जिल्ह्यात २५ टँकरची मागणी
सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- यंदाच्या वर्षी मार्च महिन्यांपासून टंचाईच्या झळा जाणवू लागल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील विविध २५ गावांमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रशासनाकडे आली आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेने यंदाच्या वर्षी टंचाई काळात कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी ४० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. तालुकास्तरावरील प्रशासनाकडे सध्या माळशिरस तालुक्यातील चार गावांच्या ३९ वस्त्यांवरील ९८८१ लोकसंख्येला टँकरद्वारे दररोज ८० हजार लिटर पिण्याचा पाणीपुरवठा सुरू केला आहे. माळशिरस तालुक्यातील गारवाड, बचेरी, मगरवाडी, सुळेवाडी या चार गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर पाणीटंचाई वाढत आहे. त्यामुळे अनेक गावांमधून टँकरची मागणी वाढू लागली आहे. गेल्या १५ दिवसांत २५ हून अधिक टँकरची मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे. प्रशासनाकडून आलेल्या मागणीनुसार टंचाईची शहानिशा करून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे धोरण अवलंबिले आहे. टँकर हा शेवटचा पर्याय असल्याने इतर पर्यायांना आधी प्राधान्य देत आहे. गावांच्या परिसरात पाणीच उपलब्ध नसेल तरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाकडून ४० कोटीचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे.
चौकट 1
मागणीप्रमाणे सर्व अटी व नियमांचा विचार करून टँकरद्वारे पाणी पुरवले जाईल. टँकर हा शेवटचा पर्याय आहे. तत्पूर्वी इतर पर्यायांद्वारे टंचाईग्रस्त गावांमध्ये मागणीनुसार पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.
- अमृत नाटेकर,
उपजिल्हाधिकारी, महसूल
0 Comments