महापालिका कामगार संघटना कृती समितीचे कामगार दिनी धरणे आंदोलन
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- महापालिकेत गेल्या ३० वर्षापासून सेवा बजावणाऱ्या रोजंदारी आणि बदली अशा २४९ कामगार कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी आकृतीबंध मंजूर करावा, यासाठी सोलापूर महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने १ मे कामगार दिनी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी दिली.
महापालिकेतील २४९ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रशासक या नात्याने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी २४९ नवीन जागा निर्माण करण्यासाठी आकृतीबंध मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवावा. हा अधिकार फक्त आयुक्तांना आहे. त्या अधिकाराचा आयुक्तांनी वापर करावा. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सन १९९२ मध्ये हद्दवाढ होऊन शहराचे क्षेत्रफळ सहापटीने वाढले आहे. त्यात ११ गावांचा समावेश झाला. त्यामुळे कामगारांची संख्या अपुरी वाटत होती. नागरिकांची गैरसोय होऊ लागल्याने नवीन रोजंदारी कामगारांची महापालिकेला भरती करता येत नव्हती. त्याचे कारण पुढे करत महापालिकेने नवीन रोजंदारी कामगारांची भरती यापुढे करणार नाही, असे राज्य शासनाला लेखी प्रतिज्ञापत्राद्वारे ६ एप्रिल १९९५ रोजी दिले होते. सेवा सुविधा मिळत नसल्याने जनक्षोभ वाढलेला होता. तो कमी करण्यासाठी २४९ कामगारांना रोजंदारीवर नेमणुका देण्याचे काम कनिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. तर काही कामगारांच्या नेमणुका या तत्कालीन आयुक्तांनी केलेल्या आहेत. त्यांच्या नेमणुका बेकायदेशीर आहेत. असे राज्य शासनाचा नगर विकास विभाग म्हणत आहे. या रोजंदारी कामगारांना गेली तीस वर्षे महापालिकेच्या सक्षम मान्यतेने त्यांचा पगार देण्यात आला आहे. मंत्रालयात बसलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरील अडचणी माहिती नाहीत, यामुळे आयुक्तांनी या कामगारांना कायम करण्यासाठी तातडीने आकृतीबंध तयार करून शासनाकडे पाठवावा असेही प्रशासनाला कळविण्यात आल्याचे कामगार नेते अशोक जानव यांनी सांगितले.
ReplyForward |
0 Comments