Hot Posts

6/recent/ticker-posts

चंद्रभागेतील अस्वच्छ पाण्यात भाविकांचे पवित्र स्नान

 चंद्रभागेतील अस्वच्छ पाण्यात भाविकांचे पवित्र स्नान



बंधाऱ्यातून सोडण्यात आलेले पाणी एकादशीला केले बंद; शेवाळ, निर्माल्याचा खच
पंढरपूर : (कटुसत्य वृत्त):- चैत्री यात्रेकरिता दशमी एकादशी व द्वादशीला भाविक लाखोंच्या संख्येने पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरीत आलेले भाविक हे प्रथमत: चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, चंद्रभागा नदीपात्रात कमी पाणी आहे. जे काही पाणी आहे. ते बंधाऱ्यातून सोडण्यात आलेले आहे. या पाण्यातही शेवाळ आहे. तसेच पुंडलिक मंदिरालगत तयार झालेले शेवाळ, निर्माल्य, कचरा यामुळे पाणी घाण झाले आहे. या पाण्यातच भाविकांना पवित्र स्नान करावे लागत आहे. ऐन चैत्री वारीत चंद्रभागेतील गढूळ पाण्याचा भाविकांना त्रास सहन करावा लागला आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
चैत्री यात्रेकरिता श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले. दशमी, एकादशी, द्वादशी हे तीन दिवस पंढरीत भाविकांची प्रचंड गर्दी आहे. यातच शिखर शिंगणापूरच्या महादेवाची यात्रा असल्याने पंढरीत चैत्री यात्रेला आलेला भाविक स्नान करुन श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन शिखर शिंगणापूरकडे जात आहेत. यामुळे पंढरपुरातील चैत्री यात्रा ही धावती यात्रा ठरत आहे. चैत्री यात्रेनिमित्त पंढरीत येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सेवा-सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. याकरिता मंदिर प्रशासन, नगरपालिका प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. चंद्रभागा नदीपात्रात भाविकांना स्नानासाठी पाणी सोडण्याची जबाबदारी नगरपालिका व प्रांताधिकारी यांची आहे. त्यांनी गुरसाळे बंधारा व पंढरपूर बंधाऱ्यातून २५० क्युसेकने चंद्रभागा वाळवंटात पाणी सोडले. त्यामुळे भाविकांना स्नान करण्यासाठी पाणी ऊपलब्ध झाले. मात्र ; या पाण्यात शेवाळ जास्त आहे. तसेच
गोपाळपूर येथील विष्णुपद बंधाऱ्यात पाणी अडविण्यात आल्याने चंद्रभागा वाळवंटातील शेवाळ, निर्माल्य, फाटके कपडे, कचरा जागीच साचून राहिला असल्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे.
चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिराच्या उजव्या बाजूला प्रचंड घाण साचलेली आहे. त्यामुळे या पाण्यात स्नान करण्यासाठी भाविक उतरले नाहीत. तर पुंडलिक मंदिर ते नवीन पूल या दरम्यान भाविकांनी स्नानासाठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत होते. यातच ऐन चैत्री यात्रेत एकादशी दिवशी चंद्रभागा वाळवंटात रसपान गृहे, हॉटेल, चहा टपरी, केळी फळ विक्री यामुळे कचऱ्याचे ढीग साचले होते. यामुळे चंद्रभागेचे पाणी दूषित बनत आहे.
चौकट 1
पाणी शुद्धीकरण करण्यासाठी सेबर तंत्रज्ञानाचा वापर
नगरपालिकेने चंद्रभागा वाळवंटातील पाणी शुद्धीकरण करण्यासाठी सेबर तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. याकरिता मशिनरी बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन पाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र, पाण्यातील कचरा, निर्माल्य, फाटके कपडे याचा निचरा मात्र हे सेबर तंत्रज्ञान करत नाही.

Reactions

Post a Comment

0 Comments