'आदिनाथ'च्या निवडणूकीत दीग्गजांची प्रतिष्ठा पणाला
करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्याच्या राजकारणात आदीनाथ कारखान्याला अनन्यसाधारण महत्व आहे.कारखान्याला लाभलेले मोठे कार्यक्षेत्र,सभासदांची मोठी संख्या यामुळे एकेकाळी तालुक्याचे अर्थकारण आदीनाथ कारखान्याच्या माध्यमातून चालायचे.मात्र काळाची दृष्टी उलटी फीरली आणी आदीनाथला वाईट दीवस आले.त्यामुळेच तब्बल २६४ कोटी रुपये कर्जाचा डोंगर असलेला बहुचर्चित आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे. आदिनाथ कारखान्यावर बहुतांश वेळा हुकूमी सत्ता गाजवलेला स्व, दिगंबरराव बागल यांच्या गटाबरोबरच माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या दोन्ही मोठ्या गटाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे.त्यामुळे आता नारायण पाटील ,प्रा.नवनाथ झोळ,माजी आमदार संजय शींदे अशा दीग्गजांमध्ये आदीनाथचा रणसंग्राम होत आहे.आदिनाथ कारखाना निवडणुकीत तब्बल २९ हजारहून अधिक मतदार आहेत. आतापर्यंत सातत्याने बागल गटाने अनेक वेळा आदिनाथची सत्ता भोगली आहे. आजही त्यांचे प्राबल्य येथे आहे. याबरोबरच विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा गटही आदिनाथ कारखान्यामध्ये मजबूत आहे. आदिनाथ कारखाना सभासद यांचीही ताकद पाटील गटाकडे मोठी आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांचाही गट सक्रिय आहे. त्यांचेही सभासद मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी ते आमदार नारायण पाटील गटासोबत आहेत. त्यामुळे बागल गटाच्याच निर्णायक भूमिकेवर आदिनाथच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.
माजी आमदार संजय शिंदे हे आता गट एकत्र ठेवण्यासाठी आदिनाथ कारखाना निवडणूक लढवत आहेत. याबरोबरच विधानसभा निवडणुकीत तसेच श्री मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आपला सहभाग नोंदवणारे दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा. रामदास झोळ यांच्याही गटाने पुन्हा आदिनाथ कारखाना निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न चालवला आहे. तर आदिनाथ कारखाना बारामती अॅग्रो साखर कारखान्याने ताब्यात घेऊ नये म्हणून पूर्ण ताकतीने त्यांचा ताबा पलटून लावणारे विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा गट आदिनाथ कारखाना पुन्हा गत वैभवाने उभे राहावा, यासाठी निवडणुकीत उभा ठाकला आहे. कारखान्याच्या निवडणूकीच्या माध्यमातून नेत्यांची शक्तीपरीक्षा होत आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजय शिंदे यांनी महायुती म्हणून तर नारायण पाटील गट तट एकत्र करून निवडणूक लढत आहेत. स्थानिक पातळीवर ही लढाई गटातटावरच लढवली जात असली तरी विधानसभा निवडणुकीत आलेल्या अनुभवानंतर माजी आमदार संजय शिंदे यांनी गटातटाबरोबरच पक्षीय राजकारणालाही महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा त्यांचा घेतलेला निर्णय त्यांना घातक ठरला. त्यामुळे त्यांची पीछेहाट झाली.मात्र आता भारतीय जनता पक्षाचे काही व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी घेऊन त्यांनी आदिनाथची मोट आवळली आहे. भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे पदाधिकाऱ्यांसह व शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे पदाधिकाऱ्यांसह प्रचारात सक्रिय झाले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांचे कट्टर असलेले सुभाष गुळवे यांचादेखील पाठिंबा त्यांनी मिळवला आहे. दुसरीकडे आमदार नारायण पाटील यांनी मात्र मोहिते-पाटील, जगताप गट, स्थानिक गट यांनाच महत्त्व दिल्याचे दिसत आहे.
सहकार महर्षी स्व. शंकरराव मोहिते-पाटील यांच्याबरोबरच शरदचंद्र पवार यांचे आदिनाथच्या उभारणीत मोठे योगदान आहे, मात्र त्या पक्षाचे रोहित पवार यांचे निकटवर्तीय जे विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांच्यासोबत होते, त्यांचे समर्थक सुभाष गुळवे हे संजय शींदे यांच्या गटाबरोबर गेल्याने त्यांच्या आघाडीत बिघाडी असल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद मतदारसंघात जास्त आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांच्यासोबत असलेले हे पदाधिकारी कारखाना निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्यासोबत आहेत किंवा नाहीत हे स्पष्ट दिसत नाही. या सर्वांचा परिणाम निवडणुकीत दिसू शकतो.
आदिनाथ कारखाना रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कारखान्यास भाडेपट्ट्याच्या माध्यमातून सुपूर्द करण्याचा ठराव बागल गटाने वैतागून घेतला होता. बारामती अॅग्रोच्या चुकीच्या पद्धतीने भूमिका कामगाराच्या बाबतीत सुभाष गुळवे यांनी मांडल्याने बारामती अॅग्रो आदिनाथ कारखाना चालू करण्यास घेत असल्याचा ज्या लोकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला होता, त्या लोकांनीच अॅग्रो कारखान्याने तब्बल वर्षभर कारखाना चालू न केल्याने प्रचंड विरोध केला. अक्षरशः त्यावेळी पवारांच्या विरोधातही प्रचंड नाराजी दिसून आली होती. आदिनाथ कारखाना हा पवार गट गिळंकृत करणार आहे, असा आरोप करणारेच आता पवारांची भूमिका साकारण्यासाठी एकत्र येऊन एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.करमाळा तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखला जाणारा आणी तालुक्याचे राजकीय केंद्रबींदू असलेला आदीनाथ कारखाना हा आज बीकट अवस्थेत आहे.या कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचे शिवधनुष्य विजयी होणार्या पॅनेलला उचलावे लागणार असून शेतकर्यांना चांगले दीवस येण्यासाठी 'आदीनाथ'चांगला चालणे ही काळाची गरज आहे.
0 Comments