सोलापूर जिल्ह्यात १४८ हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने आंब्यासह केळी, द्राक्ष अन् खरबुजाचे मोठे नुकसान झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून १४० गावातील १४८ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्रथमदर्शनी अहवाल तयार झाला असून, यामध्ये बार्शी, करमाळा आणि सांगोला तालुक्याचा समावेश आहे. या नुकसानीचा नजर अंदाज अहवाल जिल्हा प्रशासनाकडे कृषी विभागाने सादर केला आहे.
गेल्या २ दिवसांपूर्वी कडाक्याच्या उन्हानंतर सायंकाळी जोराचे वारे वाहू लागले. यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने केशर आणि इतर जातीच्या आंब्यांचे मोठे नुकसान झाले.
आंबा बागांतून अक्षरशः कैऱ्यांचा सडा पडला होता. इतकेच नाहीतर केळी, द्राक्ष, खरबूज आदी पिकांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, तलाठी बांधावर जावून पंचनामे करीत असून, यामध्ये इतरही काही गावांचा समावेश होणार आहे. जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातीलही काही गावांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे.
तीन तालुक्यांना सर्वाधिक फटका
बार्शी तालुक्यातील ८५.३९ हेक्टरवरील विविध बागांसह फळपिके आणि भाजीपाल्याचेही हानी झाली आहे.
करमाळा तालुक्यातील ७ गावे बाधीत झाली असून, ६३ हेक्टरवरील केळी, आंबा, द्राक्ष, खरबूज पिकांना फटका बसला आहे.
सांगोला तालुक्यातील एका गावच्या आंबा बागेला फटका बसला
0 Comments