झेडपीसह अनुदानित शाळांमधील ७०००० शिक्षकांची पदे घटली
पवित्र पोर्टलवर अवघ्या ११००० पदांच्याच जाहिराती, त्यात झेडपीचे अन् 'खासगी'चे शिक्षक किती?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी झाल्याने १५ वर्षांत राज्यातील २२ हजार खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील तब्बल ५२ हजार शिक्षक-शिक्षकेतरची पदे कमी झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या ६२ हजार शाळांमधील देखील अंदाजे १८ हजार शिक्षकांची पदे कमी झाली आहेत.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या ६२ हजार शाळांमध्ये सध्या एक कोटी ७० लाखांपर्यंत विद्यार्थी प्रवेशित आहेत. दुसरीकडे खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या २२ हजारापर्यंत आहे. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वाढला असून दरवर्षी राज्यात सुमारे २०० खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची भर पडत आहे. महागाईमुळे खर्च पेलवत नाही व अन्य कारणांमुळे जन्मदरातही घट झाली आहे. दुसरीकडे तरुण-तरुणींच्या विवाहाचे वय देखील वाढत असून सरासरी ३० च्या वयोगटात विवाह होत आहेत. एकुलता एक मुलगा चांगला शिकावा म्हणून पालक मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांऐवजी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच त्याचा प्रवेश घेत आहेत. त्यामुळे आता १० ते २० पर्यंत पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळांची संख्या सहा हजारांवर गेली आहे. त्यामुळे अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांची मंजूर पदे कमी होत असल्याचे निरीक्षण शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पवित्र पोर्टलवरून जी शिक्षक भरती सुरू आहे, त्यात चार हजार शिक्षक जिल्हा परिषदांच्या शाळांमधील तर सुमारे साडेसहा हजार पदे खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची आहेत.
शिक्षक कमी होण्याची प्रमुख कारणे...
.'हम दो हमारा एक'मुळे घटला राज्याचा जन्मदर
.उच्चशिक्षण, नोकरीच्या शोधात वाढले विवाहाचे वय
.इंग्रजी माध्यमाच्या खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांची वाढली संख्या
.शहर-ग्रामीणमधील पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढला
.१५ दिवसांत २०२४-२५ मधील संचमान्यता पूर्ण होईल
मागील १५ वर्षांपूर्वी खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची २ लाख ८२ हजार पदे मंजूर होती. सध्या ही पदे २.३० लाखांपर्यंत आहेत. घटलेली पटसंख्या हे त्याचे मूळ कारण आहे. संचमान्यतेच्या नव्या शासन निर्णयानुसार २०२४-२५च्या वर्षातील संचमान्यता १०-१५ दिवसांत होईल, त्यात नेमकी किती शिक्षक अतिरिक्त होतील हे स्पष्ट होईल.
खासगी अनुदानित शाळांची सद्य:स्थिती:-एकूण शाळा-२२,०००;एकूण पदे मंजूर-२.८२ लाख;सध्या कार्यरत पदे-२.३० लाख;१५ वर्षांत कमी झालेली पदे ५२,०००.
0 Comments