Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरात नवप्रशिक्षित डॉक्टरची आत्महत्या

 सोलापुरात नवप्रशिक्षित डॉक्टरची आत्महत्या


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे वैद्यकीय पदवी शिक्षण पूर्ण करून पुढील वर्षांकरिता इंटर्नशिप करीत असलेल्या एका नवप्रशिक्षित तरुण डॉक्टरने राहत्या घरी स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली.

जुळे सोलापुरातील कल्याण नगराजवळ एका घरात दुपारी हा प्रकार घडला.

आदित्य नांबियार (वय २३, रा. नेरूळ, नवी मुंबई, मूळ राहणार केरळ) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी नवप्रशिक्षित डॉक्टरचे नाव आहे. शहरात दहा दिवसांपूर्वी ज्येष्ठ मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय ७०) यांनी राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्राला धक्का बसला असताना त्यानंतर आज मंगळवारी ही दुसरी घटना घडली.

आदित्य नांबियार यांचे वडील भारतीय नौसेना दलात व्यावसायिक सागरी सेवेत अधिकारीपदावर सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. त्यास एक विवाहित बहीण असून ती बंगळुरूमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात सेवेत आहेत. तर आई गृहिणी आहे. नांबियार कुटुंबीय नवी मुंबईत नेरूळ येथे राहतात. आदित्य याने सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस वैद्यकीय पदवी शिक्षण नुकतेच पूर्ण केले होते. त्यानंतर पुढील वर्षांकरिता व्यावसायिक अनुभव घेण्यासाठी तो याच वैद्यकीय महाविद्यालयात आंतरवासिता (इंटर्नशिप) म्हणून सेवेत होता. त्याने दुपारी जुळे सोलापुरातील खासगी निवासस्थानी स्वच्छतागृहात स्वतःचा गळा चाकूने कापून घेतला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील त्याच्या सहकारी विद्यार्थी मित्रांसह डॉक्टर, प्राध्यापक मंडळींना धक्का बसला.

महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. नरेश झांजड यांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य नांबियार हा अभ्यासात हुशार होता. त्याने वैद्यकीय पदवी शिक्षण गुणवत्तेने पूर्ण केले होते. त्याने महाविद्यालयीन जीवनातील अडचणी किंवा आपल्या खासगी बाबींसह कोणत्याही प्रकारची एकदाही तक्रार केली नव्हती. त्याची मानसिकता उत्तम होती. परंतु त्याने अचानकपणे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, हे समजू शकले नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचे आई-वडीलही दाखल झाले. आदित्य याच्या मृतदेहाजवळ चाकू सापडला. त्याने केलेल्या आत्महत्येचे कारण लगेचच समजू शकले नाही.
Reactions

Post a Comment

0 Comments