महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थ्याने संपविले जीवन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एम. कॉम. प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने तिसर्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये उघडकीस आली. ही घटना महाविद्यालयाच्या कॅमेर्यात कैद झाली आहे.
ही घटना शहरातील दयानंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये सोमवारी (दि.१७) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
प्रीतम निलेश राऊत (वय २२, रा. सहकारी बँकेच्या वरच्या मजल्यावर टिळक चौक, सोलापूर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला जखमी व बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती त्याच्या आई-वडिलांना मिळताच नातेवाईकांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये हंबरडा फोडला.
वर्गात सायन्सचे लेक्चर होते सुरू
कॉलेजमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो अनेकदा ये-जा करीत असल्याचे दिसत आहे. या घटनेच्या वेळी वर्गात सायन्स विभागाचे लेक्चर सुरू होते. हा विद्यार्थी कॉमर्स शाखेचा होता. याचे कॉलेज सकाळी ११ वाजताच संपले होते. पण, तरीही तो कॉलेज आवारात फिरताना आढळून आल्याने त्याला येथील सुरक्षारक्षकांनी विचारणा केली. तेव्हा त्याने मित्राकडे काम आहे, असे सांगितले. त्यानंतर त्याने सायन्स शाखेच्या बिल्डिंगच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारली. त्याक्षणी सायन्सचे लेक्चर सुरू असलेल्या वर्गातील विद्यार्थी धावत बाहेर आले. तेव्हा प्रितम हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी सांगितले.
खिशात चिट्टी सापडल्याची माहिती
शहरातील दयानंद महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्याची चौकशी केली असता या विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा का संपविली. याचे कारण अजून कळू शकले नाही. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र प्रीतम याच्या खिशात चिट्टी सापडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून तपास सुरू
विद्यार्थ्याच्या मानसिक स्थितीबद्दल माहिती मिळवली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल का उचलले? याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. घटनेच्या सर्व पैलूंची सखोल तपासणी केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या पोलिसांकडून विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांशी आणि मित्राशी बोलून त्याच्या मानसिक स्थितीबद्दल माहिती मिळवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0 Comments