सोलापूर डीसीसी बँक राज्यात रोल मॉडेल ठरेल
सहकारी संस्थांचे अपर निबंधक पाटील यांचा विश्वास
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेपाठोपाठ -सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही (डीसीसी) घरघर लागली होती. मात्र, या बँकेला शैलेश कोथमिरे यांच्यासारखा प्रशासकीय अधिकारी लाभल्यामुळे ही बँक आर्थिक संकटातून बाहेर पडली असून आता महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही रोल मॉडेल ठरेल, असा विश्वास राज्याच्या कृषीमंत्र्यांचे सचिव तथा सहकारी संस्थांचे अपर निबंधक संतोष पाटील यांनी व्यक्त केला.शनिवारी, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा १०७ वा वर्धापन दिन, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि जागतिक महिला दिन असा त्रिवेणी संगम साधून सोलापूर जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटना व सभासदांच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अपर निबंधक पाटील बोलत होते. या कार्यक्रमास विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे,जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त उज्ज्वला पळसकर, शहर उपनिबंधक डॉ.प्रगती बागल, जिल्हा विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके, सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश वाले, सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे उपस्थित होते. प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी स्वागत केल्यानंतर प्रशासक कुंदन भोळे यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या प्रगतीचा आढावा मांडला.पाटील म्हणाले, नाशिक, वर्धा व बीड या बँकांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करत असून या बँकांचा लखलखता सूर्य आपल्याला पाहावयाचा आहे. या बँकांना ऊर्जितावस्था येण्यासाठी सरकारच्या माध्यमातून साडेपाचशे कोटी रुपयांची मदत करण्यात आली. मात्र, बँकांची अवस्था सुधारली नाही. कर्मचारी, ठेवीदार, आमदार, खासदार व इतर राजकीय पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपण या तीन जिल्ह्यातील बँकांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी एकवेळ कृषी सचिव विभागाचा पदभार सोडू पण एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून बँका बुडू देणार नसल्याची ग्वाही पाटील यांनी दिली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले म्हणून आज बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारली असल्याचे मत नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शेळके यांनी व्यक्त केले. यावेळी विभागीय सहनिबंधक सुर्वे, जिल्हा उपनिबंधक गायकवाड यांनी प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य राहील,अशी ग्वाही दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे सचिव राजेश गवळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments