. चळवळी शक्तिहीन होत आहेत, तर प्रतिचळवळी शक्तिवान होत आहेत. ही अमानवी, असहिष्णू, अविचारी, अधार्मिक, अविवेकी शक्ती थोपवण्यासोबतच संपविण्यासाठी आपल्याला पुन्हा एकत्रित येऊन बलवान होण्याची सामाजिक व राष्ट्रीय गरज आहे. त्यासाठीच जिजाऊ रथ यात्राचे आयोजन आहे. व्यावहारिक विचार केला तर या पंचेचाळीस दिवसीय रथ यात्रेचे स्वरूप व क्षेत्र अत्यंत मर्यादित व तोकडे असल्याचे आम्हाला जाणवते. असे असतानाही एक लहानसा प्रयत्न आपल्यापर्यंत पोचण्यासाठी केला आहे. आशा आहे की, भविष्यात स्थानिक परिसर, आपला जिल्हा, आपले राज्य आपण पिंजून काढू. अपेक्षा एकच आहे की, विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा न करता, त्यांच्यासाठी वेळ, पैसा खर्च न करता, आपल्या हक्काच्या व्यक्तिसमूहाने कृतज्ञ भावनेतून आपापल्या कुवतीनुसार वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य व पैसा द्यावा. शेकडो वर्षात ज्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला समाधानकारक मिळाली नाहीत ते सोडून देऊन नवी वाट, नवा विचार, सम्यक भावना, सम्यक आचरण, सत्य व व्यावहारिक ज्ञान-जीवन समजून उमजून स्वीकारणे आवश्यक आहे.
यासाठी आम्हाला प्रत्येकाला सर्वस्पर्शी, सर्वांगाने, सर्वार्थाने योगदान देणे गरजेचे आहे. सर्वसमावेशकतेचा पूर्ण स्वीकार करून आपल्यालाच आपला विकास करावा लागणार आहे. आम्हाला कल्पना आहे की, आपल्यासमोर उभी असलेली विरोधाची शंभर मीटर जाडीची अस्सल पोलादी भिंत डोके आपटून फोडायची आहे. ते शक्य आहे. त्यासाठी आपली एकता पाहिजे. १८ मार्च ते १ मे २०२५ दरम्यान आयोजित ही जिजाऊ रथ यात्रा आपल्या सर्व विकासाच्या अभियानासाठी सकारात्मक वहिवाट तयार होण्यासाठी उपयुक्त ठरेल. कृपया सहभागी व्हावे.
महत्त्वाचे म्हणजे एकटे न येता, सहकुटुंब, सहपरिवार या. तसेच या पुस्तिकेतील विचार सर्वांपर्यंत पोचवा. त्यावर चर्चा करा. कुविचारांचा त्वरित त्याग करा. कारण अशा कुविचारांनीच आमचा घात झाला आहे. असे सर्वच घातक विनाशकारी विचार प्रत्येकाचेच जीवनमान आकाशाला भिडणारे व गवसणी घालणारे व्हावे. यासाठीच ही जिजाऊ रथ यात्रा आहे. लक्षात घ्या, सर्वच बंधू-भगिनींनो, विचार बदलला तरच स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला तरच सवयी बदलतात, सवयी बदलल्या तरच व्यक्तिमत्त्व बदलते, व्यक्तिमत्त्व बदलले तरच भवितव्य बदलते. एवढे चांगल्या विचारांचे आपल्या जीवन व घडामोडींशी संबंध आहेत !!
यासाठी जिजाऊ रथ यात्रा आहे.
सर्वांचेच स्वागत व सदिच्छा !

                                                                                                    - पुरुषोत्तम खेडेकर

काही संकल्प व उद्दिष्टे

१. जागतिकीकरणावर मात करणे :
जागतिकीकरण हे संकट वाटत असले तरी आम्हाला त्याकडे संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात तंत्रज्ञान व आर्थिक स्थिती हेच एकमेकांस पूरक आहेत. वस्तुविनिमय ते कॅशलेस व्यवहार, वाडीवस्ती ते जगातील प्रसार, व्यापार हे सत्य आहे. याच कारणाने आपल्याला जगभरातील बदलते आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, तांत्रिक इत्यादी बदल समजून घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. जो बदलत नाही, तो संपतोच. हेच सत्य आहे. तेव्हा न घाबरता जागतिक/ग्लोबल व्हा. बहुभाषिक व्हा. बाहेर पडा. घर, गाव, जिल्हा, राज्य, देश सोडा नि जगज्जेते व्हा.
२. आजची सर्वोच्च सत्ताकेंद्रे :
शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता व मीडिया सत्ता ही सर्वोच्च सत्ताकेंद्रे आहेत. यात आमचे प्रतिनिधित्व अत्यल्प आहे. आम्ही संस्थाचालक, शिक्षणमंत्री, प्राचार्य, कुलगुरू, शिक्षक, प्राध्यापक आहोत, परंतु कोणताही शिक्षण अभ्यासक्रम ठरविण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. आता आम्हाला सर्वच विषयांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या आम्ही आर्थिक निरक्षर आहोत. आम्हाला असलेला पैसा योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे खर्च करण्याचे समजत नाही. व्यसनाधीनता, खर्चिक विवाह खर्चिक धर्मकार्य, अंत्यविधीवरील खर्च टाळला पाहिजे. धर्मसत्तेचे सर्व अधिकार गर्भावस्थेपासून मृत्यूनंतरही प्रभावी ठरतात. धार्मिक कार्य वा संस्कारास हरकत नाही. फक्त त्यात बुद्धिवादी, वैज्ञानिक, विवेकी विचार व कृती असावी. अंधश्रद्धा, वाईट रूढी-परंपरा, कालबाह्य चालीरीती नकोत. शिवधर्म गाथा स्वीकारावी. राजसत्ता ही अनेक प्रश्नांची सकारात्मक उत्तरे देणारी सत्ता आहे. भारतीय संविधानाने आपल्याकडे त्रिस्तरीय - केंद्रीय, राज्य व स्थानिक राजसत्ता दिलेली आहे. मीडिया सत्ता म्हणजे तर झिरोचा हिरो करणारी सत्ता. लहान-लहान पत्रकार, उपसंपादक संपादक म्हणजे अंतिम मीडिया सत्ता नाही. तर मीडिया-प्रिंट वा इलेक्टॉनिक चॅनेलचे डॉन, मालक हीच मीडिया सत्ता असते. दुर्दैवाने आमच्याकडे एकही असा डॉन नाही. ही पोकळी भरून काढायची आहे.
3. पे बॅक टू सोसायटी :
बदलत्या समाज व अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास असे लक्षात येईल की आम्हाला प्रत्येकालाच आपापल्या परीने वेळ, बुद्धी, श्रम, पैसा, कौशल्य देऊन समाजानेच समाजाचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील श्रीमंत, साक्षर, सत्ताधारी लोकांनी योगदान देणे. समाजऋण फेडणे ही संकल्पना आहे. आपण वैयक्तिक पातळीवर हे काम करतोच. त्यात मर्यादा येतात. यासाठी व्यापक असावे.
४. सर्वांगीण विकास :
व्यक्तीपासून कुटुंब, कुटुंबापासून समाज तर समाजापासून राष्ट्र बनते. यासाठी प्रत्येक बालिका-बालक ते स्त्री-पुरुष हे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक व आध्यात्मिक क्षेत्रात परिपूर्ण असावी. यासाठी कुटुंबानेच प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीने आपापल्या वयानुसार बदल स्वीकारत विकासाची कास धरली पाहिजे. इतरांचे साहाय्य घ्यावे. परंतु स्वावलंबनावर भर व विश्वास पाहिजे.
५) शैक्षणिक, तांत्रिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास :
सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट असले तरी त्यातील शैक्षणिक, तांत्रिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रे प्रभावी आहेत. तंत्रज्ञान नवीन अर्थव्यवस्था जन्माला घालते. तर मजबूत अर्थव्यवस्था नव्या तंत्रज्ञानाला जन्माला घालते. सध्या जगभरातील विकसित देश अमेरिका, जपान, चीन, रशिया, फ्रान्स, इंग्लंड इत्यादी नवनव्या तंत्रज्ञानाचा शोध लावत ज्ञानात भर टाकत आहेत. आपल्याकडे आय.आय.टी. इंजिनिअर्स नोकरीसाठी भटकत आहेत. शासन स्टार्ट अप चा उदो उदो करत आहे. तर त्या प्रमाणात यश नाही. तरी आम्ही आवश्यक व अवैज्ञानिक सांस्कृतिक परंपरांचा प्रचार करून कालबाह्य विचारांना बळकटी देत आहोत. जग एआयमय झाले आहे. आमच्याकडे साधी सोशल मीडियातील एखाद्या मालमत्तेची मालकी नाही. आपलेच उद्योगपती आपल्याला लुटत आहेत. हे बदलण्यासाठी आम्हालाच पुढे यावे लागेल.
६. सार्वजनिक जीवन :
बुद्धापूर्वीपासून भारतीय कृषकांचे जीवन शील व चारित्र्य जपणारे असावे असे सांगितले जाते. सार्वजनिक जीवनात वावरणारे कार्यकर्ते व नेते अत्यंत सद्वर्तनी असावेत. समाजमान्य असावेत. दूरदर्शी असावेत. आपल्या अपयशासाठी इतरांना दोषी धरणारे नसावेत. सर्वांना सहज भेटता-बोलता येईल असे ओपन असावेत, तसेच जुन्यांनी योग्यवेळी योग्य वारसदार निवडून मार्गदर्शकाची भूमिका वठवावी. तरच चळवळी जिवंत राहतील.
७. बालशिक्षण :
विविध बालसंस्कारातून तसेच कुटुंबातील प्रामुख्याने आईच्या माध्यमातून मुले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिक्षण घेत असतात. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा अशा इंद्रियांद्वारे बालक निरीक्षण व अनुभवातून शिकत असते. यासाठी कुटुंबात अत्यंत प्रेरणादायी आनंददायी वातावरण असावे. ही बालकेच आपली भविष्यातील संपत्ती आहे. याच कारणाने मराठा सेवा संघाने सातत्याने सांगितले आहे, की संततीसाठी संपत्ती साठवण्यापेक्षा, अशी संतती निर्माण करा की जी एका कुटुंबाची वा समाजाचीच नाही तर जगाची संपत्ती झाली पाहिजे. त्यामुळे बालशिक्षणाचे महत्त्व समजून प्रत्यक्षात आणावे. अलीकडे जगभर बालशिक्षणाबाबत अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रयोग केले जात आहेत. ते समजून घ्यावेत. उपयोगात आणावेत.
८. महिला विकास :
जगभरातील विकसित व सर्वज्ञानी अशा कुटुंबांचा, समाजाचा वा राष्ट्राचा अभ्यास केला तर असे लक्षात येईल की अशा कुटुंबात, समाजात वा शिक्षणप्राप्ती, राष्ट्रात महिलांचा योग्य प्रकारे सन्मान ठेवला जातो. महिलांचा प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतलाच जातो. एवढेच नाही तर महिलांचा शब्द अंतिम मानला जातो. यासाठी आम्हाला स्वतःपासून सुरुवात करून आपल्या कुटुबातील महिलांचा आदर करायला पाहिजे. कुटुंबप्रमुख पुरुष जर महिलांना मानाचे. बरोबरीचे स्थान देऊ लागला तर कुटुंबातील अन्य सर्वच सदस्य तसे अनुकरण करतील. महिलांनी देखील ओपन राहिले पाहिजे. जास्तीत जास्त ज्ञानप्राप्ती असावी. आत्मविश्वास असावा. महिलांनी ठरवले तरच कौटुंबिक व सामाजिक विकास शक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सुपुत्र व्हावा यासाठी शहाजीराजे व जिजाऊ सारखे सर्वज्ञानी मायबाप असावेत. जिजाऊ या शिवरायांच्या आई होत्याच. पण त्या आजच्या काळातही प्रत्येक महिलेसाठी आदर्श आहेत. जगातील प्रत्येक क्षेत्रातील महिला आजची जिजाई व्हावी.
९. विद्यार्थीकेंद्रित व्यावसायिक शिक्षण :
अगदी आयआयटी सारखे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन अथवा यूपीएससी/एमपीएससी एक-दोन मार्कांनी गमावलेले युवक स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाहीत. मराठा सेवा संघाने आग्रह धरला की मुलांनी लोक काय म्हणतील याची पर्वा न करता बूट पॉलीश ते डोके मालिश असा कोणताही व्यवसाय अभिमानाने करावा. नोकरी मागण्याऐवजी नोकरी देणारे व्हावे. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी, प्रवृत्त करणारे शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन झाले पाहिजे. तसेच शासन वा आर्थिक संस्थांनी अशा सर्वच इच्छुक व होतकरू मुला - मुलींना व्यवसायासाठी आवश्यक कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून द्यावी. सध्या सेवा उद्योगांना उत्तम दिवस आहेत. कौशल्यावर आधारित प्लंबिंग, ड्रायव्हिंग, हेअर कटिंग, टेलरिंग, हॉटेलिंग, फास्ट फूड इत्यादी क्षेत्रात जागतिक वाव आहे. परदेशात जाण्याची तयारी ठेवा. तसेच गुणवत्तेत तडजोड करू नका. परदेशातील संधींकडे लक्ष असू द्या.
१०. शेतकरी व शेती विकास :
भारतातील शेतकरी व शेती अत्यंत अडचणीत आहेत. एकीकडे शेतीवरचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. तर सोबतच शेतमाल उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. एकेकाळी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, त्यापेक्षा भीक बरी, हे शेतीचे अर्थशास्त्र होते. आमची पिढी शेतीच्या उत्पन्नातच शिकली, पोसली, वाढली. सन १९७२ मध्ये एक क्विंटल गहू, ज्वारी, गूळ, कापूस विकला तर कमीत कमी एकतोळा बारा ग्रॅम सोने मिळत होते. साधारण दीडशे-दोनशे रुपये भाव होता. आज २०२५ मध्ये सोने ऐंशी हजार रुपये फक्त दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे. हीच तुलना जगभर भाववाढ अभ्यासासाठी केली जाते. या हिशोबाने आज अगदी ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, भगर इत्यादी धान्ये कमीतकमी एक लाख रुपये प्रती क्विंटल पाहिजेत. परंतु सरकारी धोरण, शेतकरी हिताच्या व उत्पादन खर्चावर आधारित-एमएसपी बाजारभाव विरोधी आहे. दिवसेंदिवस शेतीचे तुकडे पडून उत्पन्न घटत आहे. शिक्षण, आरोग्य, विवाह, आकस्मिक खर्च, घर खर्च प्रचंड वाढला आहे. शेतीवर अवलंबून असणारे कुटुंब हवालदिल होतात. परिणामी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढलेले आहे. आई जेऊ घालत नाही, तर बाप भीक मागू देत नाही अशी शेतकरी दुरवस्था आहे. तर सरकार अनेकदा कवडीमोल भावात शेतीचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना भूमिहीन करत आहे.
११. आर्थिक नियोजन :
आपल्याकडे असलेल्या पैशांचा अतिशय काळजीपूर्वक व योग्य प्रकारे उपयोग करावा. जास्तीत जास्त बचतही करावी. तसेच बाहेरून आपल्या कामातून नियमितपणे ठराविक उत्पन्न - शाश्वत पैसे मिळतील अशी अर्थव्यवस्था असावी. हावरेपणा नसावा. तसेच लग्नकार्य, समारंभ, उत्सव, सण, मरण अशा प्रसंगी पैशांची उधळपट्टी नसावी. कुटुंबातील सर्वच धार्मिक विधी प्रामुख्याने कुटुंबातील महिला सदस्यांनी करावेत. नारायण नागबळी, कुंडली, शनि मंगळ वक्रस्थान या बाबी खोट्या आहेत. ग्रहशांती बोगस आहे. असे लक्षात आले की साधारणपणे अगदी गरीब कुटुंबात देखील प्रत्येक व्यक्तीचा धार्मिक कार्याच्या नावाखाली वाचण्यासारखा दरवर्षी दहा हजार रुपये खर्च होतो. दोन कोटी गोरगरीब जनता दरवर्षी वीस हजार कोटी रुपये अशा प्रकारे अंधश्रद्धा व भीतीपोटी गमावतात. तर कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. हे सर्व बंद केलेच पाहिजे. तरच आपण विकास करू शकतो.
१२. निर्व्यसनी व उत्पादक युवाशक्ती निर्माण :
अनेक अनिश्चित कारणांमुळे उदा. शिक्षण, बेरोजगारी, महागाई, बुडीत शेती, कौटुंबिक ताणतणाव, आर्थिक टंचाई अशा कारणास्तव युवावर्ग प्रामुख्याने युवक त्रस्त झालेले आहेत. भविष्य अंधकारमय झाल्याची भावना सतत जागी असते. अनेक प्रकारे उभे राहण्याचा प्रयत्न करूनही अपेक्षेनुसार यश नाही. पालकही टोचून बोलतात. उच्च शिक्षण घेतल्याने अंगमेहनतीचे, कष्टाचे काम होत नाही. परराज्यातून आलेली मुले कमी पैशात कामाला मिळतात. अगदी खेडोपाडी, शहरात हेच चित्र आहे. शेतीतील खळे बंद पडलेत. हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगढमधून मशीनरी व मजूर येतात. तर गावातील मजुरांना जमत नाही. उलट गावातील पैसा बाहेर जातो. मालकाची दुरवस्था मजुरापेक्षाही वाईट आहे. अनेक गावात मजुरांची थकलेली मजुरी देण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी मजुरांनाच शेती विकली. हा अपमान व जगण्याचा संघर्ष अशा युवकांना आत्महत्या अथवा दारू, गुटखा, गुन्हेगारी अशा क्षेत्राकडे नाईलाजाने ओढतो. परिणामी युवक नाईलाजाने दुर्व्यसनांच्या आहारी जातात.
यावर आर्थिक उपाययोजना, समुपदेशन, इतर मानसिक आधार, प्रबोधन, रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे हाच उपाय आहे. निर्व्यसनी व उत्पादक युवाशक्ती हाच समाजाचा व राष्ट्राचा मजबूत कणा असतो. आपल्याला यासाठी कृतिशील परंतु प्रत्यक्षात व्यावहारिक उपाययोजना करावीच लागेल, कृपया प्रस्ताव तयार करून राबवावेत.
१३. समान नागरी कायदा :
भारतीय समाजातील जाती, जमाती, धर्म, संस्कृती यातील विविधता हीच आपली ओळख आहे. एकमेकांच्या परंपरांचा वा संस्कृतीचा आदर करणे आपले काम आहे. अर्थातच अशी विविधता आजच्या नवयुगात वा काळात जागतिक पातळीवर जगन्मान्य असावी. केवळ प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंतु वर्तमानात सर्वार्थाने कालबाह्य झालेल्या अमानवी, अविवेकी, अवैज्ञानिक, गुलामीचे प्रतिक वा तत्सम प्रथा परंपरा चालू ठेवणे निश्चितच अयोग्य आहे. हिंदू धर्मातील अमानवी प्रथा-परंपरा असलेला मनुस्मृती हा एकेकाळी पवित्र समजला जाणारा धर्मग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये जाळला. तर १९५० मध्ये संविधानाने बाद केला. महिलांचे बालविवाह बंद झालेत. विधवा विवाह बंदी उठली आहे. स्त्रियांना सर्वच धार्मिक, आर्थिक, राजकीय अधिकार मिळालेत. याच तत्त्वांनुसार अस्पृश्यता बंदी आहे. सर्व भारतीय एक आहेत. प्रत्येकास सारख्याच एका मताचा अधिकार आहे. तरीही सामाजिक मानसिकता शंकास्पद आहे. अशा उदाहरणावरून कायदेतज्ज्ञांनी, अभ्यासकांनी व समाजनेत्यांनी समान नागरी कायद्यासाठी प्रयत्न करावेत. भारतीय संविधानात तशी तरतूद आहे. सर्वांनाच सारखी वागणूक देऊन वैयक्तिक-कौटुंबिक पातळीवर समसमान सन्मानजनक व्यवहार करणाऱ्या समान नागरी कायद्याचे आपण समर्थन करायला हरकत नाही. स्त्री-पुरुष समानता, विवाहविषयक बहुपतीत्व - बहुपत्नीत्व, वारसदार, वडिलोपार्जित इस्टेट इत्यादी बाबत समानता असायला हरकत नाही.
१४. ए. आय- आर्टिफिशीयल इंटेलिजन्स :
एआयने जगाला आश्चर्यचकित केल्याचे पहायला मिळते. या क्षेत्रामध्ये पुढील अनेक वर्षे सुवर्णसंधी आहेत. अमर्याद वाव आहे. सध्याची प्रगती पाहता कदाचित पुढील काही वर्षात मानवाची जागा पूर्णपणे एआयने घेतलेली असेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये एआय टीचर येतील. ड्रायव्हरलेस कार वापरात आलेली आहे. भारतातील शेतकऱ्यांना शेती परवडत नाही तर विकसित देशांमध्ये एआय शेती केली जाते. आम्ही अजूनही संगणक साक्षर नाही. तर दुसरीकडे एआयची सुधारित आवृत्ती येत आहे. डिजीटल इराने सारे जग जवळ आणले आहे. ज्ञानक्षेत्रे विस्तारित होऊन सर्वांसाठी कोणत्याही मध्यस्थाशिवाय सर्वांनाच उपलब्ध आहेत. आम्हाला तेथे जम बसवण्याची गरज आहे. यापुढील सीमा संरक्षण व आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धेही कदाचित पूर्णपणे एआय हाताळेल. यामुळे मानवी हानी कमी होईल. तर सोबतच गावे -शहरे -घरे उद्ध्वस्त होण्याचे प्रमाण वाढेल. असे होणे आपल्या हिताचे नाही. यासाठीच परग्रहाचा शोध घेतला जात आहे. शिवसंकल्प अभियानाची अपेक्षा व मागणी आहे, की आंतरराष्ट्रीय पातळीवरील गेल्या काही दशकांपासून सुरू असलेले सीमावाद संयुक्त राष्ट्र संघ वा विविध आंतरराष्ट्रीय संघटनांनी संपुष्टात आणावेत. नो वॉर सूत्राचा अवलंब करावा. या संरक्षण खर्चातून बचत झालेला पैसा देशांतर्गत जनसामान्यांच्या शिक्षण, आरोग्य, आहार, निवास यासाठी खर्च करावा. शिवसंकल्प अभियान वैश्विक नागरिकत्व, एक जग एक नागरिकत्व, वैश्विक शांतता व बंधुता इत्यादी मूल्यांच्या अंमलबजावणीसाठी आग्रही आहे. भारत सरकारने एआय क्षेत्रात आपले नाव नोंदवावे अशी आमची इच्छा आहे.
