Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिकेचा 892 कोटींचा आराखडा मंजूर होईना!

 महापालिकेचा 892 कोटींचा आराखडा मंजूर होईना!



ड्रेनेज चेंबरमध्येच पिण्याची पाईपलाइन

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अमृत योजनेतून ८९२ कोटी ४२ लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे (एमजेपी) पाठविला. मात्र, तीन वर्षानंतरही तो प्रस्ताव कासवगतीने पुढे सरकतोय, असा अनुभव अधिकाऱ्यांना येतोय.

त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुरावा आवश्यक असल्याची त्यांची अपेक्षा आहे.

शहराच्या हद्दीचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढल्याने पाण्याची गरजही वाढली. नव्याने तयार होणाऱ्या नगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यासाठी तत्कालीन परिस्थितीत पुरेसा निधी नसल्याने कोठूनही आणि कमी इंची पाइपलाइन टाकण्यात आल्या. त्यामुळे कमी दाबाने पाणी येते म्हणून शहरातील ८० ते ८५ टक्के विद्युतपंप लावून पाणी भरतात. काही जलकुंभ, पाइपलाइन ब्रिटिशकालीन असल्याने सतत गळतीची समस्याही आहे. त्यामुळे शहराअंतर्गत विशेषत: हद्दवाढमध्ये नवीन पाइपलाइन टाकणे, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी वाढीव जलकुंभ बांधणे, अशा बाबींचा तो आराखडा तयार करून सुरवातीला तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सोलापूर कार्यालयाकडे दिला. त्यांनी त्रुटी काढल्या, त्याची पूर्तता झाली आणि सांगलीच्या कार्यालयास पाठविला. तेथे काढलेल्या त्रुटींची पूर्तता केली, पण पुढे कार्यवाहीच झाली नाही.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे सोलापूकरांना आशा निर्माण झाली आहे. सध्या प्राधिकरणाच्या पुण्यातील कार्यालयातील डिझायनिंग, सिव्हिल व इलेक्ट्रिकल विभागांकडून तो प्रस्ताव पडताळला जात आहे. त्यांच्या मंजुरीनंतर तो मुंबईच्या कार्यालयाकडे जाईल. तेथून तो पुन्हा पुण्याच्या कार्यालयात येईल. मुख्य अभियंत्यांच्या अंतिम मंजुरीनंतर निधी मिळणार आहे. यासाठी खूप कालावधी लागू शकतो, पण लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला तर दोन महिन्यांत विषय मार्गी लागेल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे.

प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे

शहरात नवीन जलकुंभ, अंतर्गत पाइपलाइन, अशा विविध कामांसाठी ८९२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. त्रुटींची पूर्तता करुन तो प्रस्ताव महापालिकेने आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुणे कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यावर मुंबई कार्यालयातून मान्यता घ्यावी लागेल. तातडीने तो मंजूर व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- व्यंकटेश चौबे, अभियंता, सार्वजनिक आरोग्य, सोलापूर महापालिका

ड्रेनेज चेंबरमध्येच पिण्याची पाईपलाइन

सोलापूर शहरात २२० झोपडपट्ट्या असून त्याठिकाणी पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आल्या होत्या. त्यावेळी खुल्या गटारी होत्या. आता त्या बंदिस्त करुन ठिकठिकाणी ड्रेनेज चेंबर काढण्यात आले आहेत. ड्रेनेज लाईन टाकायला पुरेशी जागा नसल्याने शहरात विशेषत: झोपडपट्ट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन ड्रेनेजमध्येच आहे. शहरात अशी ठिकाणे किती, याची माहिती महापालिकेकडेच नाही हे विशेष.


Reactions

Post a Comment

0 Comments