टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पंढरपूर येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने शेतकरी प्रश्नांचे निवेदन देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रा.सुहास पाटील व राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला व शेतकरी प्रश्नांचे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित सोडवण्याबाबत विनंती केली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल अद्याप पर्यंत दिलेली नाही अशा साखर कारखान्यांवर कारवाई करावी. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड व ठिबक सिंचन अनुदान दोन वर्षापासून मिळालेले नाही त्या अनुदान मिळणे विषयी अंमलबजावणी व्हावी. उजनी धरणातील पाणी वाटपाचे नियोजन कालवा, नदी व सिंचन व्यवस्था द्वारे समान पातळीवर करण्यात यावे. तसेच सरकारच्या माध्यमातून कडधान्य खरेदी केंद्र पूर्ववत सुरू करावीत. उजनी धरणाच्या नदीपत्रातील पहिले गाव मौजे रांजणी येथे रांजणी- आलेगाव हद्दीमध्ये बॅरिगेज बंधारा बांधण्यात यावा.सिना माढा उपसा सिंचन योजनेतून सोडण्यात येणारे पाणी सर्व वितरिकांना समान वाटप करण्यात यावे. ई पीक पाणी ऑनलाईन नोंदणी १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू ठेवावी. अशा शेतकरी प्रश्नांच्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री महोदयांना देण्यात आले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष रुपेश वाघ,रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण बोबडे,माढा तालुकाध्यक्ष नागेश गायकवाड, चंद्रभागा साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील, संपत काळे (सुर्ली), पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष राहुल पवार आदीजन उपस्थित होते.
0 Comments