१५. विधवा, परित्यक्ता, एकल महिलांचा सन्मान राखणे :
हिंदू धर्मातील अनेक सण, उत्सव, पूजापाठ, हळदी कुंकू असे सार्वजनिक स्वरूपाचे प्रकार केवळ विवाहित व सौभाग्य प्राप्त-म्हणजेच नवरा जिवंत असलेल्या महिलांसाठीच आयोजित केले जातात. अशावेळी धर्मपरंपरा वा चालीरीतीच्या नावाखाली विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, एकल वा तत्सम भगिनींना हळदीकुंकू, महापूजा, धार्मिक कार्यक्रम, विवाहविधी संस्कार, नामकरण वा अशाच अनेक कार्यक्रमात सहभागी केले जात नाही. अथवा  अगदी ठरवून दूर ठेवले जाते. विधवा भगिनींना स्वतःच्याच मुला-मुलीच्या विवाहातील विधींपासून दूर ठेवले जाते. ह्या प्रथा हळूहळू कमी होत आहेत. परंतु त्याचे प्रमाण नगण्य आहे. याउलट उच्चशिक्षित, शहरी नवश्रीमंत, परंपरावादी घराणे अधिक कर्मठ होत आहेत. पतीच्या निधनानंतर महिलांनी आपल्या अंगावरील कोणतेही सौभाग्यलेणे उदा. कपाळावरील कुंकू वा टिकली, हातातील बांगड्या, गळ्यातील मंगळसूत्र वा दागिने, नाकातील नथ, कानातील फुले, अंगावरील चांगले कपडे तसेच चांगले राहणीमान याचा त्याग करू नये. लोक काय म्हणतील याची काळजी करू नये. नवरा जिवंत नसतानाच त्यांच्या नावाची व ओळखीची सोबत गरजेची आहे. तसेच पुनर्विवाहासाठी तयार असलेल्या भगिनींनी नावनोंदणी करावी. समाजाने सहकार्य करावे. काही महिलांचे वय विवाहयोग्य असूनही लहान अपत्यामुळे त्यांची पुनर्विवाहास तयारी नसते. अशावेळी समाजाने बालकांसाठी निवासी शैक्षणिक सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हे उपक्रम पूर्ण ताकदीने राबविण्यात आले पाहिजेत.
१६. दारू मुक्त गाव व व्यसनमुक्त युवक :
विविध नैराश्यातील कारणांमुळे युवावर्ग व प्रामुख्याने युवक सुरुवातीला शौक वा मैत्रीच्या कारणाने तंबाखू, पान, गुटखा, सुपारी, दारू, ड्रग्ज अशा प्रकारे अडकतातः शिक्षण व बेरोजगारीतील ताणतणाव, कौटुंबिक अस्थिरतेमुळे आर्थिक ओढाताण, जीवनातील असफलता, विवाह न जुळणे, स्थैर्याचा मार्ग न सापडणे, स्वतःलाच सतत दोषी समजणे इत्यादी कारणांमुळे युवक डिप्रेशनमध्ये जातात. समाजातील असामाजिक तत्त्वांचे प्रचारक अशा युवकांचा गैरवापर करतात. त्यांना गुन्हेगारी व्यवहारात अडकवतात. कधी कधी युवक हतबल होऊन कुटुंब, मित्र, समाज चोहीकडून तुटतात. परिणामी नाईलाजाने अडचणी विसरण्यासाठी किंवा टाळण्यासाठी ते व्यसनाधीन होतात. कुटुंबातील सदस्यांचे जीवनमानही हैराण होते. आपल्याला अशा युवकांना आधार व विश्वास देऊन व्यसनमुक्त करण्याची यशस्वी कामगिरी करायची आहे. हे काम अवघड आहे. पण हाती घेऊ या.
१७. आंतरराष्ट्रीय राजकारणाची माहिती व सहभाग :
सध्याच्या काळात परग्रहापासून ते परराष्ट्रात घडणाऱ्या अनेक घडामोडींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम आमच्या दैनंदिन जीवनावर होत असताना दिसतो. परंतु आम्ही या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही. तर व्यवहारात आम्ही त्याचे फायदे-तोटे सहन करत असतो. जागतिकीकरणामुळे जग एक खेडे झाले आहे. याचा अर्थ आम्हाला जगभरात शिक्षण, व्यवसाय, व्यापार, पर्यटन, नागरिकत्व इत्यादी संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताचे शेजारच्या सर्वच देशांसह जगभरातील अतिविकसित, विकसित, विकसनशिल, अविकि देशांसोबत सौहार्दाचे मैत्रीचे संबंध असणे हिताचेच आहे. आयात-निर्यात धोरण शेतकरी व उद्योजकांना पोषक असावे. परदेशात स्थायिक भारतीयांचे जीवनमान सुरक्षित रहावे. अशा शेकडो कारणांसाठी आपले आंतरराष्ट्रीय धोरण हितकारक असणे गरजेचे आहे. आम्हाला संयुक्त राष्ट्राचे कामकाज व अधिकार समजून घेतले पाहिजेत. मानवाधिकारांचे जतन सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विषय आहे. आम्हाला यासाठी सहभाग देता आला पाहिजे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनासोबत अभ्यासपूर्ण संबंधातून आंतरराष्ट्रीय शांतता, वाटाघाटी, सलोखा, युद्धबंदी, व्यापार क्षेत्र, सीमावाद यात सहभागी झाले पाहिजे. आंतरराष्ट्रीय राजकारण व संबंध या क्षेत्रातील जाणकारांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. १८. राष्ट्रीय घडामोडी : भारत हा बहुधर्मीय, बहुजातीय, बहु-सांस्कृतिक, बहुभाषिक, बहुराज्ये, बहुप्रांतिक असा अति विशाल देश आहे. भारतीय संविधानानुसार असा राजसत्ता, केंद्रसत्ता, राज्यसत्ता व स्थानिक स्वराज्य संस्था सत्ता अशा तीन भागांत विभागलेली आहे. लोकशाही राज्यपद्धती आहे. राष्ट्रपती व राज्यपाल प्रमुख असतात. तर अनेक सार्वभौम संस्था त्यांना सहकार्य करतात. आम्ही आपल्या राज्यातही सत्ताधारी नाही. परिणामी वेगवेगळ्या आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकिय गुलामगिरीत अडकलेलो आहोत. परराज्यातील मजूर, कुशल कामगार, अखिल भारतीय सेवेतील अधिकारी, उद्योजक, व्यापारी ते अगदी घरकामासाठी उपयुक्त कर्मचारी आपल्याकडे ग्रामीण, शहरी भागात पोचलेले आहेत. कमी पैशात चांगले काम करतात. आम्ही बौद्धिक-शारीरिक-आर्थिक-शैक्षणिक क्षेत्रात आमच्याच राज्यात बाहेर फेकले गेलो आहोत. युवकांना आपल्याच ओळखीच्या परिसरात हलकेफुलके काम करण्याची लाज वाटत असल्यास त्यांनी महाराष्ट्राबाहेर विकसनशील वा विकसित राज्यात, परदेशात जावे. तिकडे आज जे शेकडो भारतीय वा महाराष्ट्रीयन सत्तेत दिसतात त्यांचे पूर्वज त्यावेळी पोटासाठी तिकडे गेले होते. अनेकदा आपल्या घराशेजारीच अनेक संधी उपलब्ध असतात. परंतु आपण गांभीर्याने घेत नाही. गेल्या काही वर्षांपासून दलाली, मध्यस्थी हे व्यवसाय अत्यंत महत्त्वपूर्ण, सन्मानजनक व आकर्षक झाले आहेत. युवावर्गाने याबाबत गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा. नव्याने वकीली व्यवसायात येणाऱ्या युवकांनी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्यावर भर द्यावा.
१९. प्रबोधन साहित्य निर्मिती :
गेल्या काही वर्षांपासून देशभर व देशाबाहेर देखील लिखित, डिजिटल, एआय,, शिल्प, चित्र, गायन इत्यादी स्वरूपातील प्रबोधनपर साहित्याची प्रचंड मागणी वाढलेली आहे. तसेच उत्तम, सत्यवादी, सर्वव्यापी, मवाळ भाषिक प्रबोधनकारांचीही गरज आहे. मराठा सेवा संघाचे सुरुवातीपासूनचेच मत आहे की, धर्मग्रंथातील व इतिहासातील असंख्य अमानवी, अनैतिहासिक वाद पूर्णपणे संपल्याशिवाय सामाजिक बंधुभाव अवघड आहे. ५ जानेवारी २००४ रोजी संभाजी ब्रिगेडच्या बहादूर बाहत्तर मावळ्यांनी याच उद्देशाने भांडारकर संस्था, पुणे विरोधात कारवाई केली होती. सांस्कृतिक दहशतवाद जिवंत ठेवून सामाजिक समता वा राष्ट्रीयता जोपासणे अशक्य आहे. भांडारकर संस्थेचे संस्थापक दिवंगत डॉ. रामकृष्ण भांडारकर हे तत्कालीन महान संशोधक व परिवर्तनवादी महामानव होते. त्यांच्या कार्याचा मराठा सेवा संघास आदर व अभिमान आहे. परंतु अशा अनेक सर्वसमावेशक संशोधन संस्था दुर्दैवाने ब्राह्मणवादी व अविचारी गटांच्या ताब्यात आहेत. यासाठी आपल्याला आपलेच संशोधक, अभ्यासक, लेखक, शाहीर, कीर्तनकार, प्रवचनकार, शिल्पकार, चित्रकार, मीडिया डॉन्स निर्माण करणे गरजेचे आहे. क्षणाक्षणाला राष्ट्रीय पातळीवरील घडामोडी चिंता वाढवत असतात. राष्ट्रीय मराठा सेवा संघाने याच कारणाने देशातील सर्वच राज्यासह केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक नागरिकांसोबत सर्वच व्यवहार व संबंध जोडावेत.
२०. तोरण व मरण समस्या :
विवाह हा अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक कौटुंबिक संस्कार आहे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षात उच्चशिक्षित, नवश्रीमंत, शहरी भागातील व प्रामुख्याने काळा पैसेवाले कुटुंब या पवित्र संस्काराचे विकृतीकरण करत आहेत. कुंडली, मंगळ, ग्रहशांती, मोठमोठे भटजी, जेवणावळी हुंडा, प्रिवेडिंग सारखे अश्लील प्रकार, डीजेवर विकृत नाचणे, दारुपाणी, वेळेचे भान नसणे, वऱ्हाडी पाहुण्यांची गैरसोय, खराब झालेले जेवण, भाषणबाजी, शेकडो सत्कार, रात्रभर जागरण यामुळे समाजात चुकीच्या प्रथा निर्माण होत आहेत. अशा लोकांवर जरब बसवणारा समाज पाहिजे. उलट असे विकृत लोक मोठे तर समाज लहान झाला आहे. मराठा सेवा संघ अशा असामाजिक प्रथांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहे. याप्रमाणेच मरणाचेही इव्हेंटस् केले जात आहेत. मोठमोठे कार्यक्रम व जेवणावळी, भाषणबाजी केली जाते. सर्वसामान्यांना या बाबींचा तिटकारा आहे. थोडक्यात व कौटुंबिक विधी असावेत. तसेच अतिरिक्त पैसा आल्यामुळे गृहप्रवेश, सत्कार वाढलेले आहेत. अशा आनंददायी घटेनेच्या निमित्ताने समारंभ आयोजन साहजिक आहे. परंतु त्याचे पावित्र्य व तारतम्य बाळगावे. व्हीआयपी साठी जनतेला ताणून गृहित धरू नये. निमंत्रितांची बैठक व्यवस्था, सोय, आपसात ऐकू जाईल असे बोलण्याचे वातावरण, चांगले जेवण, आनंददायक वातावरण एवढीच अपेक्षा असते. आपण इतरांकडून जशा चांगल्या काही अपेक्षा करतो तशाच आयोजकांकडून इतरांच्या असतात. सामूहिक विवाहांचे आयोजन असावे. कोरोना काळात दोन्हीकडील पाच-दहा वऱ्हाडी, जुने-नवे कपडे, घरचाच पुरोहित-नो भटजी, नो अक्षता,नो मांडव, नो जेवण, नो सत्यनारायण डायरेक्ट हनिमुन. अशी हजारो लने झालीत. ते संसार आनंदाने फुललेले आहेत. तर धामधूम-धुमधडाक्यात लग्न लावण्याच्या हट्टापायी बरीचशी लग्नं मोडलेले आहेत. पुन्हा जुळलेली नाहीत. कुंडली, मंगळ, शनी, ग्रहशांती हे प्रकार पूर्णपणे थोतांड व अंधश्रद्धावादी खोटे असल्याचे अतिशय बुद्धिवान व हुशार पुरोहित पंडित ब्राह्मणांनी सांगितले आहे. यावर समाजाने चिंतन करून वैज्ञानिक दृष्टीकोन अंगिकारावा. मराठा सेवा संघाचे अनेक सहकारी शिवविवाह सांगून थोतांड विवाह करतात. अर्धवट ब्राह्मणी परंपरा, अर्धवट शिवधर्म परंपरा. सकाळी वैदिक पद्धतीने निवडक मोठ्या लोकांसमोर वैदिक विवाह. तर सायंकाळी अवैदिक बहुजन पद्धतीने शिवविवाह. शुद्ध हवा पाणी ऋतू . या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ओळी छापतात. विवाह मुहूर्त ६ वाजून १३ मिनिटे २१ सेकंद टाकतात. हा प्रकार म्हणजे तोंडातील एका गालात गूळ तर एका गालात गू ठेवण्यासारखे आहे. आपल्याला संवाद, संपर्क, समन्वय, प्रबोधन, सामाजिक दबाव इत्यादी माध्यमांतून समाजाला एकरूप व एकलमय, वैचारिक, वैज्ञानिक करायचे आहे.
२२. कृषि पुत्रांच्या विवाहाची समस्या :
अलीकडच्या काळात ग्रामीण-शहरी भागातील व प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून असलेल्या अनेक युवकांची लग्नं होत नाहीत. यासाठी युवक अल्पशिक्षित, बेरोजगार, व्यसनी, कर्जबाजारी असल्याची कारणे सांगितली जातात. या कारणांनी शहरी वा ग्रामीण भागातील अल्प वा उच्चशिक्षित, कमावत्या मुली शेतकरी नवरा नको अशी भूमिका घेतात. शेतकरी आत्महत्या हे एक कारण आहे. हे पूर्ण सत्य नाही. मुलगी शहरी असो वा खेडूत, अशिक्षित-अल्पशिक्षित, उच्चशिक्षित असो की, काळी गोरी, शेतकरी-व्यापारी कुटुंबातील असो, प्रत्येक मुलीला आपला नवरा प्रेमळ असावा, धट्टाकट्टा, निर्व्यसनी, कमावता, प्रतिष्ठित असावा असे वाटत असते. मराठा सेवा संघाने तीस वर्षांपासून चेतावणी दिली होती की, पोरांनो मेहनत करा. पैसे कमवा. व्यसनापासून दूर रहा. शरीर कमवा. अन्यथा तुम्हाला पोरी मिळणार नाहीत. मुलींना शेतकरी नवरा चालतो. परंतु तो कमावता असावा. दुर्व्यसनी नसावा. चांगले घर असावे. घरात संडास बाथरूम असावे. एकमेकांना समजून घेणारे सदस्य असावेत. अडचणी कोणत्याही संसारात येतात. परंतु त्यावर मात करावी लागते. याशिवाय मराठा सेवा संघाचे मत आहे, की आता सर्वच समाजात तुलनेने मुलीचे शिक्षण व रोजगाराचे प्रमाण वाढलेले आहे. मुले शिकली किंवा शेतीत असली तरी मुलींच्या तुलनेत मागे आहेत. अशा परिस्थितीत कमावत्या मुलींनी कमी शिकलेला व अंगमेहनतीचे कष्टाळू काम करणारा मुलगा नवरा म्हणून निवडायला हरकत नाही. ही सामाजिक गरज आहे. मुलींनी याचा गंभीरपणे विचार करावा.
२३. मंदिर - मशीद वाद :
६ डिसेंबर १९९२ रोजी भारतातील अयोध्या येथील बाबरी मशीद म्हणून ओळखला जाणारा जुना ढाचा कारसेवक समूहाने जमीनदोस्त केला. आणि तेव्हापासून सुप्तावस्थेत असलेला कट्टरपंथी आरएसएसवादी हिंदू समाज व कट्टरपंथी मुस्लीम समाज अगदी उघडपणे एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र आहे. यामुळे दोन्ही धर्मातील शांतताप्रिय सामान्य जनता असुरक्षिततेची भावना जपत जगत आहे. त्यांना मंदिर-मशिद वादापेक्षा सामाजिक व धार्मिक सौहार्दता, उत्तम शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी, द्वेषमुक्त व दंगलमुक्त भारत पाहिजे. परंतु दोन्हीकडील कट्टरतावाद तसे घडू देत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मध्यमार्ग काढून वाद मिटवला असला तरी धुमसतच आहे. काशी विश्वेश्वर मंदिर, वृंदावन, संभल, ताजमहाल अशा अनेक वास्तू पूर्वी हिंदूंची मंदिरे किंवा तीर्थस्थळे होती असे दावे सुरूच आहेत. परिणामी भारतात नागरिकांचे भवितव्य भरडले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ ऑगष्ट १९४७ रोजी असलेल्या धार्मिक स्थळांचे जसेच्या तसे संरक्षण करण्याच्या सूचना व त्यासाठी लागू असलेल्या, सन १९९१ च्या कायद्याचे पालन करण्याबाबत आदेश दिले आहेत. तर शासन तळ्यात मळ्यात आहे. मध्ययुगीन कालखंडात केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील राजकीय संघर्षात एकमेकांच्या धार्मिक स्थळांची लूट वा उद्ध्वस्त करणे समर्थनीय नसले तरी सुरूच होते. याशिवाय ख्रिश्चन, मुस्लीम, हिंदू वा अन्य धर्मीय राज्यकर्तेही स्वतःच्याच धार्मिक स्थळांवर हल्ले करत होते. औरंगजेबाने दक्षिण भारतातील आदिलशाही व कुतुबशाहीतील मुसलमान समाजाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले केले होते. इतिहासातल्या अशा बाबींना वर्तमानातील संदर्भ लावून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक स्वास्थ बिघडवणे खूप धोकादायक आहे. युवापिढीने याबाबत सकारात्मक दृष्टीकोन विकसित करून जपला पाहिजे. आजही अनेक इस्लामिक देशात अस्थिरता असल्याने तेथील कट्टरपंथी मुसलमान वा दहशतवादी, अतिरेकी आपल्याच मुसलमान देशवासियांचे मुडदे पाडत आहेत. हेच चित्र आपल्याकडेही आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जीवितासह सर्वच मालमत्तेच्या संरक्षणाची हमी दिलेली आहे. आमच्याकडे असलेली सुमारे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या ही समस्या न मानता संधी मानली पाहिजे. भारताच्या सर्वच क्षेत्रीय विकासात गैरहिंदू मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारसी, यहुदी इत्यादी सर्वच धर्मियांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. भारतातील गैरहिंदू भारतीय बांधव हे एकेकाळचे मूळ हिंदू असून आमच्याच डीएनएचे आहेत, बांधव आहेत, ही आरएसएस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भूमिका स्वागतार्ह आहे. तसेच स्वतःला हिंदू धर्माचे संरक्षक मानणाऱ्यांनी मशिदींवर अधिकार सांगू नयेत, ही सूचनाही अभिनंदनीय आहे. मराठा सेवा संघ आरएसएस प्रमुखांच्या या भूमिकेचे समर्थन करताना अपेक्षा करतो, की कृपया त्यांनी आरएसएस केडरला त्याचे पालन करण्या सक्त आदेश द्यावेत. सरसंघचालकांच्या २०२१ पासूनच्या या सर्वसमावेशक भूमिकेचे बहुसंख्य मुसलमान मतदारांनी स्वागत केल्यामुळेच केंद्रात व अनेक राज्यात भाजपाचे सरकार आहे. थोडक्यात आम्हालाही वादाचे मुडदे व मुद्दे सामंजस्याने बाजूला सारून गाडून टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, विचारवंत यांनी दीर्घकालीननियोजन करून व्यावहारिक उपाययोजना अमलात आणणे गरजेचे आहे. सदासर्वकाळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून, पिढ्यांचे नुकसान करण्याऐवजी आपसी सामंजस्य वा गौतम बुद्धाचा सम्यक विचार, सम्यक मार्ग उपयोगी ठरेल. सर्वांनीच अहंकार बाजूला सारून जवळ यावे अशी विनंती आहे.
२४. श्रीराम व श्रीकृष्ण चरित्रातील महत्त्वाचे आदर्श व पालन :
श्रीराम व श्रीकृष्ण खरे की खोटे, मिथक की सत्य, ऐतिहासिक की अनैतिहासिक, अनार्य की आर्य इत्यादी वादात न पडता आपल्याला त्यांच्या जीवनातील त्रिकालाबाधित काही आदर्श समजून घेत पालन करणे उपयुक्त ठरेल. दैनंदिन अगदी वर्तमानातील जीवनातही खरे सत्य बाहेर येत नाही. श्रीराम चरित्रातील अत्यंत महत्त्वाचे प्रसंग आपण पाळावेत असे मत आहे.
