Hot Posts

6/recent/ticker-posts

हिळ्ळी बंधारा पुन्हा एकदा कोरडा

 हिळ्ळी बंधारा पुन्हा एकदा कोरडा

चार दिवस पुरेलइतकेच पाणी शिल्लक; शेतकरी हवालदिल
अक्कलकोट, (कटुसत्य वृत्त):- तालुक्यातील हिळ्ळी बंधाऱ्यात केवळ चार दिवस पुरेल इतकेच पाणी सध्या शिल्लक आहे. ऐन उन्हाळ्यात हिळ्ळी वंधारा पुन्हा एकदा कोरडा पडल्याने ग्रामस्थ व भीमानदी काठावरील सीमावर्ती भागातील शेतकरी व नागरिक हवालदिल झाले आहेत.
या वर्षी उजनी धरण ११० टक्के भरल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. या भागातील शेतकरी कर्ज काढून व उसनवारी करुन महागडे ऊस रोपे विकत घेऊन ऊस पिकांची लागवड केली होती. मात्र, सध्या पाण्याअभावी डोळ्यादेखत पिके जळून जात असल्याने या भागातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. शेतकऱ्यांनी जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न आता सध्या धुळीस मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. उजनी धरणातून भीमानदीत १० मार्चला पाणी सोडणे अपेक्षित होते. परंतु, कालव्यातून सिंचनासाठी भरमसाठ पाणी सोडून दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यांतील गावे वंचित ठेवली.
आता उजनी धरणाची पातळी ३० टक्क्यांपर्यंत गेली आहे. अद्यापही सिंचनासाठी ४ हजार क्युसेकचा विसर्ग सुरुच आहे. उजनी धरणातील पाणी फक्त शहरी भागांसाठीच आहे की काय, प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे. आता प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून तत्काळ उजनी धरणातील पाणी हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत सोडून या भागातील शेतकरी व सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी हिळ्ळी गावचे सरपंच आप्पासाहेव शटगार व परिसरातील शेतकरी बांधवातून जोर धरत आहे.
चौकट 1
दोन महिने काढायचे कसे ?
हिळ्ळी बंधाऱ्यातील पाण्याच्या जोरावरच या भागातील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. या बंधाऱ्याच्या भरोशावरच या भागातील बहुसंख्य शेतकरी बागायत शेती पिकाचे नियोजन करत असतात. परंतु, यंदा मात्र या भागातील शेतकऱ्यांचे शेती नियोजन पुरते फसल्याचे बोलले जात आहे. कारण हिळ्ळी बंधारा अचानक तळ गाठल्याने पुढचे एप्रिल आणि मे हे दोन महिने काढायचे कसे, असा सवाल या भागातील नागरिक प्रशासनाला करत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments