अक्कलकोटच्या धर्तीवर गोव्यात स्वामी समर्थ मंदिर
अक्कलकोट : (कटुसत्य वृत्त):- येथील मंदिराच्या धर्तीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यामध्ये साखळी तालुक्यातील फणसवाडी नाव्हेली येथे २ कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य श्री स्वामी समर्थांचे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात रविवारी श्री स्वामी समर्थांच जयजयकार करत श्री स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सकाळी गाणगापूर देवस्थानचे महंत श्री श्री वल्लभानंद सरस्वती यांच्या हस्ते शांतीपाठ, मंगलाचरण, मधुपर्कपूजन करण्यात आले. दुपारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते कळसा सोहळा पार पडला. तत्पूर्वी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दिवसभर आरती, अखंड महाप्रसाद, सुवासिनी महिलांतर्फे सायंकाळी दिपोत्सव आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर सायंकाळी पुन्हा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत पदाधिकारी सन्मान सोहळा पार पडला. रात्री ८ वाजता श्री स्वामी समर्थांच्या जीवन चरित्रावर आधारित राजन शंकर कोठारकर लिखित अनंतकोटी हे नाटक प्रयोग सादर करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना स्वामी भक्तांचा मोठ प्रतिसाद मिळाला. यावेळी खास अक्कलकोटवरून आल्यामुळे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचा गोवेकरांच्यावतीने मोठा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या अक्कलकोट मधून चाललेल्या धार्मीक कार्याचे मोठे कौतुक केले.
यावेळी अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शाम मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, जेष्ठ विधिज्ञ नितीन हबीब, अॅड. पी.जी लोंढे - पाटील, गिरीश कोल्हापूरे, लाला राठोड, संतोष भोसले, प्रशांत कवडे, मधु गुरव, शिवराज स्वामी, प्रशांत साठे, महंतेश स्वामी, सरफराज शेख, पत्रकार मारुती बावडे, प्रशांत भगरे, रमेश राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पणजी, साखळी, फोंडा, मडगाव, डिचोली आणि परिसरातील भाविक उपस्थित होते. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
चौकट १
जोधपूरी दगडातून संपूर्ण मंदिर
हे मंदिर पूर्णपणे जोधपुरी दगडातून बांधण्यात आले आहे. लोक सहभागातून बांधण्यात आलेल्या या मंदिराला अंदाजे २ कोटी रुपये खर्च आला आहे. भव्य दिव्य मंदिर उभारले गेल्याने गोव्यातील स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केले. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनखाली ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास काणसेकर, सचिव सचिन आपटे, उदय जोशी, धनाजी घोगरे, रोहन कवळेकर व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
0 Comments