अकलूज येथे मूकनायक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथे प्रतिवर्षीप्रमाणे मूकनायक प्रतिष्ठानच्यावतीने मूकनायक परिसंवाद या कार्यक्रमाचे रविवार दिनांक १६ मार्च रोजी आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास आमदार राजू खरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर फिनिक्स अकॅडमीचे संचालक तथा प्रसिद्ध व्याख्याते नितेश कराळे मास्तर यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन ऐकावयास मिळणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मूकनायक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
मूकनायक प्रतिष्ठान अकलूजच्या वतीने मागील तीन वर्षापासून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाला उजाळा मिळावा यासाठी समता सैनिक दल प्रमुख, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूकनायक प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. वैचारिक आणि सामाजिक प्रबोधन पर अशा कार्यक्रमाचे आयोजन करून या प्रतिष्ठानने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावर्षीही रविवार दिनांक १६ मार्च रोजी अन्नपूर्णा सांस्कृतिक हॉल अकलूज या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैचारिक मेजवानीची संधी प्राप्त होणार आहे. सदर कार्यक्रमास प्रसिद्ध व्याख्याते नितेश कराळे मास्तर यांची उपस्थिती असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून युवकांनी यश कसे गाठावे यावर अनमोल मार्गदर्शनपर विचार ऐकावयास मिळणार आहेत.याचबरोबर आमदार राजू खरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. याशिवाय शाहीर राजेंद्र कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर पत्रकारिता, शैक्षणिक, साहित्य आणि विधीज्ञ क्षेत्रात अद्वितीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा देखील या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे यांच्या गायनांचा कार्यक्रम होणार आहे.
तरी सदर कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मूकनायक प्रतिष्ठानचे पत्रकार बांधव नागेश लोंढे, डी एस गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सागर खरात, आनंदकुमार लोंढे, सुजित सातपुते, कैलास कांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोट
- विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार...
या कार्यक्रमात दिला जाणारा पुरस्कार हा मानाचा आणि सन्मानाचा समजला जातो. यंदा पत्रकार क्षेत्रातील उत्कृष्ट पत्रकारिता हा पुरस्कार एल डी वाघमोडे, विधीज्ञ क्षेत्रातील पुरस्कार ॲड.सुमित सावंत, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार बा.ना.जाधव तर शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार सुनंदा वाघमारे काटे यांना जाहीर झाला असून त्यांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करून गौरविण्यात येणार आहे.
कोट
- पुस्तके खरेदी करण्याची सुवर्णसंधी...
सदरच्या परिसंवाद कार्यक्रमात वैचारिक पुस्तके खरेदी करण्याची देखील सुवर्णसंधी प्राप्त होणार असून यासाठी विविध पुस्तकांचे बुक स्टॉल लावण्याचेही नियोजन आयोजकांनी केले आहे त्यामुळे सवलतीच्या दरात या ठिकाणी पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
0 Comments