विद्यार्थी ७० हजार अन् भरारी पथके तीन
सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्राची परीक्षा ३० एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ७० हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. मात्र त्या विद्यार्थ्यांवर फक्त तीन भरारी पथकांची नजर राहणार आहे. त्यामुळे आणखी भरारी पथकांची संख्या वाढण्याची गरज आहे.
विद्यापीठाची अंतिम सत्राची परीक्षा ११० केंद्रांवर होणार आहे. त्यासाठी केवळ तीनच भरारी पथके नेमण्यात आल्याने त्या भरारी पथकांवर कामांचा ताण पडणार आहे. तसेच त्या पथकांकडून सर्वच परीक्षा केंद्रावर तपासणी करणे शक्य होणार नसल्याने आणखी भरारी पथकांची नेमणूक करण्याची गरज आहे. मात्र, याकडे विद्यापीठ परीक्षा विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे परीक्षेत अनेक गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्रत्येक २० परीक्षा केंद्रामागे एक असे एकूण पाच ते सहा भरारी पथके नेमण्याची मागणी गुणवंत विद्यार्थ्यांतून होत आहे.
चौकट १
परीक्षा पारदर्शक होण्यास होणार मदत विद्यापीठाच्या परीक्षेसाठी भरारी पथकांची संख्या वाढल्यास परीक्षा पारदर्शकता होणार आहे. त्यामुळे परीक्षा विभागाने तातडीने निर्णय घेऊन आणखी दोन ते तीन भरारी पथकांची संख्या वाढविण्याची मागणी गुणवंत विद्यार्थ्यांतून होत आहे.
चौकट २
एक महिना चालणार परीक्षा
अंतिम सत्र परीक्षा ३० एप्रिलपासून पदवीधर अभ्यासक्रमाच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. तसेच सहा मेपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. या अंतिम सत्र परीक्षेचा कालावधी एक महिना असणार आहे.
0 Comments