शिवजयंतीनिमित्त एक अनोखा उपक्रम
बार्शी (कटुसत्य वृत्त): छत्रपती शिवरायांचा विचार खऱ्या अर्थाने समाजासमोर ठेवत तालुक्यातील इर्लेवाडी येथील तरुणाईने पुढाकार घेत शिवजयंतीनिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला. पडीक असलेल्या जागेत सुंदर वाचनालय उभारण्यात आले आहे.
कोणतीही मिरवणूक न काढता, डीजे, डॉल्बी न लावता एक अनोखा, आगळ्यावेगळ्या उपक्रमाने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय इर्लेवाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी, विशेषतः गावातील युवकांनी घेतल्याने तालुक्यासाठी तो चर्चे चा विषय ठरला आहे.
गावातील इर्लेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाची जुनी इमारत पडीक होती. त्याचे नूतनीकरण करून त्या इमारतीमध्ये सर्वांच्या सहकार्यान वाचनालय सुरू करण्याचा एक प्रयत्न येथील युवकांनी सुरू केला आहे. आजच्या मोबाइल युगामध्ये नव्या पिढीला वाचनाची गोडी निर्माण व्हावी, शिवरायांचे चरित्र आणि शौर्यगाथा पुस्तकातून जाणून घेता यावी, यासाठी ग्रामस्थांचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून शिवप्रेमी, प्रतिष्ठित व्यक्ती, दानशूर, नोकरदार वर्गाने आपले योगदान द्यावे, पुस्तके भेट द्यावी, असे आवाहन उपसरपंच पंकज सरकाळे यांनी केले. या उपक्रमाचे ग्रामस्थ व शिवप्रेमींकडून कौतुक होत आहे.
.jpg)
0 Comments