वाचन संस्कृतीचे जतन काळाची गरज
आजच्या धावपळीच्या जीवनात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण वाचनाकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यात आजचे युग हे स्पर्धेचे आणि संगणकाचेदेखील मानले जाते. आजची युवा पिढी तर मोबाइलमुळे वेगळ्याच विश्वात अडकली आहे. आज या सर्वांना मोबाइल, संगणक, लॅपटॉपसारख्या उपकरणांमुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक, एक्स, यूट्यूब, इन्स्टाग्राम इत्यादीचे जणू व्यसनच लागले आहे.
आज विद्यार्थ्यांना आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी, आपले करिअर घडवण्यासाठी पुस्तक वाचनावर भर द्यायला हवा. आज युवा पिढी व्यसनाधीन झाली आहे, याच्या बातम्या आपण माध्यमांमध्ये वाचत, पाहत आलो आहोत. या पिढीला वाचनात गुंतवून ठेवले पाहिजे. जेणेकरून त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होईल. वाचनाचा प्रसार सर्वत्र झाला पाहिजे. शाळा-महाविद्यालयातून देखील व्यक्तिचरित्रांचे वाचन स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यायला हवी. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये शालेय, महाविद्यालयीन जीवनापासूनच वाचनाची गोडी निर्माण होईल आणि हाच विद्यार्थी समाजात चांगला नागरिक म्हणून आपले नाव कमवेल. चांगल्या वाचनामुळे मनामध्ये चांगले विचार रुजतील. वाईट कृत्यापासून प्रत्येक व्यक्ती बाजूला जाईल आणि समाजात व्यक्तिचरित्रांच्या शांतता प्राप्त होईल. वाचनामुळे विद्यार्थी असो किंवा जाणकार माणूस प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रांतील माहिती मिळते. रोजच्या जीवनातील घडामोडींचे ज्ञान मिळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. 'वाचाल तर वाचाल' हे आपण लहानपणापासूनच वाचत, ऐकत आलो आहोत. ते बरोबरच आहे. कारण वाचनाची आवड असणारा प्रत्येक जण जीवनात कुठेच कमी पडत नाही. तो काटेरी वाटेवरही चांगली वाट शोधून पुढे जात असतो.
पालकांनी देखील आपल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजे. जेणेकरून लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीस खतपाणी मिळून तिचे चांगले संवर्धन होण्यास मदत होईल. आपण आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक वाईट घटना पाहतो. आजचे दूषित होत चाललेले मानवी जीवन जर बदलायचे असेल तर वाचन संस्कृतीचे जतन ही काळाची गरज
आहे.
0 Comments