त्रुटी आढळलेल्या ८० हॉस्पिटलला नोटिसा
सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- सोलापुरातील मोठमोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरातील ४३४ हॉस्पिटलची तपासणी केली. त्यापैकी ८० हॉस्पिटलमध्ये किरकोळ स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या प्रकरणाचा तपासणी अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे त्या सर्व हॉस्पिटलला नोटिसा बजावत पुन्हा तपासणी केली आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठक घेऊन राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार यांनी एक परिपत्रक काढून महाराष्ट्र नर्सिंग होम अभियानांतर्गत नोंदणी हॉस्पिटलची तपासणी करण्याचे आदेश सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील ४६० हॉस्पिटलची यादी तयार करून तपासणीसाठी नऊ पथकांची नियुक्ती केली होती. एक मेडिकल ऑफिसर, एक सहाय्यक अशा दोन अधिकाऱ्यांनी एक जानेवारीपासून ३१ जानेवारीपर्यंत ४३४ हॉस्पिटलची तपासणी केली. या तपासणीमध्ये पेशंटसाठी तक्रार वही नसणे, डॉक्टरांची वेळ स्पष्ट अक्षरात न लिहिणे, डॉक्टरांचे नाव नसणे, जवळपासच्या पोलीस स्टेशनचे नंबर, अँब्युलन्स, फायर ब्रिगेड त्यांचे नंबर ठळक अक्षरात नसणे, डॉक्टरांची डिग्री नसणे यासह अनेक त्रुटी ८० हॉस्पिटलमध्ये आढळून आल्या होत्या. या हॉस्पिटलचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता. आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला होता. दिलेल्या नोटिशीची मुदत संपतात त्याच टीमने पुन्हा या ८० हॉस्पिटलची पुन्हा तपासणी केली.
चौकट १
त्रुटींची केली पूर्तता
या तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीची पूर्तता झाल्याचे तपासणी पथकास निदर्शनास आले. याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. राज्य शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
0 Comments