राजराजेश्वरी शिक्षण संकुलात मानाच्या नंदिध्वजाचे पूजन उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हर बोला हर.. श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय या जयघोषात विनायक नगर येथील राजराजेश्वरी शिक्षण संकुलात श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या तिसऱ्या मानाच्या नंदिध्वज काठ्याचे पूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले.संपूर्ण परिसर जयघोषाने दुमदुमला होता.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वर महाराज यांच्या यात्रेच्या निमित्ताने सोलापूर शहरात सातही प्रमुख नंदीध्वज काठ्यांचे पूजन करण्यात येत असते.भक्तगण मनोभावे पूजा करतात. वयस्कर व्यक्ती व लहान मुले यात्रेत सहभागी होत नसल्याने अथवा सर्वांना जाते येते असे नसते म्हणून भक्तगण घरासमोर अथवा संस्था कार्यालयासमोर पूजन करतात. यातीलच तिसऱ्या मानाच्या नंदी ध्वजाच्या मानकरी यांना निमंत्रण देऊन राजराजेश्वरी शिक्षण संकुलात आणण्यात आले. शाळेत ढोल ताशांच्या गजरात रंगीबेरंगी रांगोळी काढून नंदिध्वजाचे स्वागत करण्यात आले.यावेळी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.या महापूजेत मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांच्यासह माता पालक समितीचे सदस्य,पालक शिक्षक संघाचे सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य,सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी सहभाग घेतले. महामंगल आरती करण्यात आली. शाळेतील अकराशे विद्यार्थ्यांना श्री सिद्धेश्वर यात्रेतील मानाच्या नंदिध्वजाला जवळून पाहता आले व दर्शन घेता आले. पेढे व मसाला दूध वाटपांनी कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी परिश्रम घेतले.
काही दिवसातच सोलापुराच्या परंपरा असणाऱ्या व संस्कृती जपणारी गड्डा यात्रा भरणार आहे. आत्तापासूनच शालेय विद्यार्थ्यांना ही यात्रेची चाहूल लागली आहे. शाळेत गड्डा यात्रेची वातावरण निर्माण झाली होती.
0 Comments