पंढरपूर तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोधाचा सूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 26, 2025

पंढरपूर तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोधाचा सूर

 पंढरपूर तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोधाचा सूर


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पवनार ते पत्रादेवी (नागपूर गोवा) या बहुचर्चित शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला दिवसेंदिवस बाधित शेतकऱ्यांचा विरोध वाढू लागला आहे. मर्यादित प्रवेश आणि बंदिस्त स्वरूपाच्या या महामार्गाचा स्थानिकांना फायदा तसेच कवडीमोल मोबदला या अनुषंगाने गावोगावी बाधित शेतकऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरु असून त्याद्वारे प्रबोधन केले जात आहे. त्यातूनच भू-संपादनासाठी संयुक्त मोजणी होऊ देण्यास शेतकरी राजी होतील की नाही ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


नागपूर ते गोवा हे अंतर कमी वेळात पार करता यावे, राज्यातील महत्त्वाची शक्तीपीठे जोडली जावीत, दळणवळण वाढून त्या त्या भागाच्या प्रगतीला गती यावी असे हेतू ठेवून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्ग निर्मितीचा घाट राज्य सरकारने घातला आहे. मात्र, या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी जमिनींचे भूसंपादन करावे लागणार असून त्यातही बागायती पट्ट्यातील जमिनींचे क्षेत्र मोठे आहे. ग्रीन कॉरिडॉर स्वरूपाचा हा महामार्ग प्रस्तावित असल्याने त्यापोटी बाधितांना मिळणारा मोबदला अतिशय अत्यल्प असणार हे स्पष्ट आहे. याअगोदर सुरत चेन्नई हा महामार्ग अशा प्रकारे हाती घेण्यात आलेला असून त्यासाठी बाघितांना मिळालेला अत्यल्प मोबदला आता या महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर येत आहे. त्यामुळे सुरुवातीला समृद्धी महामार्गाप्रमाणे मोबदला मिळण्याच्या अपेक्षा ठेवलेल्या शेतकऱ्यांना मनस्ताप करावा लागतो की काय? असे चित्र दिसत आहे.


एकतर शक्तिपीठ महामार्ग साधारण बंदिस्त स्वरूपाचा असून त्याचा स्थानिकांना उद्योग, व्यवसायांसाठी कसलाही फायदा होणार नाही, तर दुसरीकडे अतिशय सुपीक बारमाही बागायती जमिनी देऊन त्यापोटी नगण्य मोबदला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जेवढे क्षेत्र संपादित होईल तेवढेही क्षेत्र त्यापोटी मिळणाऱ्या मोबदल्यातून विकत घेणे शक्य होणार नाही, असे अनेक मुद्दे आता चर्चेला येत आहेत.


शक्तीपीठ बाधित शेतकरी संघर्ष समिती तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप पदाधिकारी यांच्यासह स्थानिक जागरूक शेतकरी सध्या गावोगावी फिरून बाधित शेतकऱ्यांच्या बैठका घेत आहेत. या महामार्गाचे फायदे तोटे समजून सांगत आहेत. प्रबोधन होत असल्याने बाधित शेतकऱ्यांमधून महामार्गाला विरोधाचा सूर वाढत चालला आहे.


गेल्या चार पाच दिवसात पंढरपूर तालुक्यातील पुळूज, आंबे, रांझणी, अनवली आदी गावांमध्ये बाधित शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये विविध भागातील संघर्ष समितीचे पदाधिकारी, जागरूक शेतकरी यांनी मार्गदर्शन केले. शासनाने अगोदर बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी समजून त्यावर ठोस धोरण तसेच निश्चितपणे भूसंपादनापोटी किती मोबदला दिला जाणार आहे. याविषयीचे धोरण जाहीर करावे. त्यानंतरच संयुक्त मोजणी व इतर प्रक्रिया पार पडाव्यात, अशी भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आली. त्यास बाधितांनी ठाम प्रतिसाद देत महामार्गाला विरोधाचा सूर लावला.


चौकट 

पंढरपूर तालुक्यातील ११ गावे बाधित

शक्तीपीठ महामार्ग पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागातील बागायती पट्ट्यातून पुढे सांगोला तालुक्यात जात आहे. यामध्ये पुळुज, फुलचिंचोली, विटे, पोहरगाव, खरसोळी, आंबे, रांझणी, अनवली, कासेगाव, शेटफळ, खड़ीं अशा ११ गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बाधित होत. विशेषतः ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष या पिकांखालील क्षेत्र या भागात सर्वाधिक आहे. बागायती, सुपीक जमिनी कवडीमोल दराने या महामार्गासाठी द्यायच्या? हा मुद्दा सध्या कळीचा ठरत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages