Hot Posts

6/recent/ticker-posts

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर, कोणाची लागणार वर्णी याकडे लक्ष

 विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर, 

कोणाची लागणार वर्णी याकडे लक्ष


मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात पुन्हा एकदा निवडणूक आहे, मात्र ही सार्वत्रिक निवडणूक नसून विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधान परिषदेच्या या पाच जागांवर आता कोणाची वर्णी लागणार, याकडे आमदार न होऊ शकलेल्या अनेकांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेचे पाच आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त होणार आहेत. यासाठी 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. या सभागृहातील पाच जागा रिक्त झाल्या आहेत. यातील तीन जागा भारतीय जनता पक्षाच्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे ) यांची प्रत्येकी एक जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे.

या निवडणुकीत मतदानाचा अधिकार फक्त आमदारांना असणार आहे. विधानसभेत सध्या महायुतीचे बहुमत आहे. जवळपास 237 आमदारांचा महायुती सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे महायुतीच्याच घटक पक्षांचे उमेदवार विजयी होणार असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे या पाच जागांसाठी आता तिन्ही पक्षांचे नेते कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप - आमदार प्रवीण दटके, आमदार गोपीचंद पडळकर आमदार रमेश कराड शिवसेना (एकनाथ शिंदे) - आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - आमदार राजेश विटेकर या पाच आमदारांच्या रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे. हे पाचही आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. या पाच रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे.

भाजपचे गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दडके यांचा कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत आहे. तर, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत आहे. शिवसेनेचे आमशा पाडवी यांचा कार्यकाळ 7 जुलै 2028 पर्यंत आहे. या पाच आमदारांच्या रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान होणार आहे.

10 मार्च रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. 18 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल. 20 तारखेपर्यंत अर्ज मागे घेतले जाणार आहेत. तर 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान होईल.

आज विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार असल्याचे संकेत दिले. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनाला (ठाकरे गट) मिळणार असल्याचे आज समोर आले.

Reactions

Post a Comment

0 Comments