आम्हाला पैसे नको, दोन वेळचे जेवण देण्याची साद,
30 कामगार मित्रांनी सुरू केली रोटी बँक, सोलापुरातील स्तुत्य उपक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-निराधार, गरीब तसेच भुकेलेल्या नागरिकांना पोटभर अन्न मिळावे म्हणून सोलापूर शहरातील विजापूर नाक्या मुस्लिम तरुणांनी एकत्रित येत रोटी बँक ही संस्था सुरू केली आहे. मागील 8 वर्षांत सिव्हिल हॉस्पिटलसमोर 6 ते 7 लाखांहून अधिक गरजू आणि गरिबांना पोटभर अन्न त्यांनी दिले आहे. या संदर्भात अधिक माहिती रोटी बँकेचे संस्थापक अध्यक्ष जमीरखान पठाण यांनी लोकल 18 शी बोलताना दिली. रखान पठाण हे आपल्या मित्रासह शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी संबंधित नातेवाईकास मदत म्हणून काही पैसे दिले, मात्र त्या संबंधित नातेवाईकांनी आम्हाला पैसे नको दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करा अशी भावनिक साद घातली. ही साद जमीरखान पठाण यांच्या काळजाला लागली अन् आपल्या मित्रांना सोबत घेऊन 8 ऑगस्ट 2017 रोजी रोटी बँक नावाचा उपक्रम हाती घेतला. सोलापुरातील सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण दाखल होतात. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे यापैकी काही रुग्णांना आणि त्यांच्या नातलगांना एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करणे मुश्कील होते. अशा गरजू रुग्ण आणि नातेवाईकांपर्यंत एक वेळचे जेवण पोहोचवण्यासाठी शहरातील 30 कामगार मित्रांनी एकत्र येऊन रोटी बँकेचा उपक्रम सुरू केला. शासकीय रुग्णालयात सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव, लातूर, बिदर, विजापूर, गुलबर्गा आदी भागातून येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईक यांची संख्या मोठी आहे. येथे येणारे बहुतेक रुग्ण आणि नातेवाईक गरीब असतात. उपचाराच्या खर्चाबरोबर राहणे आणि जेवणाचा खर्च करताना नातेवाईकांचे हाल होतात. काही जणांना एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करणेही मुश्कील होते. ही गरज ओळखून जमीर पठाण आणि त्यांच्या 30 सहकाऱ्यांनी स्वखर्चातून हा उपक्रम सुरू केला. तर काही जण वाढदिवसाचा खर्च टाळून या उपक्रमाला मदत देत आहेत. समाजातील दानशूर मंडळीही आपला या उपक्रमात सहभागी होऊन हातभार लावावा. शिवाय लग्न आणि रिसेप्शन कार्यक्रमातील शिल्लक अन्न रोटी बँक घेऊन गरीब वस्तीत वाटतात. मदतीसाठी 8421769334 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पठाण यांनी केले. यापुढे दररोज दोन वेळचे जेवण पुरवण्याचा मानस असल्याचे पठाण म्हणाले. कोई भूखा नही रहेगा या उपक्रमांतर्गत रोटी बँकेने गरजू आणि गरिबांना अन्नदान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
.jpg)
0 Comments