सोलापूरात पक्ष्यांसाठी शनिवारी वाटली जाणार १ हजार जलपात्रे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 4, 2025

सोलापूरात पक्ष्यांसाठी शनिवारी वाटली जाणार १ हजार जलपात्रे

 सोलापूरात पक्ष्यांसाठी शनिवारी वाटली जाणार १ हजार जलपात्रे





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरात पक्ष्यांसाठी शनिवार दि. 5 एप्रिल रोजी चार हुतात्मा पुतळा चौक येथे सकाळी 7 वाजल्यापासून पक्षांना पाणी ठेवण्यासाठी शहरवासीयांना एक हजार जलपात्र मोफत वाटली जाणार आहेत. सोलापुरातील लिटल फ्लावर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या १९८८ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी अनोखा असा हा पक्ष्यांसाठी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे,अशी माहिती जितेंद्र व्होरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
        अहमदाबाद मधील अंकुर इंडस्ट्रीज च्या पुढाकाराने सोलापूरकरांना ही पक्षांसाठी मातीची भांडी दिली जाणार आहेत. शनिवारी सकाळी सात वाजता या उपक्रमाचा शुभारंभ सोलापुरातील लोकप्रतिनिधी, तसेच विविध शासकीय अधिकारी आणि उद्योजक यांच्या हस्ते केला जाणार आहे. आ. विजयकुमार देशमुख, आ. देवेंद्र कोठे, आ. सुभाष देशमुख, खासदार प्रणिती शिंदे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनाही कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत निमंत्रण देण्यात आले आहे.
        सोलापूर जिल्ह्यात महाकाय असे उजनी धरण आहे. या ठिकाणी हजारो पक्षी शेकडो मैल प्रवास करून येतात. सोलापूर शहरातील हिप्परगा तलाव, छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव तसेच होटगी तलाव या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी आढळतात. सोलापूरच्या आजूबाजूचे वातावरण पक्षांसाठी पोषक असल्यामुळे पक्षांचे सोलापूर हे माहेरघर आहे.
        सोलापूरचे तापमान उन्हाळ्यामध्ये सरासरी ४० अंशाच्या वरच राहते. त्यामुळे पक्षांना पाणी शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते म्हणून पक्षांसाठी सर्वांनी पाणी ठेवावे म्हणून खास अहमदाबाद मध्ये बनवलेली ही मातीची भांडी शहरवासीयांना दिली जाणार आहेत. एकूण ५ हजार जलपात्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शनिवारी यातील एक हजार जलपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
          शहरवासीयांनी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून चार पुतळ्याजवळ येऊन पक्षांसाठीची ही जलपात्रे घेऊन जावीत. तसेच या भांड्यामध्ये पाणी पितानाचे पक्षांचे फोटो आम्हाला पाठवावेत त्यातील उत्कृष्ट अशा तीन छायाचित्रांना आम्ही बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे जितेंद्र व्होरा यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस द्वारका उपलप, रमेश रापेल्ली हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages