डॉ. वाल्मीक कीर्तीकर सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट जिल्हास्तरीय समन्वयक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या वतीने करिअर कट्टाअंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले तसेच उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वाल्मिक कीर्तीकर यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय समन्वयकाचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. सन 2022- 23, 2023- 24, आणि 2024- 25 अशी सलग तीन वर्ष डॉ. वाल्मीक कीर्तीकर यांना करिअर कट्टाचा उत्कृष्ट जिल्हास्तरीय समन्वयकाचा प्रथम पुरस्कार मिळाल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या तीन वर्षांमध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षा आणि उद्योजकीय विकास या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी भरीव कामगिरी केली आहे याची दखल घेऊन सदरील पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.
हा पारितोषिक वितरण समारंभ डी. बी. एफ. दयानंद महाविद्यालय आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. करिअर कट्टाचे राज्यस्तरीय समन्वयक यशवंत शितोळे यांच्या हस्ते आणि दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दामजी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक, करियर संसदेचे विद्यार्थी, शहरातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व पालक यांची उपस्थिती होती.
0 Comments