Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यातील १ हजार ६०७सहकारी संस्था निवडणुकीस पात्र

 सोलापूर जिल्ह्यातील १ हजार ६०७सहकारी संस्था निवडणुकीस पात्र


६४७ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- 
सहकार निवडणूक प्राधिकरणाने कार्यकारी मंडळाची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रकारच्या जवळपास १ हजार ६०७ सहकारी संस्था निवडणुकीसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी ६४७ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने सुरु करण्यात आली. त्यामुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांनी आपल्या सभासद, सदस्यांची मतदार यादी निवडणूक प्राधिकरणाला सादर करावी अन्यथा त्या सहकारी संस्थांवर पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे.
कोरोनासह इतर काही कारणांमुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणूका रखडल्या होत्या. सहकार निवडणूक प्राधिकरणाने आता ह्या निवडणुका घेण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अ वर्गातील ६, ब वर्गातील १११, क वर्गातील ५२२ तर ड वर्गातील ९६८ सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याचे नियोजन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानुसार त्या-त्या सहकारी संस्थाना आपआपल्या सभासद् सदस्य मतदारांची यादी मागविली आहे.

काही संस्थांनी मतदारयादी सादर केली आहे. अनेक संस्थांना वारंवार सांगूनही मतदार यादी सादर केली जात नाही. त्यामुळे ज्या सहकारी संस्था वेळेत मतदारयाद्या सादर करणार अशा संस्थांना सहकार कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्याचा इशाराही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अ वर्गातील ६ सहकारी संस्था निवडणूकीस पात्र आहेत. मात्र त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि अदिनाथ सहकारी साखर कारखान्या सारख्या काही संस्थावर सध्या प्रशासक नेमण्यात आलेला आहे.
इतर काही सहकारी संस्था सध्या बंद अवस्थेत आहेत. ब वर्गातील व्यापारी बँक, समर्थ बँक,
रतनचंद सहकारी बँक, नित्यानंद बँक अशा सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. क प्रवर्गातील जवळपास ९५ सहकारी संस्थांचा प्रस्ताव निवडणूक प्राधिकरणाला पाठविण्यात आला आहे. ड प्रवर्गातील जवळपास ५०८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु झाला आहे.

चौकट

वेळेत मतदारयाद्या न दिल्यास.....
येत्या तीन महिन्यात या सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूका पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालय कामाला लागले आहे. अनेक संस्थांनी मतदारांच्या याद्या
दिलेल्या नाहीत. त्यांनी तातडीने मतदारयाद्या सादर कराव्यात. अन्यथा सहकार कायद्यातील
तरतुदीनुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक जिल्हा उपनिबंधक आबासाहेब गावडे यांनी दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments