Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा

 लोकमंगल कृषी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस व्याख्यानाच्या आयोजनाने संपन्न झाला. सदरील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे हे लाभले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक मांडताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा अजित कुरे यांनी जागतिक वसुंधरा दिनाची संकल्पना आणि महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका प्रा.कल्पना मिटकरी यांनी आपल्या छोट्या छोट्या कृतीतून नैसर्गिक स्त्रोतांचे जतन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यानंतर कीटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. टी. नागार्जुना यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी कीटकांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. बाबाजी सिरसट यांनी जमीन नापिकीची कारणे आणि त्याकरिता कृषीचा विद्यार्थी म्हणून वसुंधरा संवर्धनासाठी करावयाच्या उपायोजना या विविध उदाहरणासह विद्यार्थ्यांना सांगितल्या. प्रा. अजित कुरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना वसुंधरेच्या संवर्धनासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर, त्यांचे जतन, माती पाणी संवर्धन, शेतातील बांधबंधिस्ती, वृक्षलागवड आणि शोष खड्ड्यांचे महत्त्व इत्यादी बाबीवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मनोगता मध्ये प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी कृषीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा कमीत कमी वापर करावा आणि ऊर्जेची शक्य तेवढी बचत करावी असा मौलिक सल्ला दिला. जागतिक तापमान वाढ, जंगलतोड, भूस्खलन, जैवविविधतेचा  ह्रास इत्यादी मध्ये मानवाची असलेली भूमिका आणि सुंदर वसुंधरेसाठी करावयाचे बदल आणि उपाययोजना यावर त्यांनी विस्तृत भाष्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जागरूकता निर्माण करणारी चित्रफीत दाखवण्यात आली. सदरील कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अजित कुरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. मीनाक्षी नाईकनवरे, प्रा. शुभांगी काळे आणि डॉ. दावणे व्ही. टी. यांची विशेष उपस्थिती होती. 

Reactions

Post a Comment

0 Comments