Hot Posts

6/recent/ticker-posts

शहर प्रारूप विकास आराखड्याच्या हरकतींवर पेठनिहाय सुनावणी सुरू

 शहर प्रारूप विकास आराखड्याच्या हरकतींवर पेठनिहाय सुनावणी सुरू



सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- शहर प्रारूप विकास आराखड्यावर महापालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारी, सूचना, हरकतींवर चार सदस्यांच्या समितीकडून मंगळवारपासून सुनावणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी दहिटणे, शेळगी, टीपी १, रविवार पेठ या भागातील एकूण ३१५ पैकी २३६ हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात आली.

सोलापूर शहर विकास आराखडयात शहरातील विविध भागातील ९२१ जागांवर आरक्षण टाकण्यात आले आहे. पुढील २० वर्षांसाठीच्या शहर प्रारूप विकास आराखड्यावर महापालिकेकडे प्राप्त झालेल्या ३३७५ तक्रारी सूचना, हरकती यावर चार सदस्यांच्या समितीकडून १५ एप्रिल ते २३ मे पर्यंत करण्यात येणार आहे. अंतिम निर्णय मे अखेर होऊन जूनमध्ये शासनाच्या मंजुरीनंतर शहर विकास आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.

आज पहिल्याच दिवशी दहिटणे, शेळगी, टीपी- १, रविवार पेठ या भागातील हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात आली. एकूण ३१५ पैकी २३६ अर्जावर सुनावणी झाली. संबंधिताचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. नगररचना विभागाचे उपसंचालक मनीष मिष्णुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेटके नियोजन करण्यात आले होते.

बुधवार १६ एप्रिल रोजी देगाव, केगाव, वाळे, शिवाजीनगर, बसवेश्वर नगर, १७ एप्रिल रोजी सोरेगाव प्रतापनगर, नेहरूनगर कुमठे, सलगरवाडी, रामवाडी, २८ एप्रिल रोजी न्यू पाच्छापेठ, तेलंगी पाच्छापेठ, साखरपेठ, जोडभावी पेठ, गुरुवार पेठ, बेगम पेठ, मुस्लीम पाच्छापेठ, गणेश पेठ, मंगळवार पेठ, २९ एप्रिल रोजी रेल्वे लाईन्स, उत्तर सदर बझार, दक्षिण सदर बझार, सिव्हिल लाईन्स, मोदी, ३० एप्रिल रोजी टीपी ४, लक्ष्मी पेठ, मुरारजी पेठ, सिद्धेश्वर पेठ, टीपी २, २० मे रोजी शनिवार पेठ, दक्षिण कसबा, बुधवार पेठ,
गोल्डफिंच पेठ, गावठाण, शुक्रवार पेठ, भवानी पेठ, विजापूर रोड, २१ मे रोजी मजरेवाडी, २२ मे रोजी करावे सोलापूर आणि २३ मे रोजी राहिलेले इतर सर्व पेठ आणि भागांच्या सुनावण्या घेण्यात येणार आहे.

या नियोजनाप्रमाणे त्या त्या विभाग आणि पेठनिहाय परिसरातील तक्रारदार हरकतदार आणि दावेदार यांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. सुनावणी संबंधित नागरिकांनी त्यांच्या सूचना व हरकतीबाबत आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. हरकती आणि दाव्यांवरील सुनावणी घेऊन निर्णय देण्यासाठीच्या प्रक्रियेला तब्बल दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे.

महापालिकेने २६ डिसेंबर २०२४ रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला होता. नागरिकांच्या सूचना व हरकतींसाठी २ ते ८ जानेवारी २०२५ ही | मुदत देण्यात आली होती. नगररचना विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक संजय सावजी, सेवानिवृत्त उपसंचालक दत्तात्रय पवार, सेवानिवृत्त सहायक संचालक
अनिलकुमार पाटील आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्रीकांत जहागीरदार या चौघांची समिती सुनावणी घेत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments