सर्व चळवळीमध्ये समन्वय ठेवण्याची मराठा सेवा संघाची भूमिका
अकलूज : (कटुसत्य वृत्त):- समन्वयाच्या अभावामुळे चळवळीमध्ये फूट पाडण्याचे काम केले जाते. परिवर्तनाची ताकद ही संघटित ताकद आहे. सर्वच बहुजन चळवळींनी एकत्र येण्याची गरज आहे. या सर्व चळवळींमध्ये समन्वय ठेवण्याची मराठा सेवा संघाची भूमिका असल्याचे मत चंद्रपूरचे डॉ. दिलीप चौधरी यांनी व्यक्त केले.
स्मृतीभवन शंकरनगर अकलूज येथे मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित केलेल्या महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात बहुजन चळवळींचा समन्वय, आवश्यकता आणि कृती कार्यक्रम या विषयावर ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अमरावतीचे अरविंद गावंडे, मौलाना आझाद वि.म प्रदेश उपाध्यक्ष हसीब नदाफ, जो. शा. बा. संघटना अध्यक्ष युवराज पवार, बुद्धिस्ट जिल्हाध्यक्ष तुकाराम बनसोडे यांनीही या चर्चासत्रात सहभाग घेतला.
यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय घोगरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, अर्जुन तनपुरे, राज्य उपाध्यक्ष अरविंद गवंडे, मधुकर मेहकरे, प्रा. आरती पवार यांच्यासह राज्यातून आलेले सेवा संघाचे पदाधिकारी, प्रमुख, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना दिलीप चौधरी म्हणाले की, जाती जातीत फूट पाडण्यासाठी शेजारील राष्ट्राने हल्ले केले. परंतु, आपला देश एकसंघ राहिला, हे सर्वांचे यश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून महात्मा गांधींपर्यंत सर्वांनीच बहुजनांना एकत्र करून चळवळी उभारल्या व त्यात यश प्राप्त केल्याचे दिसते. चळवळी केवळ भावनिक होऊन नव्हे तर व्यवहारिक पद्धतीने चालवल्या पाहिजेत. तुमचे आमचे ध्येय हे मानवी उन्नतीसाठी असेल तर यामध्ये समन्वय ठेवणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान व संसाधने हे कधीच समाजाच्या विनाशासाठी नसतात. परंतु त्याचा वापर योग्य ठिकाणी व योग्य गोष्टीसाठी झाला पाहिजे. आजही बहुजनांना संघर्ष का करावा लागतो, यावर विचारमंथन व्हायला पाहिजे, असेही दिलीप चौधरी म्हणाले.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी असणारे नागपूरचे डॉ. नंदकुमार राऊत म्हणाले, आपल्या तरुणांनी देशाबरोबर परदेशात ही कार्यरत राहावे. भगवानराव वाघोले यांनी आपला कार्य व शेतीतील संधी स्पष्ट केली. यावेळी प्रदीप एकतपुरे उपस्थित होते.
इतिहासाचार्य मा. म. देशमुख बहुजन इतिहास व प्रबोधनाचे अध्वर्यू या विषयावर प्रा. प्रेमकुमार बोके यांनी विचार व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी मधुकरराव मेहकरे होते. प्रा. विद्या पंडित, कॉ. शरद पाटील यांची इतिहास मीमांसा आणि मार्क्स, फुले, आंबेडकरवाद या विषयावर प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे व कॉ. किशोर ढमाले यांनी मनोगत व्यक्त केले.
सकाळच्या सत्रात सूर्योदयाच्या कविता या कवी संमेलनात मनीषा पाटील हेरोलीकर, कवी संमेलनाचे उद्घाटक डॉ सतीश तराळ, डॉ. सतीश होनगावे जालना, लक्ष्मण हेंबाडे पंढरपूर, मनीषा पाटील, रायजादे सांगली, दिनेश भिसे, परभणी, बालाजी जाधव लातूर, तानाजीराजे जाधव, शाहीर पाटील सांगली, दुर्गा देशमुख परभणी, राजेश महल्ले अमरावती, सुभाष पांचाळ,रवींद्र कदम परभणी, गोरखनाथ भागपाडे, कमलाकर दुबे, राजवर्धन कदम आदींनी सहभाग नोंदवला.
चौकट १
संधीचे सोने करण्याचे आवाहन
आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि मराठा सेवा संघ या विषयावर संघाचे संस्थापक सचिव निर्मलकुमार देशमुख यांनी परदेशात असणाऱ्या विविध विभागातील संधीचे विश्लेषण केले. शेती, औद्योगीकरण, पर्यटन, आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये कोणत्या देशात कशी संधी उपलब्ध आहे, याचे स्पष्टीकरण केले. तरुणांनी अभ्यास करून या संधीचे सोने करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
0 Comments