पक्षांचे मृत्यू थांबेनात, 'बर्ड फ्लू'ची पुन्हा होणार पडताळणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहर परिसरातील कावळ्यांच्या मृत्यूची साथ थांबलेली नाही. गेल्या चार दिवसांमध्ये ३८ कावळे आणि इतर जंगली पक्षांचा मृत्यू झाला. हे पक्षी किल्ला बाग आणि धर्मवीर संभाजी तलाव परिसरात मृत आढळले.
पक्षांच्या मृत्यूची संख्या साधारण होईपर्यंत बर्ड फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राज्य शासनाचा पशुसंवर्धन आणि महापालिकेचा पशुसंवर्धन विभाग यासाठी दक्ष झाला आहे.
किल्ला बाग आणि धर्मवीर संभाजी तलाव परिसरात कावळे, घार आणि बगळ्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'ने झाला. त्यानंतर या परिसरातील कोंबड्यांचे नमुने तपासले. या नमुन्यात बर्ड फ्लू नसल्याचे समोर आले. दुसरीकडे कावळ्यांचे मृत्यू अजूनही होत आहेत. कावळ्यांमधील 'बर्ड फ्लू'ची सध्या काय स्थिती आहे? याची पडताळणी पुन्हा एकदा केली जाणार आहे. मार्चअखेर कावळ्यांसह बगळे, घारी, कबुतरांमधील नमुने काढले जाणार आहेत.
चिकन दुकाने कुठे चालू तर कुठे बंद..
सोलापुरातील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू नाही. मग चिकन दुकाने व चौपाट्या का बंद केल्या जात आहेत?, असा सवाल सध्या केला जात आहे. मांसांचे तुकडे खाण्यासाठी चिकन शॉप व चिकन पदार्थ विक्री दुकानाच्या बाहेर कावळ्यांची गर्दी होते. तेथून बर्ड फ्लू फैलाव होण्याची शक्यता असल्याने दुकाने व चौपाट्या बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. विजापूर वेस भागातील चिकन विक्रीची दोन मोठी दुकाने बंद केली आहेत. परंतु, बेगम पेठ, किडवाई चौक, विजापूर रोडवरील चिकन आणि मांस विक्रीची अनेक दुकाने काही काळासाठी बंद होती. संध्याकाळी यातील अनेक दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.
0 Comments