(१) श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे दशरथ राजाचे चार राजपुत्र होते. बुद्धिमान, सत्ताधारी, श्रीमंत व अतिशय सुंदर होते. असे असतानाही या चारही भावांची लग्ने जनकनगरीत राजा जनकाच्या कन्यांसोबत एकाच मंडपात व एकाच वेळी लागले होते. म्हणजेच हा जगातील पहिला सामूहिक विवाह ठरतो. तसेच आपल्याकडे अंधश्रद्धा आहे, की एकाच वेळी एकाच मंडपात एकच विवाह लावावा. ही अंधश्रद्धा मोडीत निघते. कारण या चारही बंधूंचे वैवाहिक जीवन अतिशय सुखी, समृद्ध व आनंददायी होते, तसेच चारही भाऊ व चारही जावा शेवटपर्यंत एकविचाराने राहिले. आम्हाला अशा कौटुंबिक जीवनाची गरज आहे. साम
(२) श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे राजा दशरथाचे सुपुत्र कौशल्या, सुमित्रा व कैकेयी या महाराण्यांच्या पोटी ते जन्माला आले होते. म्हणजेच ते सख्खे भाऊ नव्हते. तर सावत्र भाऊ होते. श्रीरामांचा राज्याभिषेक थांबवून त्यांना चौदा वर्षे वनवासात जावे लागले. या दरम्यान रावण व त्याचे सैन्य मारले, श्रीराम महान जेता झाले. परंतु त्यांनी रावणाचा द्वेष न करता आदर राखला. वनवासी जाताना श्रीरामाने राज्यकारभाराचे सर्वाधिकार व सर्व सूत्रे भरताकडे दिले होते. चौदा वर्षांचा वनवास संपून श्रीराम अयोध्या नगरीत परत येत आहेत. हा निरोप मिळताच राजा भरत व नागरिक, मंत्रिमंडळ त्यांना आणण्यासाठी चालत गेले. श्रीरामांचे स्वागत केले. नगरीत वाजतगाजत सन्मानपूर्वक आणले. राजा भरताने चौदा वर्ष श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर्श राज्यकारभार केला होता. लोककल्याण व अर्थव्यवस्था यांची उत्तम सांगड घातली होती. राज्याचे सर्वतोपरी संरक्षण केले होते. राजा भरताने श्रीराम नगरीत पोचताच सर्वच राज्यकारभार त्यांच्या हवाली केला. श्रीराम आश्चर्यचकित व आनंदित झाले. समाज बांधवांनो, आपल्याला अशा विश्वासपूर्ण व एकमेकांवरील अलोट प्रेमाची गरज आहे. वर्तमानात एकाच कुटुंबातील सख्खा भाऊ बाहेर परदेशात जाताना आपली मालमत्ता सख्ख्या भावाकडे सुरक्षित राहील की नाही, या विवंचनेत असतो. परिणामी कौटुंबिक स्वास्थ व आपसी प्रेम संपत आहे. हे टाळायलाच पाहिजे.
(३) श्रीकृष्णाच्या जीवनात गोकुळातील गवळ्यांना इंद्रास सक्तीचा टॅक्स- मोठा कर द्यावा लागत होता. लादलेला कर चुकीचा असल्याचे प्रत्येकाचेच मत होते. परंतु साक्षात देव व महाबलाढ्य शासक असल्याने कोणी विरोधात जात वा बोलत नव्हते. याशिवाय सर्वच गवळी एकसंध नव्हते. विविध गटात-जातीत विभागलेले होते. आपसात स्पर्शबंदी, रोटीबंदी होती. त्यामुळे एकत्रित येऊन इंद्रास विरोध करणे अवघड होते. यात श्रीकृष्णाचाही समावेश होता. त्यांनी इंद्रास विरोध करण्याचे ठरवले. सर्वच समाज शोषणमुक्त करण्यासाठी प्रारूप तयार केले. सर्व गवळी व गुराख्यांना विश्वासात घेतले. आपण सर्व एकच असल्याचा विश्वास निर्माण केला. सतत प्रबोधन केले. आणि एके दिवशी सर्वच शेकडो गवळी गुराख्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. सर्वांना त्याभोवती गोलाकार बसवले. एकत्रित केलेल्या शिदोऱ्यांचा एकजीव काला केला व सर्वांनीच आनंदाने सोबत भोजन केले. भेदभाव संपला. सर्व पूर्ण एकजीव झाले. श्रीकृष्णाचे नेतृत्व मान्य करून एकमताने इंद्राला बेकायदेशीर कर न देण्याचा निर्णय झाला. आणि श्रीकृष्णाच्या नेतृत्वाखाली आयोजित अशा पहिल्या जनआंदोलनाला एकतर्फी यश आले. इंद्र शरण आला. गवळ्यांच्या घरात समृद्धी आली. गाव व समाज एक झाले. आम्हाला अशा नेतृत्वाची व समाजव्यवस्थेची गरज आहे. आम्ही दैनंदिन जीवनात काही अन्याय, अत्याचार स्वेच्छेने स्वीकारलेले दिसतात. तर काही लादलेले आहेत. ते नाकारून समृद्ध जीवन जगण्याची गरज आहे. पुराणे वा मिथके यांची वैज्ञानिक अंगाने चिकित्सा जरूर करावी. त्यातील भेसळ दूर करावी. परंतु सकारात्मक विचारांनी आपले जीवन समृद्ध करणारे विचार-आचार स्वीकारावेत. वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक जीवनातील अन्याय, अत्याचार, समूळ निपटून काढणारा महानायक म्हणून श्रीकृष्ण चरित्राचा उपयोग होऊ शकतो. तीच अपेक्षा आहे.
२५. शिवमेळा आयोजन :
बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे शहरीकरणामुळे तसेच प्रत्येकाच्या जीवनातील अस्थिरतेमुळे एकेकाळची एकत्रित संयुक्त अशी कुटुंबपद्धती - खटल्याची कुटुंबे टप्या टप्प्यात तुटत गेली. आता आम्ही मायक्रो न्यूक्लिअर - नवरा व बायको किंवा सोबत एक-दोन मुले असे त्रिकोणी चौकोनी झालो आहोत. तसेच विविध भागात, शहरात, गावात विखुरले गेलो आहोत. परिणामी एकाच कुळातील, एकाच रक्ताची व नात्याची कुटुंबे वा नवीन पिढीतील बालके, युवक एकमेकांनाच काय तर अगदी सख्ख्या आत्या, मावश्या, काका, काकू, मामा, मामी, आतेभाऊबहीण, मामेभाऊ बहीण अशा एकाच पिढीतील मुलांच्याही आपसात ओळखी नाहीत. शेजारपाजार नाही. मोबाइलमुळे त्यांचे भावविश्व, समाजविश्व, नातेविश्व अक्षरशः संपुष्टात आले आहे. तर अनेक कारणास्तव आई-वडील मुलांना सोबत घेऊन जाऊन सर्वच नातेवाईकांची भेट, ओळख घडवून आणू शकत नाहीत. बरेचदा काही कुटुंबातील मुलेमुली आपसात सोशल मीडियावर कनेक्टेड असतात. हा एक हायटेक प्रकार आहे.
'याचीच पुढील पायरी शिवमेळा, कुटुंबाचेच कुळमेळा आयोजन, आपल्याला साधारणपणे अगदी जवळचे, रक्ताच्या नात्यातले पंधरा-वीस नातेवाईक सहज असतात. अशा जवळच्या नातेवाईकातील तीन-चार पिढ्यांचे लोक जास्तीत जास्त लोकांना सोयीच्या ठिकाणी व सोयीच्या दिवशी नियमितपणे दोन-तीन वर्षात एकदा एकत्र येऊ शकतात. यामुळे नातेसंबंध, कुटुंबव्यवस्था, समाज व्यवस्था मजबूत होऊन टिकून राहण्यास खूप मदत होते. महत्त्वाचे म्हणजे नवपिढीतील मुलांना कौटुंबिक नाते, स्नेह समजतो. आजी आजोबा, काका-काकू, मामा-मामी, मावश्या-आत्या, चुलत भाऊ बहीण अशी नात्यांची वीण व साखळी समजते. आपसात स्नेहभाव निर्माण होतो. एकमेकांस आधार मिळतो. यासाठी जास्तीत जास्त कुटुंबमेळे, शिवमेळे आयोजित व्हावेत. तेथे नातेसंबंधाशिवाय सामाजिक संबंध, जगभरातील विविध बदलते प्रवाह, स्पर्धा, संधी यावरही उत्तम चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. आपण उघड्या डोळ्यानी जगभरातील विषमता किंवा स्पर्धा पाहिली तर असे लक्षात येइल, की विकसित समाजातील युवाशक्ती स्पेसमध्ये परग्रहावर खेळत आहेत तर आमची युवाशक्ती स्मशान वाटेने अंगाला भस्म न लावता जीवनाची राखरांगोळी करून घेत आहेत. स्टोन एज मध्ये वावरत आहेत. कुटुंब मेळे वा शिवमेळ्यांच्या आयोजनातून हे चित्र बदलायचे आहे. यासाठीच आयोजन करावे. पुढच्या टप्यात एकाच रक्ताचे वा नात्यातील कुटुंबे न बोलावता आपापल्या परिचयातील परिसरातील वेगवेगळे धर्म, जाती जमाती, संस्कृती, क्षेत्रे, शाखा, कला, ज्ञानक्षेत्रे, कुटुंबांनी दोन-तीन दिवसांसाठी एकत्रित यावे. नेहमी मुले-मुली सोबत घेणे. त्यांच्यावर या व्यवस्थेचा प्रभाव असावा. तसेच अशा मेळ्यात कालबाह्य परंपरा-रूढी, अंधश्रद्धा, शोषण अशा बाबींचे समर्थन वा उदात्तीकरण होऊ नये. युवा पिढीला भारतीय संविधान, मानवतावादी व समतावादी भारतीय समाजव्यवस्था व महत्त्व समजावून सांगावे. 
२६. व्यक्तिविकास :
समाजशास्त्रीय सिद्धांतानुसार व्यक्तीपासून कुटुंब, कुटुंबापासून समाज बनत असतो. म्हणजेच समृद्ध व सुदृढ समाजासाठी त्यातील मूलभूत घटक व्यक्तिप्रबळ व शक्तिमान असणे अत्यावश्यक आहे. ही अंशतः नैसर्गिक तर अंशतः जाणीवपूर्वक घडवून आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्ती अगदी गर्भावस्थेतच संस्कारित होत असते. तर जन्मानंतर ज्ञानेंद्रिये - डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा यातून आलेल्या विविध अनुभव तसेच निरीक्षणातून समृद्ध होत जाते. याचाच अर्थ असा, की आम्हाला जन्मल्यापासून बालपणी, युवावस्थेत, तरुणपणी कोणत्या वातावरणाचा लाभ झाला यावरच आमची जडणघडण तसेच व्यक्तिमत्त्वविकासाची स्थिती अवलंबून असते. तसेच वातावरण कितीही समृद्ध असले तरी बालकांवर प्रभाव पाडणारी कुटुंबातील माणसे शेजारीपाजारी, शाळेतील वातावरण व शिक्षक-शिक्षिका यांची विचारधारा इत्यादी बाबीच महत्त्वपूर्ण आहेत. आमचे वागणे बोलणे तसेच कृती याच विचारांवर अवलंबून असते. आम्ही तसेच का वागतो यासाठी आमच्या मेंदूवर बालपणीच बिंबवण्यात आलेले विचार. हे विचार ज्ञानवादी, विज्ञानवादी, विवेकवादी, मानवतावादी, परिवर्तनवादी इत्यादी प्रकारचे ते या विरोधात अमानवी, विषमतावादी, शोषणवादी असेही असू शकतात, नववाद विरुद्ध जुना वाद हा जगभरातील एक प्राचीन संघर्ष आहे. व्यक्तिविकासासाठी विचारांमध्ये बदल आवश्यक आहे. म्हणूनच विचार बदलला तर स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला तर सवयी बदलतात, सवयी बदलल्या तर व्यक्तिमत्त्व बदलते तर व्यक्तिमत्त्व बदलले तर भवितव्य बदलते. एवढा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व विचारांचा जवळचा संबंध आहे. विकासवादी, सुधारणावादी, विज्ञानवादी, मानवतावादी, समतावादी विचारांचे पालन हाच आपल्यासाठी सर्वोत्तम जीवनमार्ग आहे. जमेल तो, आवडेल तो शक्य तोवर सन्मार्ग निवडून प्रत्येक व्यक्तीने प्रथम स्वतःला व शेवटी राष्ट्राला जास्तीत जास्त क्षेत्रात वर्तमानातील शहाजी- जिजाऊ, शिवाजी बनवावे हीच सदिच्छा.
या जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून आपल्याला स्वत:सह व अंतिमतः वैश्विक बंधुभावासाठी जाणीवपूर्वक काही राष्ट्रबांधणीसाठी शिवसंकल्प करून ते अमलात आणायचे आहेत. अनेक आदशांची जाणीव ठेवून त्यावरच आधारित योग्य ते व्यावहारिक जीवन जगावे लागेल. त्यापैकी निवडक शिवसंकल्प असे आहेत.
(१) कोणत्याही परिस्थितीत मी जीवनात शेवटपर्यंत मायबापाचा आदर राखेन. मी माझ्या परीने सर्वशक्तिमान होण्यासाठी कार्यरत राहीन. माझ्या आवडीचे सर्वशाखीय शिक्षण जन्मभर घेईन. शिक्षणाचा उपयोग सर्वप्रथम व्यक्तिगत, मानसिक व बौद्धिक विकासासाठी करेन. नंतर शारीरिक व आर्थिक विकास यासाठी काम करेन. सहजासहजी व चांगली नोकरी मिळाली व सर्वप्रकारे चिकित्सा केल्यावर योग्य वाटल्यास मी नोकरी करेन. अन्यथा माझ्या कुवतीनुसार, आवडीनुसार कोणताही उद्योग करेन. इतरांना सोबत घेऊन उद्योग, व्यवसाय, व्यापार करेन. आर्थिक साहाय्य कायदेशीर मार्गाने उभे करेन. मायबाप व अन्य कुटुंबातील सदस्यांना पूर्णपणे विश्वासात घेऊन एकजीवानेच राहू.
(२) मी कोणत्याही परिस्थितीत दुर्व्यसनाच्या आहारी जाणार नाही. मुली, महिला यांचा आदर राखेन. तसेच कुटुंबातील सदस्यांसह इतरांनाही दारू पिणे, गुटखा खाणे, तंबाखू खाणे, बिड्या-सिगारेट ओढणे, गांजा, ड्रग्ज इत्यादी दुर्व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रबोधन व काम करेन. महिला व पुरुष असा भेदभाव करणार नाही. आम्ही सारे भारतीय एकच आहोत. याचे पालन करेन.
(३) मी पूर्णपणे स्वत:च्या पायावर आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उभा/उभी राहिल्याशिवाय लग्न करणार नाही. तसेच मी माझ्या आवडीचाच जोडीदार निवडण्यासाठी स्वतः पुढाकार घेईन. होणाऱ्या जोडीदारास परिवर्तनवादी व समतावादी जीवनपद्धतीचे महत्त्व माहात्म्य समजावून सांगेन. जीवनात अंमलबजावणी करेन. परंपरागत कालबाह्य रूढी-प्रथा यांपासून दूर राहू. एकमेकांचा आदर राखून सुखाने व आनंदाने संसार करू.
(४) अपत्यांना सर्वोत्तम सुखसुविधांसह शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊ. तसेच अपत्यांवर मानवतावादी व समतावादी संस्कार करू. कुटुंबात संसद उभी करू. एकमेकांचा आदर करू.
(५) जीवनात शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता व मीडियासत्ता या पाच सत्तांमध्ये प्रवेश करून आपले वर्चस्व स्थापन करण्याचा सतत प्रयत्न करेन.
(६) आपल्या शेतात व डोक्यात काय पिकते? याचा विचार न करता बाजारात जे विकले जाते तेच पिकवण्यावर ठाम राहीन. यासाठी मन, मान, मनगट, मस्तक, मणका व मेंदू सशक्त राहील याची काळजी घेईन.
(७) जग बदलण्याचा आग्रह धरत असतानाच त्याची वाट न पाहता प्रथम मी व माझे कुटुंबीय नवविचारांचा स्वीकार करून बदलाचा स्वीकार करू. कारण बदल हाच नवयुगाकडे जाणारा एकमेव महामार्ग आहे. जगातील प्रत्येक क्षेत्रात अगदी क्षणाक्षणाला नवनवे बदल होत आहे. मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार जे-जे वर्ग-लोक नवीन बदलाचा स्वीकार करून अंगीकार करण्यात मागे राहतात, ते बदलत्या वातावरणात टिकू शकत नाहीत. यामुळेच महाकाय डायनासोर जगातून नष्ट झालेले आहेत. जीवनातील हाच सत्य व्यवहार मी स्वत: समजून घेईन तसेच जास्तीत जास्त लोकांनाही त्याचा अवलंब करण्याचा आग्रह धरेन.
(८) नियमितपणे व दररोज नवनव्या पाच-दहा कुटुंबाना जोडण्यासाठी प्रयत्नशील राहीन. समाज जोडण्यासोबतच त्यांना बुद्ध, शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांची सर्वव्यापी कार्यपद्धती समजावून सांगेन.
(९) मी दररोज नियमिपणे एखादे तरी परिवर्तनवादी व नवजीवनाचे मार्गदर्शन करणारे पुस्तक वाचन करेन. माझ्या ऐपतीनुसार खाजगी गृहग्रंथालय/वाचनालय निर्माण करेन. वेळेचा सदुपयोग करेन.
(१०) मी नियमितपणे जगभरातील विविध क्षेत्रातील बदलते प्रवाह समजून घेऊन आत्मसात करेन. त्याचे विश्लेषण करून उपयुक्त असेल ते अंगीकार करेन. स्वत:ला अपडेट करेन.
(११) मी मॉडर्न लिव्हींग व मॉडर्न थिंकींग या सूत्रावर आधारित जीवन पद्धतीचा अवलंब करेन.
(१२) मी कोणत्याही क्षेत्रातील करिअरमध्ये फारसा भेदभाव न करता, वा अनावश्यक उठाठेव न करता मला आवडेल त्याच क्षेत्रात सर्वोत्तम होण्यासाठी काम करेन.
(१३) मी जन्मभर माझ्या सोयीनुसार तसेच कुवतीनुसार स्वेच्छेने व आवडीने  समाजातील गरजवंतांना वेगवेगळ्या स्वरूपात आर्थिक, वस्तूरूपात - साहित्य मदत करेन. सामाजिक ऋणाची जाण ठेवून जीवन जगेन.
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि मराठा ओळखावा, शिवराय तेथेचि जाणावा ।।
या मानवी मूल्यांवर संपूर्ण विश्वास ठेवून मी सामाजिक ऋणात राहीन.

पहिली जिजाऊ रथ यात्रा :
१९ फेब्रुवारी ते २ एप्रिल २००२ दरम्यान आयोजित जिजाऊ रथयात्रामध्ये खालील मुद्दे हाताळण्यात आले होते.
१) मराठा समाजातील सर्व जाती-पोटजातीत मतभेद गाडून आपसात बेटीव्यवहार सुरू करणे. कुणबी, कुळवाडी, पाटील, देशमुख, मराठा, आगरी, भंडारी, राजपूत हे सर्व तट उखडून टाकणे. ही मानसिकता स्वीकारण्यासाठी भटबंदी हवी - तटबंदी नको विकासाची ही पायरी आहे. वरील गटातटांचे प्रबोधन करून
एकसंघ समाज निर्मितीसाठी प्रयत्न व कृतिशील कार्यक्रम राबविणे.
२) महिलांचा कौटुंबिक तसेच सामाजिक कार्यात सहभाग वाढविणे. प्रत्येक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग असणे म्हणजेच महिलांचे सबलीकरण, हे महिलांना सांगणे.
३) युवकांना स्वावलंबी व स्वाभिमानी बनविणे. त्यासाठी नोकरीच्या मागे न धावता बुटपॉलिशपासून ते डोक्याच्या मालीशपर्यंत कोणताही स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करणे. त्याशिवाय लग्न न करणे.
४) प्रत्येक गावात उच्च दर्जाच्या प्राथमिक शाळा सुरू करून शिक्षणातून सर्वच सत्ता निर्माण करणे व युवकांना रोजगार उपलब्ध करणे.
५) मराठा धर्म स्थापनेबाबत जागरण व जनमत तयार करणे.
६) मासिक मराठामार्ग व साप्ताहिक शिवधर्म यांचा प्रसार करणे.
७) मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्व मराठा जोडणे.
८) दान संस्कृती हाच मराठाधर्म रुजवणे.
९) मराठा समाज पूर्ण व्यसनमुक्त करणे.
१०) शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवणे. त्यासाठी त्यांना एकत्रित संघर्षासाठी तयार करणे.
११) मराठा सेवा संघाचे २८ कक्ष निर्माण करणे.
१२) राजर्षी शाहू शिक्षण परिषदेद्वारा शिक्षणसत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणे. परिवर्तनाचे मुख्य शस्त्र म्हणून स्वतःची शिक्षणव्यवस्था निर्माण करणे. संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी समन्वय व सहकार्य करणे. शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी खालील उद्दिष्टे व कार्यक्रम राबवणे.
राजर्षी शाहू शिक्षण शिक्षण परिषदेची उद्दिष्टे :
१) उच्च दर्जाचे व सत्य व्यावहारिक प्राथमिक शिक्षण.
२) आपलेच डोके, आपलाच मेंदू व आपल्याच हिताचे शिक्षण.
३) शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे.
४) टप्प्या-टप्प्याने उच्च शिक्षणापर्यंत वाटचाल.
५) गाव तेथे आमचीच शाळा.
६) शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान न घेता समाजातूनच देणग्या घेऊन समाजानेच समाजाचा सर्वांगीण विकास करणे.
७) शैक्षणिक दहशतवादापासून बहुजन समाज मुक्त करणे.
कार्यक्रम
१) सुमारे ३५००० बालवाड्या, प्राथमिक शाळा राज्यभर उघडणे. आपल्या अभ्यासक्रमानुसार चालवणे.
तीन वर्ष पूर्ण मुलांसाठी : जिजाऊ संस्कार केंद्र
चार वर्ष पूर्ण मुलांसाठी : ताराराणी संस्कार केंद्र
२) नैसर्गिक वाढीनुसार ३५००० प्राथमिक शाळा उघडणे व चालविणे.
३) २५००० व्यायामशाळा उघडणे व चालवणे.
४). ३०००० ग्रामीण वाचनालये उघडून तेथे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिवर्तनासाठी वाचनीय पुस्तके ठेवणे. सामूहिक वाचन.
५) ६००० प्रशिक्षण केंद्रे उघडणे.
६) १०००० विद्यालये सुरू करणे.
