Hot Posts

6/recent/ticker-posts

बोगस टीईटी प्रमाणपत्र देणे भोवले; ५ शिक्षकांची सेवा समाप्ती

 बोगस टीईटी प्रमाणपत्र देणे भोवले; ५ शिक्षकांची सेवा समाप्ती




 जिल्हा परिषद सीईओंची कारवाई

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात टीईटी घोटाळा झाल्याचे समोर आले होते. या घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवत बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक शिक्षकांची सेवा समाप्ती करण्याची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी ५ शिक्षकांवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे सोलापूरच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत २०१८ व २०१९ मध्ये घोटाळा झाला होता. यामध्ये शिक्षणसेवक पद मिळविण्यासाठी परीक्षेत प्राप्त गुणांपेक्षा अधिक गुण दाखविण्यात आले होते. या प्रकरणी तब्बल सात हजार ८७४ उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राज्यभरात हा टीईटी घोटाळा गाजला होता. यानंतर सोलापूर जिल्ह्यात बोगस टीईटी प्रमाणपत्र सादर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

कागदपत्र पडताळणीवेळी दिले स्वयंघोषणापत्र

दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पाच शिक्षण सेवकांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मार्च २०२४ मध्ये कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्यात आली होती. यावेळी या पाचही शिक्षकांनी हजेरी लावली. तसेच तपासणीवेळी कोणत्याही गैरप्रकारात सहभागी नसल्याचे आणि दिलेली कागदपत्रे खरी असल्याचे स्वयंघोषणापत्राचा दाखला दिला होता.

अखेर शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई

कागदपत्र पडताळणीनंतर २०२४ साली या पाच शिक्षकांची शिक्षण सेवक पदी नियुक्ती करण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, सांगोला तालुक्यात प्राथमिक शिक्षण सेवक म्हणून हे पाचही शिक्षक काम करत होते. दरम्यान जिल्हा परिषदेकडून कागदपत्रांची तपासणी, पडताळणी दरम्यान पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यात या पाच शिक्षक सेवकांचा समावेश असल्याचं उघड झाले. यानंतर खोटी आणि बनावट कागदपत्र सादर करून शिक्षण सेवक पदी नियुक्ती मिळवल्याचा ठपका ठेवत सीईओनी बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments