नातेपुते नगरपंचायत नागरिकांच्या बाजूने विकास आराखडा रद्द बाबत निर्णय घेणार- मालोजीराजे देशमुख
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते शहर विकास आराखडा रद्द करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणार सर्वच नगरसेवक एकत्र येऊन हा आरक्षण आराखडा रद्द करण्यासाठी ठराव मंजूर करून खासदार,आमदार यांच्या माध्यमातून शासन दरबारी रद्द करण्याबाबत मागणी करणार आहोत नातेपुते नगरपंचायत नागरिकांच्या बाजूने या अगोदरही आहे यापुढेही असणार आहे. विकास आराखड्याबाबत गैरसमज करून घेऊ नये. यामध्ये लोकप्रतिनिधीचा कसलाही संबंध नसल्याचे मत माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मालोजीराजे देशमुख यांनी व्यक्त केले.
ते नातेपुते नगरपंचायत येथे नगर विकास आराखडा बाबत घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, नगरसेवक अॅड. रणवीर देशमुख, रणजीत पांढरे, बाळासाहेब काळे, सुरेंद्र सोरटे, मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच आप्पासाहेब भांड, शक्ती पलंगे उपस्थित होते. पुढे बोलत असताना मालोजीराजे देशमुख म्हणाले की, आरक्षणाबाबत अनेकांच्या हरकती मागून घेतल्या त्या अर्जाची सुनावणी नगरपंचायत मध्ये झाली नागरिकांच्या सर्व हरकती मान्य केल्या, विकास आराखडा बाबत सर्वे मधील त्रुटी अधिकाऱ्यांना दाखवून दिल्या आहेत. रेसिडेन्शिअल एरिया नसताना इंडस्ट्रियल झोन आरक्षण टाकण्यात आला. अस्तित्वात नसलेले रस्ते नकाशात दाखवण्यात आले. येलो झोन टाकण्या अगोदर येलो झोनचा विस्तार करणे गरजेचे होते परंतु तसे न करता आरक्षण टाकले गेले. मूळ नकाशा प्रमाणे गट नंबर न दाखवता दुसऱ्या ठिकाणी दाखवण्यात गेले आहेत. रस्ते आरक्षित करताना रहिवासी घरी पाहून आरक्षित करायला पाहिजे होते तसेच झाले नाही त्यामुळे घरावरून रस्ते गेले आहेत. आमचे मार्गदर्शक नेते बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे, अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक नागरिकांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक पालकमंत्री यांची भेट घेऊन नगर विकास आराखडा रद्द करण्याबाबत चर्चा करणार आहोत. नगरपंचायत सुरुवातीपासूनच मांडण्यात आलेल्या आरक्षण आराखड्याच्या विरोधात आहे. फक्त नागरिकांनाच या आरक्षणाचा त्रास झाला नाही तर लोकप्रतिनिधींना सुद्धा त्रास झाला असल्याचे मत मालोजीराजे देशमुख यांनी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये व्यक्त केले. यावेळी यावेळी नातेपुते शहर विकास आराखडा बैठकीसाठी नातेपुते ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
चौकटीत :
विकास आराखडा शासनाच्या नियमाप्रमाणे होत असतो. त्यामध्ये नागरिकांचे कोणतेही नुकसान होईल अशी कृती लोकप्रतिनिधी यांच्याकडून घेतली जाणार नाही. सदर आराखडा हा सोलापूर अधिकारी यांच्याकडून झालेला आहे. निश्चितच नागरिकांच्या भावनांचा आदर ठेवून आराखड्याला विरोध करण्यासाठी आम्ही नागरिकांसोबत आहोत. येणाऱ्या ३ फेब्रुवारी २०२५ रोजी मासिक मीटिंगमध्ये विकास आराखडा रद्द करण्याबाबत ठराव मंजूर करून शासन दरबारी पाठवणार आहोत.
अतुल पाटील
(उपनगराध्यक्ष नातेपुते नगरपंचायत)
0 Comments