भेसळ दुधाविरुद्ध मोहीम तीव्र : १६ जणांचे पथक
अन्न व औषध प्रशासनाने विविध ठिकाणातून दुधाचे घेतले २२ नमुने
सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- शहर आणि जिल्ह्यात भेसळ दूध माफिया सक्रिय झाले आहेत. या माफियांकडून भेसळयुक्त दुधाची राजरोसपणे विक्री सुरू झाली आहे. अशा भेसळयुक्त दुधाच्या विक्रीच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत विविध ठिकाणचे २२ दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करत त्याची शहरात विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील दूध आणणारे शेतकऱ्यांकडून दुधाची भेसळ होणे शक्य नाही. शेतकऱ्यांकडून दूध विकत घेऊन त्यात रासायनिक घटक मिसळून भेसळयुक्त दूध तयार केले जाते. ते पाकीटबंदही करण्यात येते. त्या पाकिटावर उत्पादकाचे नाव किंवा दुधातील घटकाची नोंदही नसते. अशाच दुधाची सर्वत्र विक्रीही बिनबोभाट सुरू आहे. ती रोखण्याची मागणी नागरिकांमधून केली जात होती.
भेसळ दुधाच्या विरोधातील कारवाईची मोहीम अन्न व औषध प्रशासनाने तीव्र केली आहे. सध्या जिल्ह्यात १६ अधिकाऱ्यांचे पथक या विरोधात काम करत आहेत. या पथकाकडून दूध संकलन केंद्र, विक्री केंद्र आणि वाहतूक करणारे अशा विविध ठिकाणावरून २२ दुधाचे नमुने घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल काय येईल, त्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. दुधातील भेसळ माफियांवर जरब बसण्यासाठी दंडात्मक कारवाईची गरज आहे.
चौकट 1
दूध संकलन केंद्रासह अन्य ठिकाणचे २२ दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. दुधाचा दर्जा आणि त्यात झालेल्या भेसळसह अन्य घटकाच्या तपासण्यासाठी ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यास त्यानुसार कारवाई करण्यात येईल.
- सुनील जिंतुरकर,
सहाय्यक आयुक्त, अन्न औषध प्रशासन
0 Comments