राजर्षी शाहू शिक्षण परिषदेने विकसित केलेला तसेच शासनानेही स्वीकारलेला अभ्यासक्रम राबविण्यात येईल. प्राथमिक शाळेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यास किमान पाच भाषा वाचता, लिहिता व बोलता याव्यात. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, एक दक्षिण भाषा व एक परदेशी भाषा- फ्रेंच, जर्मन, चायनीज वा जपानी यांचा समावेश राहील. विज्ञान, सामान्यज्ञान, गणित, समाजशास्त्र यांची पुरेपूर माहिती, संगणकाचा सहजासहजी वापर करता येईल.

 २७ ) आरक्षण एक जटिल समस्या :
कुटुंबातील एखादी व्यक्ती मानसिक, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक इत्यादी कारणाने दिव्यांग, दुर्बल किंवा परावलंबी असते. अशावेळी अन्य सदस्य त्या दुर्बल मुलांचे सर्वच प्रकारे संगोपन करतात. ती व्यक्ती स्वावलंबी होण्यासाठी विविध इलाज करतात. याच भावनेने समाजात अगदी जन्मत:च किंवा त्यांची कोणतीही चूक नसताना काही समाज घटकांना त्यांच्या अगदी मूलभूत मानवाधिकारापासून दूर ठेवले जाते. अशा सर्वहारा समाजाला शासनाने इतर समाज घटकांसोबत येण्यासाठी जाणीवपूर्वक शैक्षणिक, आर्थिक, नोकरी, राजकारण अशा सर्व क्षेत्रात संधी देणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय संविधानाने शिक्षण, नोकरी व राजकारणात आरक्षणाच्या माध्यमातून तरतूद केलेली आहे. हजारो वर्षांपासून भारतीय धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी क्षेत्रात असामाजिक विषमतावादी विचारधारांचे प्राबल्य राहिलेले आहे. हे जगभरातील जवळपास सर्वच देशात कमी अधिक प्रमाणात पसरलेले आहे. असे असले तरी भारतीय विषमता व शोषण हे जगात कुठेही न आढळणाऱ्या जात संकल्पनेवर वर्णव्यवस्थेवर अवलंबून आहे. यालाच सनातन धर्म असे म्हणतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्ण फक्त पुरुषांसाठी. स्त्रिया वर्ण बाह्य. शूद्रति शूद्र व अशुभ मानतात. ब्राह्मण पुरुष वगळता अन्य वर्गातील स्त्रिया व पुरुषांना शिक्षण, संरक्षण, शस्त्र, पैसे बाळगणे व कमावणे इत्यादी अधिकार नाहीत. एवढेच नाही तर त्याचे पालन करणे राजांचे कर्तव्य होते. यालाच वैदिक धर्म व्यवस्था म्हणतात. त्यासाठी अनेक धर्मग्रंथ स्मृती दिलेले आहेत. त्यानुसार अधिकृतपणे जन्मावर आधारित सामाजिक विभागणी करण्यात आली आहे.
इंग्रजांच्या काळात सर्वप्रथम भारतीय समाज जीवनाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्यात आला. त्यातून समाजाची सर्वसाधारण विभागणी पूर्वकालीन अस्पृश्य शेड्युल्ड कास्ट, एसटी, आदिवासी वर्ग-जनजाती-शेड्युल्ड ट्राईब्ज, एसटी, इतर मागासवर्गीय, ओबीसी व अन्य ओपन अशा प्रकारे करण्यात आली. शासकीय नोकरीत संविधानिक आरक्षण एससी, एसटी, ओबीसी देण्यात आले. भारत देश स्वतंत्र झाल्यावर कलम ३४० ओबीसी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास समाज, एससी पूर्वाश्रमीचे अस्पृश्य समाज ३८९, एसटी-आदिवासी समाज कलम ३४२ अशी तरतूद करण्यात आली. एससी व एसटी घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात १००% आरक्षण, शिक्षण, नोकरी, राजकारणात दिलेले आहे. तर ओबीसी ठरवण्याची जबाबदारी शासनावर दिली आहे. जुन्या जनगणनेनुसार एससी १५%, एसटी ७.५०% आहेत. वेळोवेळी झालेल्या चर्चा, न्यायनिवाडा यानुसार जास्तीत जास्त आरक्षण मर्यादा काही अगदीच विशेष कारणाशिवाय ५०% मर्यादित आहे. एससी व एसटी १५+७.५० २२.५०% वजा केल्यास ओबीसींना ५०-२२.५०=२७.५०% आरक्षण मिळते. भारतीय समाजरचनेत सर्वाधिकार प्राप्त ओपन कॅटेगिरीत फक्त ब्राह्मण हाच परिपूर्ण समाज आहे. काही क्षत्रिय व जात समूह स्वतःला ब्राह्मणाबरोबरच मानतात. परिणामी ते ओपन प्रवर्गात समाविष्ट होतात. प्रत्यक्षात त्यांना शिक्षणाचे अधिकार नव्हते. थोडक्यात अनेक वर्षे ५०% ओपन मध्ये तसेच एससी, एसटी, ओबीसी मधील ५०% मध्ये योग्य उमेदवार उपलब्ध नाहीत या कारणास्तव जास्तीत जास्त ९५% पर्यंत केवळ ब्राह्मणांनाच शिक्षण व नोकरीत संधी होत्या. तसेच लोकसभा, विधानसभात देखील एससी व एसटी वगळता अन्य ९०% जागेवर केवळ ब्राह्मण खासदार-आमदार होत. ओबीसी ठरवण्यासाठी केंद्र शासनाने १९५३ मध्ये काका कालेलकर आयोग तर १९७९ मध्ये मंडल आयोगाची स्थापना केली होती. कालेलकर आयोग अहवाल लागू झालाच नाही. तर मंडल आयोगाची अंमलबजावणी सन १९९१ मध्ये प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी केली. पुढे १९९२ मध्ये इंद्रा सहानी केसमध्ये अन्य सर्वच आरक्षणे रद्द करण्यात आले.
याच केसनंतर भारतात आरक्षण हा विषय जिव्हाळ्याचा, वादाचा, राजकारणाचा झाला. त्यामुळे भारतातील आरक्षणाच्या भावना का होईना इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.
सन १८८२ मध्ये भारत भेटीवर आलेल्या ब्रिटिश हंटर कमिशनला महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतीय समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक चित्र मांडणारे निवेदन दिले. त्यातच त्यांनी समाजातील सर्वहारा मागास-शोषित समाजासाठी हक्काचे आरक्षण असल्याशिवाय तो समाज पुढे येणार नाही हे स्पष्ट केले. शिक्षण व नोकरीत हक्काच्या आरक्षणाची मागणी केली. हीच भारतीय आरक्षणाची प्रथम नोंद होय. नंतर सन १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थांनचे राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानातील शासकीय व खाजगी क्षेत्रात ब्राह्मण, शेणवी, पारसी व कायस्थ वगळता मराठा जातींसह इतर सर्वच जातींसाठी सरसकट ५०% आरक्षणाची तरतूद केली. तसा आदेश काढून अंमलात आणला. हेच जगातील पहिले सरकारी व खाजगी क्षेत्रातील आरक्षण.
नंतर ब्रिटिश शासनाने १९०९ पासून वेगवेगळे आयोग नेमून सर्व्हेक्षण केले. १९३५ मध्ये एस सी व एसटी वर्गीकरण केले. त्यांना लोकसंख्येच्या आधारावर १००% प्रमाणात आरक्षण लागू केले. पुढे ओबीसी समकक्ष इंटरमिजिएट क्लास निर्माण केला. यात सुमारे २५८ जाती समाविष्ट केल्या एप्रिल १९४२ मध्ये आरक्षण लागू झाले. यात मराठा व कुणबी अशा वेगवेगळ्या दोन जातींचा समावेश होता. तसेच तेली, माळी, धनगर, शिंपी, कुंभार, नाव्ही, वंजारी, बंजारा इत्यादी होते. हेच आरक्षण १९५० पर्यंत लागू होते. तर महाराष्ट्रात १९५०, १९६०, १९६५, १९६९, १९७० साली वेळोवेळी यात फरक होत गेले. आणि मराठा जात ओबीसी आरक्षणातून वगळण्यात आली. यासाठी तत्कालीन मराठा राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. इतरांना दोष देण्यात अर्थ नाही.
स्वतंत्र भारतात १९५३ मध्ये कालेकर तर १९७८ मध्ये मंडल आयोगाची स्थापना ओबीसी जातींची निवड ठरविण्यासाठी केंद्र सरकारने केली होती. परंतु दुर्दैवाने या दोन्ही आयोगासमोर मराठा नेत्यांनी ओबीसीची मागणी नोंदवली नाही. एवढेच नाही तर मंडल आयोगाविरोधात काही मराठा नेत्यांनी मोर्चे काढले होते. परिणामी मंडल आयोगाने मराठा समाजाला ओबीसी मधून वगळले. इंग्रज काळापासून कुणबी ओबीसीत आहे. विदर्भातील कुणबी-मराठा समाज भूषण डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सन १९३३ व १९५४-५५ मध्ये तत्कालीन मराठवाडा व उर्वरित सर्वच महाराष्ट्रात प्रबोधनपर दौरे काढले होते. मराठा समाजाने जुना तोरा व अहंगंड सोडून जात दाखल्यावर कुणबी शेतकरी नोंद करावी यासाठी सभा घेतल्या. परंतु दुर्दैवाने त्यांच्या सभा उधळण्यात आल्या होत्या. तर विदर्भातील बहुतांशी मराठा समाजाने त्यांचे ऐकले. या कारणास्तव विदर्भातील मराठा, देशमुख, पाटील, कुणबी सरसकट कुणबी आहे. तरीही पूर्व विदर्भातील व पश्चिम विदर्भातील कुणबी एक मानले जात नाहीत अथवा काही ठिकाणी कुणबी व मराठा बरोबरीचे मानले जात नाहीत. देशमुख-पाटीलही वेगवेगळे बसतात. एकत्र दिसतात. परिणामी अनेक कुणबी-मराठा कुटुंबे, एकाच वेळी आरक्षणासाठी कुणबी, गावच्या पाटीलकीसाठी पाटील, सोयरिकीसाठी देशमुख, राजकारणासाठी मराठा, तोरा मिरवण्यासाठी राजपूत होतात. बदलत्या अर्थव्यवस्थेत आपण संपत आलोय याची जाणीव मराठा समाजाला उशिराच झाली. आता पुलाखालून सारे पाणी वाहून गेले आहे. काही मराठा समाजाच्या चुकांमुळे तर काही मराठा विरोधी गटांमुळे मराठा समाजाची कधीही भरून न निघणारे नुकसान झालेले आहे. त्यात आरक्षणाचा लाभ न मिळणे एक आहे. सर्वच राजकीय पक्ष मराठा समाज ओबीसीत सामील करूच नये यावर ठाम व एकमत आहे. मराठा समाज एकसंध नाही. विखुरलेला आहे. एक नेता नाही. एक संघटन नाही. दिशा नाही. तर प्रस्थापित मराठा नेते ओबीसी राजकारण विरोधात आहे. खत्री ते गायकवाड आयोग, देशमुख ते शिंदे समिती, उच्च व सर्वोच्च न्यायालय यांचे अहवाल, संशोधन, निष्कर्ष मराठा समाजाला ओबीसीत सामील करू नये असेच आहेत. मराठा सेवा संघानेही सन १९९९ मध्ये मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसी मध्ये करण्याची मागणी केली होती. त्याला यश आले नाही. २०१५ पासून सकल मराठा क्रांती मोर्चा ते मनोज जरांगे पाटील आंदोलनामुळे समाजात मराठा समाज विरुद्ध सर्वच ओबीसी व काही इतर समाज अशी सर्व सरळ विभागणी झाली. यामुळे मराठा समाज पूर्णपणे एकाकी पडलेला आहे. कोणीही हितचिंतक मित्र नाही.
या कारणाने मराठा समाजाने आता आर्थिक मागासले वर्गाची आरक्षणाचा लाभ घेणे सयुक्तिक व हितकारक आहे. महाराष्ट्र शासनाने ५०% मर्यादा ओलांडून व वेगळी वर्गवारी करून दिलेले आरक्षण तकलादू, असंविधानिक आहे. तात्पुरते व राज्यापुरतेच आहे. ई.डब्ल्यू. एस. - आर्थिक मागासलेला वर्ग आरक्षण राज्य व केंद्रीय पातळीवर शिक्षण व नोकरीत लागू होते. दहा टक्के आरक्षणाचा ७ ते ८ टक्के भाग मराठा समाजाला मिळू शकतो. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेतून मिळणारे शैक्षणिक व प्रशिक्षणाचे अनेक लाभ मिळतात. या सत्यावर आधारित दृष्टिकोण लक्षात घेऊन मराठा युवकांनी ओबीसी समावेश सध्यातरी डोक्यातून काढून टाकावा. मंडल आयोग १९८० ते २०२५ असे ४५ वर्षे झालेली आहेत. याच काळात अनेक ओबीसी घटक पुढारलेले झाले आहेत. तर मराठा समाज व अन्य पुढारलेले समाज मागासलेले झालेले आहेत. ते शोधण्यासाठी व आजचा ओबीसी ठरविण्यासाठी लवकरात लवकर नवीन आयोगाची स्थापना करावी. आणि आतापासून मराठा युवकांनी आयोगासमोर आपले मागासलेपण सिद्ध करावे असे आवाहन आहे. शेवटी नम्र आवाहन आहे की, ओबीसी समावेश ही मागणी कायदेशीर शांततेच्या वैध मार्गाने चालू ठेवायला हरकत नाही. परतु कृपया जाळपोळ वा तोडफोड करून, दंगल करून नेहमीसाठी जीवनाचे नुकसान होईल अशी गुन्हेगारी स्वरूपाचे आंदोलन करू नका.
                                                                                                             जय जिजाऊ.
२८. क्रिया व प्रतिक्रिया वाद :
मराठा सेवा संघाची नेहमीच भूमिका राहिली आहे की, आपण नेहमीच क्रियावादीच रहावे. अगदीच अपवादात्मक प्रसंगी प्रतिक्रियांचा वापर असावा. तसेच प्रतिक्रिया ही उच्च स्तरावरून ठरवावी. ऊठसूट प्रतिक्रिया देत राहण्याने आपली ताकद वाया जाते. नकारात्मक विचार प्रसारित होतात. प्रतिमा मलिन होते. ५ जानेवारी २००४ रोजी संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर मावळ्यांनी भांडारकर संस्थेविरोधात केलेली कारवाई ही क्रिया तसेच प्रतिक्रिया सदरात मोडणारी होती. त्याच भांडवलावर आम्ही वीस वर्षे जगत आहोत. एक पिढी गेली. नवीन पिढीला हा इतिहास ज्ञात नाही. आम्ही सविस्तर लिखाण केले नाही. उलट विरोधकांनी त्याची भांडवल करून वर्तमानात आम्हाला प्रतिक्रियावादी बनवलेले आहे. परिवर्तनवादी महामानवांच्या जीवन कार्याचे होईल तसे विकृतीकरण, बदनामी व प्रतिमा भंजन हीच एक विकृत क्रिया विरोधकांनी वर्षानुवर्षे अवलंबलेली आहे. तसेच त्यासाठी अधून मधून 'भटकलेले बहुजन वापरले जातात.  परिणामी आपणही अडचणीत सापडतो. यासाठी जास्तीत जास्त वेळा अशा विकृतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हाच योग्य उपाय आहे. अथवा अशी ठोस पाचर मारून कार्यवाही व्हावी की, सहजासहजी पुन्हा कोणीही विकृतीकरण करणार नाही. तसेच अधिकार नसताना कार्यकत्यांनी ऊठसूट मीडियातून वाद बाढवू नयेत. सोशल मीडियामुळे आपण बदनाम होत आहोत. क्रियावादी बना. प्रतिक्रिया देऊन कटकटी वाढवण्याऐवजी उत्तम व साधार इतिहास, चरित्र लिखाण करावे. प्रतिक्रिया द्यायचीच झाली तर सौ सोनार की एक लोहार की अशी असावी.
२९. समाजकारण व राजकारण :
समाजकारण व राजकारण यात भेदाभेद करणे हा अज्ञानाचा कळस आहे. समाजकारण हे शरीर मानले तर राजकारण हे त्या शरीराचे एक प्रमुख अंग आहे. अविभाज्य घटक आहे. मानवी शरीरात जसे पचेंद्रिये असतात. ज्ञानेंद्रिये असतात. तसेच केवळ हेच इंद्रिय म्हणजे शरीर नाही तर ही सर्व शरीर व्यवस्था सदा सर्वकाळ प्रबळ, कार्यरत, सेवार्थ राहावी यासाठी जशा श्वसनसंस्था, पचनसंस्था, पुनर्निर्माण संस्था इत्यादी संस्था असतात त्याच तत्त्वानुसार राजकारण यशस्वी होण्यासाठी कालमानानुसार सामाजिक विकास सर्व क्षेत्रात होणे गरजेचे आहे. याच कारणाने मराठा सेवा संघाने सुरुवातीपासूनच यशासाठी व विकासासाठी वर्तमानातील सत्तेची पंचसूत्री दिलेली आहे ती अशी...
शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता, मीडिया सत्ता. जगातील प्रत्येक विकसित समाज व राष्ट्र आज याच पाच सत्तांवर ताबा ठेवून आहे. ते पदरात पाडून घेण्यासाठी वेगवेगळे विभाग असतात. मराठा सेवा संघाने यासाठी प्राथमिक ३३ वेगवेगळे कक्ष स्थापन केले आहेत.
राजसत्ता म्हणजे केवळ राजकारणच नव्हे तर विधिमंडळ (लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था), न्याय मंडळ, (तहसील न्यायालय, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय येथील न्यायाधीश व वकिल तर तिसरे कार्यकारी मंडळ (सर्वोच्च कॅबिनेट सचिव ते ग्रामपंचायत तलाठी) ही फळी म्हणजे राजसत्ता. भारतात त्रिस्तरीय राज्यशासन व्यवस्था आहे. लोकशाही आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला सत्ताधीश होता येते. आज छत्रपती शिवाजी महाराज आले तरी त्यांना सरळ सरळ गावचे सरपंच, राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे प्रधानमंत्री होता येणार नाही. त्यांना त्याच्या पदासाठी कायद्यानुसार निवडणूक लढवून निवडूनच यावे लागेल. निवडून येऊनच आपले म्हणणे व विचार आपल्याला विधिमंडळात मांडता येतात. लाखो लोकांचे मोर्चे काढून आपण जगजागृती करू शकतो. सरकारचे लक्ष वेधू शकतो. परंतु आपल्या संभाजी ब्रिगेडचा एकच आमदार, एकच खासदार, एकच सरपंच मोठा बदल घडून आणू शकतो. रेखाताई खेडेकर या १९९५ ते २००९ अशी पंधरा वर्षे विधानसभा सदस्य आमदार होत्या. त्यांनी मराठा सेवा संघाचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठे काम केले. हे लक्षात घेतले पाहिजे. याशिवाय अनेक गावात संभाजी ब्रिगेडचे बहुमत होते, सरपंच होते. अशा गावातही परिवर्तनाचे काम करणे शक्य झाले. यासाठीच राजसत्ता ही आपल्या शरीरातील प्रमुख इंद्रियांसारखीच आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी एक करिअर मानून राजकारणात यावे. निवडून येणे हे राजकारणातील मोठे यश आहेत. परंतु राजकीय पक्षाच्या माध्यमातून सतत समाजातील गाऱ्हाणे शासनाच्या दरबारी मांडणे, शांततेचे प्रदर्शन करून मोर्चे काढणे, लेखी निवेदन देणे इत्यादी कामेही राजकारणाचाच भाग आहे. राजकारणापासून दूर राहणे व राजकारणाला वाईट म्हणणे म्हणजे शरीरातील रक्ताची गरज नाकारल्यासारखेच आहे. संभाजी ब्रिगेड सत्तेत येणारच नाही असे मानणे चूक आहे. सध्या भारतातील केंद्रीय स्थानिक व अनेक राज्यात सत्तास्थानी असलेल्या पूर्वाश्रमीच्या जनसंघाची व आताच्या भारतीय जनता पक्षाची अवस्था अगदी ३० वर्षांपूर्वी अशीच होती. राजकीय संघर्ष व यशाकडे वाटचाल ही राजकारणातील एक न टाळता येण्यासारखी पायरी आहे. तसेच ते एक पूर्णकालीन सर्वोच्च व सर्वोत्तम करिअर आहेत. आज राजकारण विकृत झाले आहे. भ्रष्टाचारी झाली आहे. असे म्हणण्याऐवजी समाजच बिघडला आहे असे मानले पाहिजे. राजकारणाला व राजकीय नेत्यांना दोषी धरणारे अनेक शहाणे लोक मतदानापासून दूर राहतात. तर काही मतदार मतदान करण्याचे व न करण्याचेही पैसे घेतात. समाजातील या उणिवा दूर केल्या पाहिजेत. अर्थशास्त्राचे एक सूत्र आहे की, नवे चकचकीत नाणे किंवा चलन बाजारात आले की, जुने चलन हळूहळू आपोआप बाहेर पडते. याच तत्त्वानुसार संभाजी ब्रिगेडने निर्भीड, अभ्यासू, समर्पित तरुण-तरुणींना प्रशिक्षित करून ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत उतरवले पाहिजे. आजच्या मावळ्यांना प्राणार्पणाची आवश्यकता नाही. तरी न हरता व हरता यशस्वी राजकारण करणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांगीण विकासासाठी व अस्तित्वासाठी राजसत्ता पाहिजे. त्यासाठीच सक्रिय राजकारण करणे हाच एकमेव पर्याय आहे.

टिप : कृपया आपण हा लेख शक्यतोवर कुटुंबात एकत्रित बसून सामूहिकपणे वाचावा.
२. काही सूचना असल्यास लेखी कळविणे.
३. आपले वाचन झाल्यावर परिचयातील वा नात्यातील इतरांना द्यावा.
४. मुला-मुलींना, महिलांना वाचायला सांगणे.

लेखक : पुरुषोत्तम खेडेकर
शिवधर्म बंगला, वॉर्ड क्र. ५, शिवाजी नगर, चिखली, जि. बुलढाणा.
मोबा. ९८२३६९३२२७

(मराठा सेवा संघ संचलित...
जिजाऊ रथ यात्रा
भोसले गढी वेरूळ ते लाल महाल (पुणे)
दिनांक १८ मार्च ते १ मे २०२५)




Reactions

Post a Comment

0 Comments