डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या जाण्याने गरीब रुग्णांचा आधार गेला
सोलापूर / (कटुसत्य वृत्त):- सोलापुरातील प्रसिध्द न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर हे सर्वसामान्य रुग्णांच्या दृष्टीने मोठा आधार होते. एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसले तरी पैशाची चिंता करु नका. तुम्ही फक्त उपचार घ्या आणि बरे व्हा, असा आपुलकीचा सल्ला देऊन रुग्णांचा आत्मविश्वास वाढवत होते. त्यांच्या जाण्याने गरीब रुग्णांचा आधार गेला, अशा भावना सोमवारी आयोजित केलेल्या शोकसभेत व्यक्त करण्यात आला.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या शोकसभेस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किरण सारडा, माजी अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. सतीश वळसंगकर, डॉ. नितीन ढेपे यांच्यासह वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ.संजय देशपांडे म्हणाले, १९८६ मध्ये आम्ही इंग्लंडमध्ये होतो. त्यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापुरात प्रॅक्टिस कधी सुरु करणार ? असे मला विचारले होते. वाडिया हॉस्पीटलमध्ये त्यांनी खूप कष्ट केले. डॉ. अजित कुलकर्णी म्हणाले, गोरगरीब रुग्णांना सर्वात मोठ्या आणि चांगल्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी डॉ. शिरीष वळसंगकर यांचे प्राधान्य होते. त्यांच्यात मोठी जिद्द होती. त्यांनी स्थापन केलेल्या हॉस्पिटलमुळे रामवाडी परिसरात मोठे बदल झाले.
डॉ. किरण सारडा म्हणाल्या, डॉ. शिरीष वळसंगकर हे समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून राहायचे. ते नेहमी इतरांना जवळचे वाटायचे. त्यांनी वेगवेगळे छंद जोपासले. ते वैमानिक होते. डॉ. सुदीप सारडा म्हणाले, डॉ. वळसंकर हे नेहमी मोठे काम करण्याची ऊर्जा बाळगायचे. त्यांच्या जाण्याने इंडियन मेडिकल असोसिएशनचे मोठे नुकसान झाले आहे.
डॉ. नितीन ढेपे म्हणाले, आज मी जो काही उभा आहे, ते केवळ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्यामुळेच. आम्ही त्यांना मास्तर म्हणायचो. इतरांपेक्षा मोठी स्वप्ने बघण्याचा सल्ला ते नेहमी द्यायचे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मोठी उडी मारायला हवी, असे ते नेहमी सांगायचे. मला ते प्रेरणास्थान होते. त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले. माझ्या हिमतीचा मोठा आधार ते होते.
0 Comments