Hot Posts

6/recent/ticker-posts

क्लिनचिटचा घोळ: अंधारेंचा चित्रा वाघ यांना सणसणीत टोला, फडणवीसही कोंडीत!

 क्लिनचिटचा घोळ: अंधारेंचा चित्रा वाघ यांना सणसणीत टोला, फडणवीसही कोंडीत!

 पुणे(कटूसत्य वृत्त):-तत्कालिन मंत्री संजय राठोड यांना उद्धव ठाकरे यांनीच क्लिनचिट दिली, असा दावा करून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना विधान परिषदेत घेरण्याचा प्रयत्न केला.

“हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंना राठोड यांच्या क्लिनचिटबद्दल प्रश्न विचारा,” असे आव्हान देत चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. मात्र, या टीकेला शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर देत चित्रा वाघ आणि देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडले.

सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, "जर उद्धव ठाकरे यांनी दिलेली क्लिनचिट खरी मानून देवेंद्र फडणवीसांनी संजय राठोड यांना मंत्रीपद दिले असेल, तर चित्रा वाघ यांचे नेते फडणवीस खरे ठरतात. आणि जर फडणवीस खरे असतील, तर चित्रा वाघ यांनी भटक्या-विमुक्त समाजातील एका नेत्याचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि एका मुलीच्या अब्रूचा बाजार मांडला, असा याचा अर्थ होतो."

पुढे त्या म्हणाल्या, "आणि जर ठाकरे यांची क्लिनचिट चूक असेल, तर चित्रा वाघ यांनी कसला लढा लढला? त्यांनी भाजपचे सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा देऊन राठोड यांच्याविरोधात पुन्हा लढायला हवे होते. पण फडणवीसांनी राठोडांना मंत्री केले, याचा अर्थ क्लिनचिट योग्य होती, हे सिद्ध होते." अंधारेंच्या या रोखठोक उत्तराने चित्रा वाघ यांच्यासह भाजपची कोंडी झाली आहे.

चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?

विधान परिषदेत अनिल परब यांनी "संजय राठोड प्रकरणाचे काय झाले? सत्ताधारी पक्षातील महिला आमदार आता का गप्प आहेत?" असा सवाल उपस्थित केल्याने चित्रा वाघ भडकल्या. त्यांनी प्रत्युत्तरात म्हटले, "मी माझा लढा लढले. माझ्या कुटुंबाला त्रास झाला तरी मी मागे हटले नाही. तुमच्या नेत्याने (उद्धव ठाकरे) राठोडांना क्लिनचिट दिली, हिम्मत असेल तर त्यांना विचारा." "तुमच्यासारखे 56 जण पायाला बांधून फिरते," असेही त्या आक्रमकपणे म्हणाल्या.

दरम्यान, संजय राठोड प्रकरण आणि त्यांना मिळालेली क्लिनचिट यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये जुंपली आहे. अंधारेंच्या प्रत्युत्तराने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments